-->
रविवार दि. २८ सप्टेंबर २०१४ च्या अंकासाठी --
-------------------------------------------
विस्कटलेल्या राजकीय संसारानंतर...
--------------------------------
शिवसेना-भाजपा व कॉँग्रेस-राष्ट्रवादी यांची अनुक्रमे असलेली युती, आघाडी आता फुटल्याने त्यांचा संस्कार विस्कटला आहे. सध्याच्या स्थितीत डाव्या पक्षांच्या महाराष्ट्र डावी लोकशाही समिती हीच एकमेव एकत्रित अशी लढणार आहे. सर्व पक्षांच्या फाटाफुटीचा या आघाडीस सर्वात जास्त फायदा होण्याची शक्यता आहे. कॉँग्रेस व समाजवादी पक्षाची आघाडी शेवटच्या टप्प्यात अपेक्षित आहे. परंतु फार मोठ्या प्रमाणात यावेळी कोणत्याही आघाड्या वा युत्या होणार नाहीत हे आता जवळजवळ स्पष्ट झाले आहे. आता शेवटच्या क्षणीही काही अस्तित्वात येईल असे काही दिसत नाही. त्यामुळे यावेळी जवळजवळ प्रत्येक म्हणजे २८८ विधानसभा मतदारसंघात पंचरंगी लढती होणार हे नक्की झाले आहे. राज्यातली शिवसेना-भाजपा ही युती २५ वर्षाहून जास्त काळ होती. त्यात त्यांनी पाच वर्षे सत्ताही उपभोगली. आता मात्र ही युती फुटली असली तरी अजूनही एकमेकांनी आपले दरवाजे खुले ठेवण्यासाठी टोकाला जाऊन टीका केलेली नाही. त्यातच वृत्तपत्रे व चॅनेल्सनी शिवसेना व मनसे एकत्र येण्याची बातमी देऊन एक नवीन समिकरणे जुळतील असे सुतोवाच केले. अर्थात एवढ्या झपाट्याने हे दोन्ही पक्ष काही एकत्र येतील किंवा एकत्रित लढतील असे नाही. कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडी सत्तेत असतानाच त्यांची बिघाडी सुरु झाली होती. परंतु सत्तेच्या गुळाला चिकटलेले असल्याने त्यांना घटस्फोट घेणे अवघड जात होते. आता मात्र कॉँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडी सत्तेत येण्याचे चिन्ह नसल्याने राष्ट्रवादीला गळ्यातली ही धोंड काढून टाकावीशी वाटणे स्वाभाविक होते. त्यामुळे युती फुटल्यावर लगेचच राष्ट्रवादीनेही आघाडीची नौका फोडली. आता सर्वच पक्षांच्या आघाड्याचे संसार विस्कटल्याने भविष्यात नेमके काय होऊ शकते, याचा एक ढोबळ अंदाज आपण बांधू शकतो. एक बाब स्पष्टच आहे की कोणत्याही पक्षाला यंदाच्या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळणार नाही. भाजपाला एक मोठा आत्मविश्‍वास वाटतो की, केंद्रात जसा नरेंद्र मोदींनी चमत्कार केला व भाजपाला एकहीती सत्ता आणून दाखविली. त्याच धर्तीवर राज्यातही पुन्हा एकदा मोदींच्या नावाचा जप करुन भाजपाला बहुमत मिळेल. अर्थात असे होऊ शकत नाही. कारण मोदींची लाट आता ओसरण्यास सुरुवात झाली आहे आणि त्याचे प्रत्यंतर आपण अलिकडेच झालेल्या पोटनिवडणुकीत पाहिले आहे. महाराष्ट्रात भाजपाला केवळ मोदींच्या नावावर मते पडणार नाही. भाजपाप्रमाणे शिवसेनेचाही फाजिल आत्मविश्‍वास सत्तेवर बसण्याचा आहे. शिवसेनेची ताकद मुंबई, ठाणे या भागात असली तरी उर्वरीत राज्यातील अनेक भागात शिवसेना स्वबळावर लढवून सत्ता खेचून आणील अशी स्थिती नाही. सध्या शिवसेनेत व भाजपामध्ये जे मोठ्या प्रमाणात इनकमिंक सुरु झाले आहे त्यामुळे त्यांची ताकद वाढली असा त्यांना भास होतो आहे. परंतु अन्य पक्षातले असंतुष्ट पक्षात आले की पक्षाची ताकद वाढली असे म्हणणे साफ चुकीचे आहे. सत्तेच्या मोहाने आलेली ही मंडळी कधीही उडून जाऊ शकतात हे आपल्याला राज्याच्या इतिहासात नेहमीच आढळले आहे. कारण हे लोक फक्त सत्ता उपभोगण्यासाठी पक्षात येणात आणि ती नसेल तर उडून जातात. भाजपा, शिवसेना या दोन पक्षाच्या जोडीने राष्ट्रवादीलाही आपल्या ताकदीचा फाजिल आत्मविश्‍वास वाटतो आहे. राष्ट्रवादीचे सध्याचे जे बळ आहे त्यापेक्षा एकही जास्त जागा मिळवू शकत नाही उलट त्यांची ताकद कमीच होणार आहे. कॉँग्रसने गेल्या तीन विधानसभा निवडणुका आघाडीच्या बळावर लढविल्या होत्या. एकेकाळी कॉँग्रेसची स्वबळावर निवडणूक लढवून जिंकून येण्याची ताकद होती, मात्र हा इतिहास झाला. गेल्या १५ वर्षात सलग सत्ता उपभोगल्यामुळे कॉँग्रेस पक्षाची संघटना दुबळी झाली आहे. त्यांच्यांवर बिल्डर, कॉन्ट्रक्टर, दलाल यांचे वर्चस्व राहिले आहे. नेहमीप्रमाणे सत्तेच्या दलालांचा विळखा तर आहे शिवाय पक्ष कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात दुखावले आहेत. सत्ता असताना अनेकांची कामे होऊ शकलेली नाहीत. पूर्वी कॉँग्रेस पक्षाचे नेते पक्षासाठी, जनतेसाठी कामे करायचे, ही त्यांची प्रतिमा आता संपूर्णपणे बदलली आहे. विद्यमान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गेल्या तीन वर्षात स्वच्छ प्रतिमेचे सरकार देण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्या पक्षातील लोकाच त्यांचे पाय ओढू लागले आणि शेवटी निवडणुकीच्या तोंडावर अनेक तुंबलेल्या फायलिंवर सह्या करण्याची पाळी आली. मग ऐवढा काळ प्रत्येक फायली तपासून नीट अभ्यास करुन सह्या करणारे पृथ्वीराज बाबा शेवटच्या टप्प्यात एवढे हतबल का झाले असाही सवाल उपस्थित होतो. त्यामुळे सर्वसामान्य जनतेपासून नाळ तुटलेल्या कॉँग्रेस पक्षाकडून फारशी अपेक्षा आता राहिलेली नाही. त्यामुळे या निवडणुकीत त्याचा त्यांना फटका सहन करावा लागेल अशी स्थिती आहे. त्यामुळे कोणत्याही पक्षास स्पष्ट बहुमत यावेळी मिळणे अशक्यच आहे. अशावेळी पुन्हा एकदा आघाड्यांचेच सरकार सत्तेत येईल. मात्र कदाचित सध्याची समिकरणे बदलेली असतील हे मात्र नक्की. एकीकडे सर्वधर्मसमभाव मानणारे पक्ष तर दुसरीकडे हिंदुत्ववादाचा बुरखा पांघरणारे अशी आघाड्यांमध्ये विभागणी होण्याची शक्यता आहे. तसेच डाव्या पक्षांची महाराष्ट्र डावी लोकशाही समिती सरकार स्थापनेत महत्वाची भूमिका पार पाडू शकते. हिंदुत्ववादी पक्षांना सत्तेबाहेर ठेवण्यासाठी काही नवी समिकरणे जुळू शकतात. पुढचे पंधरा दिवस निवडणुकीच्या रणधुमाळीत जातील. त्यात कोणत्या पक्षाचे पारडे जड होईल त्याचा अंदाज मतदानाच्या दिवशी येऊ शकतो. निकालानंतर मात्र दिवाळीअगोदरच राजीकीय धमाके उडतील आणि राजकीय पक्षांचे विस्कटलेले संसार पुन्हा उभारले जातील असेच सद्यातरी आपण म्हणू शकतो. पहायचे काय होते ते...
------------------------------------------------------
 

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel