-->
बी. एस.येदियुरप्पा : भाजपची डोकेदुखी

बी. एस.येदियुरप्पा : भाजपची डोकेदुखी


Published on 07 Jul-2012 PRATIMA
प्रसाद केरकर 
येदियुरप्पा यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतर त्यांच्या जागी आलेल्या नवीन मुख्यमंत्र्यांना त्यांनी काही स्वस्थतेने राज्य करू दिलेले नाही. गेल्या वर्षात त्यांनी आपल्या सर्मथक आमदारांना बरोबर घेऊन किमान ीन वेळा बंड केले आणि भाजपच्या नेत्यांना तोंडघशी पाडले.

कर्नाटकातील पॉवरफुल समजल्या जाणार्‍या लिंगायत समाजाचे नेते असलेल्या येदियुरप्पा यांच्यामुळे भाजपला राज्यात सत्ता स्थापन करता आली, हे वास्तव आहे. दक्षिणेच्या राज्यातील भाजपचे पहिले सरकार कर्नाटकात स्थापन झाले खरे, परंतु येदियुरप्पाच आता हे सरकार कमकुवत कसे होईल ते पाहत आहेत. एक कुशल संघटक म्हणून परिचित असलेले येदियुरप्पा हे 1970 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या र्शीरकापूर विभागाचे कार्यवाह होते. 1972 मध्ये त्यांची स्थानिक पालिकेत नगरसेवक म्हणून निवड झाली. त्या वेळी ते जनसंघाचे तालुकाध्यक्षही होते. आणीबाणीच्या विरोधात ते सक्रिय झाले आणि त्यांना अटक झाली. आणीबाणी उठल्यानंतर त्यांची सुटका झाली. त्यानंतर स्थापन झालेल्या जनता पक्षात येदियुरप्पा सक्रिय झाले आणि हा पक्ष फुटल्यावर भाजपमध्ये सामील झाले. येथून त्यांच्या राजकीय कारकिर्दीस जोमाने सुरुवात झाली. 1985 मध्ये एका जिल्ह्याचे भाजपचे अध्यक्ष असलेले येदियुरप्पा पुढच्या तीन वर्षांत कर्नाटक राज्य भाजपचे अध्यक्ष झाले. सलग पाच वेळा ते आमदार म्हणून निवडून आले. 1994 मध्ये राज्याचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांची निवड झाली. एक आक्रमक विरोधी पक्षनेता म्हणून त्यांची अल्पावधीत लोकांना ओळख झाली आणि भाजपचे जेव्हा केव्हा सरकार येईल त्या वेळी येदियुरप्पाच मुख्यमंत्री होतील अशी सर्वांची धारण झाली. अर्थात या सर्व घडामोडी होत असताना 1999 मध्ये विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. हा राज्यातील भाजपला आणि येदियुरप्पा यांना मोठा धक्का होता. मात्र पक्षाने त्यांची विधान परिषदेवर नियुक्ती केली. 2004 मध्ये झालेल्या निवडणुकीत मात्र येदियुरप्पा निवडून आले आणि विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली. त्यानंतर जनता दल एस व भाजप यांचे संयुक्त सरकार सत्तेवर आले. या सरकारमध्ये येदियुरप्पा उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री होते. राज्याचे अर्थमंत्री म्हणून त्यांनी शेतकर्‍यांना केलेली कर्जमाफी, विद्यार्थ्यांना सायकल, भाग्यलक्ष्मी योजना अशा महत्त्वाकांक्षी योजना राबवल्याने ते लोकप्रिय झाले. 2007 मध्ये कुमारस्वामी यांनी राजीनामा देऊन येदियुरप्पा यांना मुख्यमंत्री करण्यास नकार दिला. यातून या दोन्ही पक्षांत तणाव निर्माण झाला. शेवटी राज्याचे 25 वे मुख्यमंत्री म्हणून येदियुरप्पा यांचा शपथविधी झाला खरा; परंतु जनता दलाने पाठिंबा काढून घेतल्याने त्यांचे सरकार केवळ सातच दिवस टिकले. मात्र, त्यानंतर झालेल्या निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत मिळाले आणि येदियुरप्पा पुन्हा मुख्यमंत्री झाले. मात्र त्यांच्यावर खाण उत्खनन बेकायदा मार्गाने करण्यास प्रोत्साहन देण्याचा आरोप झाला आणि यातून त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. आता मात्र आपल्याला पुन्हा एकदा मुख्यमंत्री करावे, असा आग्रह नेतृत्वाकडे धरला आहे. अर्थातच सध्या तरी त्यांना मुख्यमंत्री करणे शक्य नसल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे. 

0 Response to "बी. एस.येदियुरप्पा : भाजपची डोकेदुखी"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel