-->
ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला ऑलिम्पिकचा आधार

ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला ऑलिम्पिकचा आधार

 एके काळी पाचही खंडात साम्राज्य पसरलेल्या ब्रिटनची अर्थव्यवस्था अगदी 19व्या शतकापर्यंत जगावर आपला ठसा उमटवणारी होती. मात्र या साम्राज्याचा जसा अस्त होत गेला, तसे ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेलाही हळूहळू ग्रहण लागू लागले. आता तर जागतिक पातळीवर आलेली मंदी आणि युरोपातील काही देशांच्या अर्थव्यवस्था दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपल्याने जगात ब्रिटनची अर्थव्यवस्था सातव्या क्रमांकावर ढकलली गेली आहे. अशा स्थितीत पुढील आठवड्यात सुरू होणारे लंडन ऑलिम्पिक म्हणजे अर्थव्यवस्थेला चालना देण्याची संधी ब्रिटनसाठी चालून आली आहे. 
खरे तर सध्याची आर्थिक स्थिती पाहता ब्रिटनसाठी हा एक मोठा बोजा ठरेल, असा एक प्रवाह होता. परंतु ऑलिम्पिकचे संधीत रूपांतर कसे करता येईल याची आखणी ब्रिटनने केली. लंडन ऑलिम्पिकसाठी सुमारे 14 अब्ज डॉलर खर्च केले असले तरी विविध मार्गाने येत्या चार वर्षांत ब्रिटनमध्ये सुमारे 20 अब्ज डॉलर येतील असा अंदाज आहे. त्यामुळे ही स्पर्धा आयोजित करणे ही ब्रिटनसाठी सध्याच्या मंदीतून बाहेर पडण्यासाठी चालून आलेली एक मोठी संधीच होती. या स्पर्धेसाठी पायाभूत सुविधा उभारण्यापासून विविध कामे करण्याची ब्रिटनच्या कंपन्यांना सुमारे 10 अब्ज डॉलरची कामे यापूर्वीच मिळाली आहेत. याचे सकारात्मक पडसाद येत्या तीन महिन्यांत ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेवर दिसतील. अर्थात ऑलिम्पिकच्या निमित्ताने केवळ खेळच होणार नाहीत तर जगभरातील उद्योजक येणार आहेत. हे निमित्त साधून या काळात विविध प्रकारच्या उद्योगांच्या 17 परिषदा आयोजित करण्यात आल्या आहेत. यातून ब्रिटनला आपल्या उद्योगांना चालना देण्यासाठी मदत होईल. त्याचबरोबर या स्पर्धेच्या काळात सुमारे 45 लाख पर्यटक ब्रिटनला भेट देतील. हे पर्यटक अंदाजे तीन अब्ज पौंडाहून जास्त खर्च करतील. याचा सर्वात जास्त फायदा ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यासाठी होईल. या स्पर्धांच्या प्रायोजकातील एक लॉईस् बँकेच्या दाव्यानुसार 2017 सालापर्यंत ब्रिटनमध्ये या स्पर्धांमुळे सुमारे 25 अब्ज डॉलर येतील आणि सुमारे 62 हजार नोक-या निर्माण होतील. सध्या लंडनमधील हॉटेल हाउसफुल्ल होण्यास सुरुवात झाली आहे. तीन व पंचतारांकित हॉटेलांचे दर सरासरी चार पटीने वाढले आहेत. हे दर ऑलिम्पिकच्या काळापुरते असले तरीही ही स्पर्धा झाल्यावरही काही काळ पर्यटक येतच असतात. गेल्या वर्षी बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धा झाल्यावरही चीनला भेट देणा-या पर्यटकांची संख्या झपाट्याने वाढली. अर्थात असा फायदा प्रत्येक यजमान देशाला होतो. लंडन शहर तर ऐतिहासिक वारसा असलेले शहर असल्याने स्पर्धा झाल्यावरही या स्पर्धेच्या निमित्ताने या शहराने कशी कात टाकली हे पाहण्यासाठी लाखो लोक पुढील काही वर्षे नक्कीच येणार आहेत. येणारा प्रत्येक पर्यटक ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावेल. क्वीन्स एलिझाबेथ ऑलिम्पिक पार्क हे ऑलिम्पिक शहर उभारण्यात आले आहे,  तो पूर्वेकडील लंडनचा भाग म्हणजे तसा मागासलेलाच होता. परंतु आता त्याचा या स्पर्धेच्या निमित्ताने पूर्ण कायापालट झालेला बघायला मोठ्या संख्येने पर्यटक येतील. गेल्या काही वर्षांत ऑलिम्पिक व्हिलेजच्या उभारणीसाठी अनेक कामे सुरू  होती. यामुळे ब्रिटनमध्ये मोठ्या रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या. 
लंडन शहराने या स्पर्धेच्या निमित्ताने संपूर्ण कात टाकली आहे. या शहराची रेल्वे शंभर वर्षे जुनी असल्याने तिचे आधुनिकीकरण करण्यात आले. व्हिलेजला जोडणारे काही नवे मार्ग टाकण्यात आले. ट्रान्सपोर्ट ऑफ लंडनकडे हे काम सुपूर्द करण्यात आले होते. त्यांनी आपले काम चोख पार पाडले. अर्थात, लंडन शहराचे रुपडे बदलले. थेम्स नदीच्या काठावरून नव्याने केबल कार उभारण्यात आली आहे. या केबल कारमधून संपूर्ण लंडनचे दर्शन तर होईलच, शिवाय ऑलिम्पिक व्हिलेजला जाणे सोपे होईल. त्यामुळे अशा प्रकारे लंडन पाहणे ही पर्यटकांसाठी एक मोठी पर्वणी असेल. 
जाहिरातदारांसाठी ऑलिम्पिक स्पर्धा ही आपल्या मालाचा प्रचार व प्रसार करण्याची एक मोठी चालून आलेली संधी असते. ब्रिटनमधील ग्राहोपयोगी वस्तंूचे उत्पादन करणारी सर्वात मोठी कंपनी प्रॉक्टर अँड गॅम्बलने लंडन ऑलिम्पिकसाठी फार मोठे बजेट ठेवले आहे. या मागचे महत्त्वाचे कारण म्हणजे, या कंपनीचा कारभार बहुराष्ट्रीय असला तरी त्यांंचा मोठ्या संख्येने ग्राहक ब्रिटन व युरोपात आहे. बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सलग 17 रात्री विविध प्रकारचे सामने पाहण्यासाठी दररोज सुमारे तीन कोटी प्रेक्षक टीव्हीपुढे नजरा खिळवून बसत असत. जाहिरातदारांसाठी याच वेळी आपल्या उत्पादनांची जाहिरात करणे ही एक मोठी पर्वणी असते. बीजिंग ऑलिम्पिकसाठी जाहिरातदारांनी तब्बल 97 अब्ज डॉलर खर्च केले होते. आत यंदा किती अब्ज डॉलरच्या   जाहिराती मिळतील त्याचा अंदाज नसला तरी गेल्या वेळेपेक्षा यंदा जास्त असतील असा होरा आहे. 
ऑलिम्पिकच्या निमित्ताने ब्रिटनमध्ये ही जी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक झाली त्याचा अर्थव्यवस्थेला फायदा झाला. गोल्डमन सॅच या जागतिक सल्लागार कंपनीने तयार केलेल्या एका अहवालानुसार, ब्रिटनचे सकल राष्ट्रीय उत्पन्न चालू वर्षात 0.3 टक्क्यावरून वाढून 0.4 टक्क्यांवर जाईल. गेली काही वर्षे ब्रिटनमध्ये जागांच्या किमती घसरत होत्या. त्याला आता आळा बसला असून काही निवडक ठिकाणच्या किमतीही वाढू लागल्या आहेत. समभागांच्या किमतीही गेल्या वर्षात लंडन शेअर बाजारात वधारण्यास सुरुवात झाली आहे. या सर्व घडामोडी म्हणजे ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळाल्याची चिन्हे आहेत. त्यामुळे लंडन ऑलिम्पिक ही ब्रिटनसाठी सध्याच्या अर्थिक पेचप्रसंगावर मात करण्यासाठी चांगली संधी चालून आली. अर्थात सध्याच्या आर्थिक पेचप्रसंगावर कायम स्वरूपी तोडगा काढणे ब्रिटनला शक्य नसले तरीही ऑलिम्पिक ही बुडत्याला काडीचा आधार ठरावा.
prasadkerkar73@gmail.com

0 Response to "ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला ऑलिम्पिकचा आधार"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel