-->
प्रतीक्षा वरुणराजाची!

प्रतीक्षा वरुणराजाची!

आषाढ संपून आता श्रावण सुरू व्हायला जेमतेम चार दिवस शिल्लक असताना अजून वरुणराजाने दडी मारली आहे. खरे तर आषाढात पाऊस भरपूर कोसळून धरतीमातेला आणि शेतक-याला मोठा दिलासा देतो. पुढील वर्ष आता कसलीच चिंता नाही, असे तो या बरसण्यातून जणू सांगत असतो. यंदा जून महिन्याच्या शेवटी पावसाला सुरुवात होऊन जुलैमध्ये म्हणजे आषाढात चांगलाच बरसेल, असा अनेकांचा असलेला होराही त्याने चुकविला. हवामान खात्याला पाऊस जरूर चकवा देत असतो; परंतु या धरतीच्या लेकरांवर कधी नाराज होत नाही. गेल्या दहा वर्षांत तरी पावसाने अपेक्षेची सरासरी गाठली आहे. यंदा मात्र राज्यात अजून तरी सरासरी 40 ते 60 टक्केच पाऊस पडल्याने सर्वांच्याच हृदयाचा ठोका चुकण्याची वेळ आता आली आहे. कोकण व विदर्भाच्या काही भागात पाऊस समाधानकारक आहे, हाच काय तो अपवाद. राज्यातील नऊ जिल्हे वगळता संपूर्ण महाराष्ट्र अजूनही कोरडाच आहे. गेल्या वर्षी पाऊस सरासरीएवढा झाला असला तरी तो उशिराच सुरू झाला होता; परंतु जुलैपासून त्याने चांगला जोर धरला. यंदा मात्र पावसाने अजूनही आपले अस्तित्व जाणवून दिलेले नाही. काही भाग वगळता संपूर्ण देशभर काहीशी स्थिती अशीच आहे. देशाच्या तुलनेत महाराष्ट्र, कर्नाटक या दोन राज्यांतील स्थिती फारच वाईट आहे. कमी पावसामुळे बाजरी, ज्वारी, मक्याची पिके निकृष्ट येण्याची शक्यता आहे. डाळींचे दर आणखी कडाडतील. याचा एकूणच परिणाम महागाई वाढण्यात होईल. अनेक भागांत 50 टक्के पेरण्या झाल्या असल्या तरी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चांगला पाऊस झाल्यास शेतकºयांना काही पिकांच्या पेरण्या लांबविता येऊ शकतील, तर काही भागांतील शेतक-यांवर दुबार पेरणीची स्थिती यंदाही येऊ घातली आहे. हवामान खात्याचा अंदाजानुसार अजून चार-पाच दिवस तरी मोठ्या पावसाची अपेक्षा नाही. राज्यातील सर्व धरणांचा साठा केवळ 15 टक्क्यांच्या आसपासच आहे.  मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरात पाणी कपातीची टांगती तलवार आहे. राज्याचे सुमारे अर्धे क्षेत्र अवर्षणप्रवण असते. या क्षेत्राला पहिल्या पावसाने दिलासा मिळतो आणि टँकरचे दिवस विसरून पुन्हा एकदा शेतकरी शेतीच्या कामाला लागतो.  यंदा मात्र पावसाळा मध्यावर आला तरी टँकरचे दिवस संपलेले नाहीत. सरकारने सुमारे अडीच हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले असले हे काही पुरेसे नाही. टंचाईग्रस्त शेतक-यांना दिलेल्या सवलती तसेच जनावरांना चारा 31 जुलैपर्यंत व आवश्यकता वाटल्यास त्यानंतरही पुरविला जाईल, अशी सरकारने घोषणा केली आहे; परंतु सरकारच्या या घोषणा शेतकºयांना काही दिलासादायक ठरत नाहीत. यातून शेतक-यांच्या नावाखाली टँकर व चारामाफियाच आपले उखळ पांढरे करून घेतात, अशी जाहीर टीका होते. सरकारवरील हे आरोप कुणी विरोधी पक्षांचे सदस्य करीत नाहीत तर सत्ताधारी पक्षाचे आमदारच विधानसभेत करतात. सरकारी यंत्रणेचे फायदे गरजवंतापर्यंत कसे पोहोचत नाहीत आणि सरकारी योजनांचे लोणी खाणारे कसे माजतात, हे आरोपावरून स्पष्ट दिसते. राज्याच्या स्थापनेनंतर अर्धे शतक लोटल्यावरही आपण दुष्काळ पूर्णपणे हटवू शकलेलो नाही ही राज्यकर्त्यांच्या दृष्टीने लाजिरवाणी बाब आहे. दरवर्षी आपण जानेवारी महिना सुरू झाला की हजारो गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यास सुरुवात करतो. पावसाळा झाला की सगळेच जण उसासा सोडतात आणि पुन्हा जानेवारीत टँकरने पाणीपुरवठा करण्याचे दुष्टचक्र सुरू होते. वर्षानुवर्षे हा दुष्काळाचा महिमा सुरू आहे. यामागे निव्वळ एकमेव कारण आहे ते म्हणजे नियोजनाचा अभाव. पाणी वापराच्या क्षेत्रात पाणी मोजून मापून वापरले गेले पाहिजे. पीक पद्धतीवरदेखील नियंत्रण आणले पाहिजे. ऊस, केळीसारख्या पिकाचे क्षेत्र मर्यादित करावे लागेल. यातून  पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा हिशेब मिळेल आणि पर्यायाने ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल; पण असे नियोजन करण्याची सरकारची राजकीय इच्छा नाही. आतादेखील देशाच्या काही भागांत म्हणजे ईशान्य भारतात नेहमीप्रमाणे भरपूर पाऊस आहे. येथे काही राज्यांत पूर आला आहे. मात्र, नदीजोड प्रकल्प कागदावरच राहिल्याने आपल्याकडे हे पाणी देशाच्या अन्य भागात नेऊ शकत नाही. त्यामुळे इकडेही आपल्याला नियोजनाचा अभावच दिसतो. या नियोजनाच्या अभावाचा फटका दरवर्षी बळीराजा भोगत आहे. आपल्याकडे राज्यात कोकणात सर्वात जास्त पाऊस पडतो. मात्र, बहुतांशी हे पाणी समुद्रात वाहून जाते. कोकणातील या पाण्याची साठवणूक करून त्याचा राज्यातील अन्य भागातील जनतेला कसा वापर करता येईल याचा विचार आपल्या नियोजनकर्त्यांनी कधी केला नाही. आतादेखील आपण पावसाची वाट पाहत मख्खपणे बसलो आहोत; परंतु आजवर 70 टक्के यशस्वी ठरलेला कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यासाठी पावले उचलत नाही ही खेदाची बाब आहे. आयआयटीत शिकलेले व विदेशातातील उच्चविद्याभूषित डॉ. राजा मराठे यांनी पावसाला खेचून आणणारे ‘वरुणयंत्र’ विकसित केले आहे. त्यांनी तयार केलेले हे यंत्र म्हणजे अंधश्रद्धा नव्हे. या यंत्रामागचे शास्त्रीय कारण त्यांनी समजावून सांगितले आहे आणि यातून शंभर टक्के पाऊस पडतो, असादेखील ते दावा करीत नाहीत. पावसासाठी केवळ दैवाधीन राहण्यापेक्षा डॉ. मराठे यांचा प्रयोग करणे काही चुकीचे नाही; परंतु नियोजनशून्य राजकारणी हेदेखील करायला पुढे येत नाहीत, ही खेदाची बाब आहे. त्यामुळे आता वरुणराजाच्या आगमनाची आराधना करण्याशिवाय आपल्याकडे कोणता उपाय नाही!

0 Response to "प्रतीक्षा वरुणराजाची!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel