-->
स्वागतार्ह प्रशिक्षण

स्वागतार्ह प्रशिक्षण

संपादकीय पान गुरुवार दि. 15 डिसेंबर 2016 च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
स्वागतार्ह प्रशिक्षण
हल्ली कोणत्याही व्यवसायात प्रशिक्षण घेणे ही आता गरजेची बाब झाली आहे. अगदी साध्या मच्छिमारीपासून ते चपला शिवण्याच्या कलेपर्यंत. स्वयंरोजगाराच्या या विविध कला आपल्याकडे पूर्वापार चालत आल्या आहेत. पूर्वीच्या काळात यातूनच खेडी स्वयंपूर्ण होत गेली होती. आता मात्र नागरीकरणाच्या काळात या सर्व कलांचे संदर्भ बदलत गेले आहेत. मच्छिमारी हा खरे तर वडिलोपार्जित केला जाणारा व्यवसाय होता. कोळी बांधवांनी आपला हा व्यवसाय व यातून आलेली संस्कृती आजवर जपली आहे. प्रत्येक किनारपट्टीवर त्याचे आपल्याला दर्शन होते. परंतु आताच्या या बदलत्या काळात मच्छिमारांनाही प्रशिक्षण घेऊन त्या उद्योगात तरबेज होण्याची वेळ आली आहे. याीतल जुन्या जाणत्या लोकांना हे काहीसे पसंत पडणार नाही. मात्र काळाची गरज ओळखून तरुण पिढी मच्छिमारीतचे प्रशिक्षण घेण्यासाठी तयार झाली आहे. असाच प्रकारचे मच्छीमारांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी अत्याधुनिक मासेमारी नौका रायगड जिल्ह्यात दाखल झाली आहे. अत्याधुनिक मासेमारी यंत्रणांनी सज्ज असणारी ही राज्यातील पहिली मच्छीमार प्रशिक्षण नौका आहे. राष्ट्रीय कृषी विकास संस्थेच्या वतीने मत्स्यप्रबोधिनी ही प्रशिक्षण नौका उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्याच्या मत्स्यव्यवसाय विभागाकडून अलिबाग येथे मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र चालविले जाते. येथे तरुणांना सागरी मत्स्यव्यवसायाचे प्रशिक्षण दिले जाते. यात माशांचे विविध प्रकार, मासे पकडण्यासाठी वापरल्या जाणार्‍या जाळ्यांचे प्रकार, बोटींचे इंजिन, त्याची दुरुस्ती, फिश फाइंडर आणि वायरलेससारख्या अत्याधुनिक यंत्रणांचा वापर यांचे प्रशिक्षण मच्छीमारांना दिले जाते. सद्याच्या काळात मच्छिमारांना केवळ माशांची माहिती असून चालणार नाही तर मच्छिमार बोटीतील तंत्रज्ञानाचीही माहिती पुरविणे गरजेचे आहे. भर समुद्रात जर एखादी बोट बंद पडली तर ती दुरुस्त करण्याचे ज्ञान मच्छिमारांना असण्याची गरज असते. यापूर्वी प्रशिक्षण देण्यासाठी मच्छीमारांच्या लहान यांत्रिक नौकांचा वापर केला जात असे. आता मात्र मच्छीमारांना प्रशिक्षण देण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणांनी सज्ज असलेली सुसज्ज नौका उपलब्ध असणार आहे. सुमारे एक कोटी रुपयांच्या या नौकेवर प्रशिक्षणासाठी लागणार्‍या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मच्छीमार प्रशिक्षणासाठी राज्यात उपलब्ध झालेली ही पहिली सुसज्ज नौका आहे. रायगड जिल्ह्यात मच्छिमारी मोठ्या प्रमाणावर चालते व त्यावर हजारो कुटुंबाची रोजीरोटी अवलंबून असते. रायगड जिल्ह्यात 3 हजार 444 यांत्रिकी तर 1 हजार 499 बिगर यांत्रिकी नौका आहेत. या नौकांवर जवळपास तीस ते पस्तीस हजार लोक काम करतात. या व्यवसायातून दरवर्षी साधारणपणे 40 हजार मेट्रिक टन मत्स्य उत्पादन घेतले जाते. मात्र तरुण पिढीने या व्यवसायाकडे पाठ फिरवायला सुरुवात केली आहे. या व्यवसायात काम करण्याएवजी कोळी बांधव सरकारी नोकरीत काम करणे पसंत करतात. त्यामुळे बोटीवर काम करायला माणसे मिळणे कठीण झाले आहे. मासेमारी व्यवसायाला नाखवा आणि खलाशी यांची चणचण भासायला लागली आहे. चांगला पगार देऊनही बोटींवर काम करायला कोणी इच्छुक नसल्याचे दिसून येत आहे. रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टीवर बोटींवर काम करण्यासाटी बिहार, उत्तरप्रदेशातून भैये येतात. त्याऐवजी मराठी स्थानिक तरुणांना यात मोठा रोजगार मिळू शकतो. मात्र त्यांना योग्य व्यवसायिक प्रशिक्षण दिल्यास ते अधिक कार्यक्षमतेने कार्य करु शकतील. यासाठी मासेमारी व्यवसायाला अधुनिक तंत्रज्ञानाची साथ देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. मच्छीमारांचे शारीरिक श्रम कमी करून, चांगले उत्पादन मिळवून त्यातून चांगले उत्पन्न कसे मिलेल यासाठी प्रयत्न केले जात आहेत. म्हणूनच प्रशिक्षणासाठी अत्याधुनिक यंत्रणांनी सज्ज असणारी मासेमारी नौका उपलब्ध करून देण्याच्या या प्रयत्नाचे स्वागत.

0 Response to "स्वागतार्ह प्रशिक्षण"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel