-->
रुसलेला आंबा

रुसलेला आंबा

शनिवार दि. 04 मे 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
रुसलेला आंबा
कोकणचा आंबा सध्या खाद्यप्रेमींवर रुसला आहे. कारण दरवर्षी चवीने खाणार्‍यांना आंबा यंदा खाताना खिशाला मोठी चाट द्यावी लागणार आहे. यंदा खरे तर विक्रमी उत्पादन होईल अशी अपेक्षा होती, परंतु पिकांवर पडलेले रोग, अवेळी आलेला पाऊस यामुळे आंब्याचे उत्पादन झपाट्याने घसरले आहे. सुरुवातीला आंबा चांगलाच मोहोर धरेल असे वाटत होते, परंतु पिकाच्या मध्यला काळात अनेक संकटे आली व फळे जळली. परिणामी या वर्षी आंबा उत्पादक शेतकर्‍यांना मोठे नुकसान सहन करावे लागणार असल्याचे स्पष्ट झालेे. उन्हाळ्याची चाहूल लागली की आंब्याचे वेध लागू लागतात. कोकणातील आंबा हे खाद्यप्रेमिंचे विशेष आकर्षण असते. कोकणाच्या या आंब्याची चव अन्यत्र कोणत्याही आंब्याला नसल्याने या आंब्याला बाजारपेठेत मोठी मागणी असते. मार्च ते पाऊस पडेपर्यंत जूनपर्यंत मुंबईसह राज्य व देशातील प्रमुख बाजारपेठांमध्ये सर्वाधिक विक्री आंब्याचीच होत असते. मुंबईमध्यचे दरवर्षी 500 कोटींपेक्षा जास्त उलाढाल या व्यवसायामधून होत आहे. 300 ते 450 कोटी रुपयांचे आंबे जगातील विविध देशांमध्ये निर्यात होत असतात. 600 कोटींपेक्षा जास्त आमरसाची निर्यात होत आहे. मुंबई बाजार समितीमध्येही रोज 50 हजार ते 1 लाख पेटी आंब्याची विक्री होत असते. प्रत्येक वर्षी डिसेंबरअखेर किंवा जानेवारीमध्ये कोकणातून हापूसची पहिली पेटी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी येत असते. या वर्षी 5 नोव्हेंबरलाच आंबा विक्रीसाठी आला. खरे तर यंदाचे आब्याचे हे आगमन खूपच लवकर होते. परंतु हे आगमन फार काही टिकणार नाही याची त्यावेळी कल्पना नव्हती. आंबा व्यापार्‍यांमध्येही सुरुवातीस उत्साहाचे वातावरण होत. पण यावेली अवेळी पडलेला पाऊस व पिकावर पडलेला रोग याचा मोठ्या प्रमाणात परिणाम झाला. तुडतुड्यांमुळे आंब्यावर काळे डाग पडण्यास सुरुवात झाली. रोगामुळे पीक धोक्यात आले असताना त्या संकटात थंडीने वाढ केली. हिवाळ्यात थंडी खूप पडू लागली व थंडीचा कालावधीही वाढला. यामुळे अपेक्षित पीक आलेच नाही. प्रत्येक वर्षी फेब्रुवारीच्या अखेरीस आंबा मार्केटमध्ये विक्रीसाठी येतो. या वर्षी तो लवकर जानेवारी अखेरीसच विक्रीसाठी येण्यास सुरुवात झाली; पण त्याचे प्रमाण खूपच कमी होते. मार्चच्या सुरुवातीपासून मुंबई बाजार समितीमध्ये 50 हजार ते एक लाख पेट्यांची आवक होत असते. एप्रिलमध्ये सरासरी 60 ते एक लाख पेट्यांमधून आंबा विक्रीसाठी येत असतो; पण या वर्षी सरासरी 40 ते 60 हजार पेट्यांपेक्षा जास्त आवक होताना दिसत नाही. नाणार प्रकल्पामुळे येथील आंब्याचे पिक संपुष्टात येईल अशी अनेक शेतकर्‍यांची भीती होती. परंतु नाणार हद्दपार केल्याचा आनंद त्यांच्या मनात काही फार काळ टिकला नाही. नाणारही गेले आणि यंदाचे पीकही गेले हाती आले धुपाटणे अशी स्थिती या शेतकर्‍याची झाली आहे. कोकणातील आंब्याला जगभर मागणी आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांतील शेती अर्थव्यवस्थेत हापूस आंब्याचा सिंहाचा वाटा आहे. परंतु या वर्षी 50 टक्के उत्पादन घटणार आहे, अशी भीती व्यक्त होऊ लागली आहे. काही ठिकाणी तर आंब्याचे उत्पादन 30 टक्क्यांवर घसरले आहे. वातावरणातील बदलामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याची प्रतिक्रिया शेतकरीही व्यक्त करू लागले आहेत. आंब्याच्या पिकावरली रोगावर नक्की कोणते औषध वापरायचे व त्याचा प्रादुर्भाव कमी कसा करायचा याविषयी शेतकर्‍यांना नीट मार्गदर्शन कृषी विद्यापीठ व शासकीय स्तरावरूनही झाले नसल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली आहे. मुंबईमध्ये कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरातमधूनही आंबा मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येत असतो. दक्षिणेकडील राज्यांमध्येही या वर्षी अपेक्षित उत्पन्न झालेले नाही. कोकण व देशातील आंबा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. मात्र तसे पाहता कोकणातील आंब्याला मागणीही जास्त असते व दर चांगला मिळतो. गेल्या तीन वर्षांपासून आंबा व आमरसाच्या निर्यातीचे प्रमाणही कमी होऊ लागले आहे. 2016-17 मध्ये 443 कोटी रुपयांची आंबा निर्यात झाली होती. 2017 - 18 मध्ये ही उलाढाल कमी होत 382 कोटींवर आली. या दोन वर्षांत आमरसाची निर्यात 846 कोटींवरून 673 कोटींवर आली आहे. निर्यात होणार्‍या फळांमध्ये द्राक्षानंतर आंबा दुसर्‍या क्रमांकावर आहे. तसे पाहता हे पळ फार नाजूक व संदेशनाक्षम आहे. मात्र त्यामुळेच या फळाला मागणीही तेवढीतच जास्त आहे. पण या वर्षीच्या हंगामामध्येही निर्यातही कमी होण्याची शक्यता आहे. तीव्र उकाड्यामुळे मार्केटमध्ये आलेल्या मालाची वेळेत विक्री होणे आवश्यक आहे. विक्री होण्यास विलंब झाल्यास आंबा खराब होण्याची व त्याचा दर घसरण्याचीही शक्यता आहे. कोकणातील शेतकर्‍यांच्या अर्थव्यवस्थेचा कणा टिकविण्यासाठी सरकार व कृषी विद्यापीठांनीही आंबा उत्पादन वाढविण्याकडे आणि रोगराईपासून पीक वाचविण्यासाठी ठोस प्रयत्न केले पाहिजेत, अन्यथा या शेतकर्‍यांना भविष्यातही मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागणार आहे. रत्नागिरी हापूसला आता आन्तरराष्ट्रीय नामांकन मिळाले आहे, हे देखील तेवढेच खरे असले तरी आंब्याचे उत्पादन घसरत चालले आहे हे दुर्दैवी आहे. महत्वाचे नाणार अस्तित्वात नसूनही हे होत आहे, हे नाणारच्या विरोधकांनी लक्षात घ्यावे.
--------------------------------------------------------------

0 Response to "रुसलेला आंबा"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel