-->
केम छो ट्रम्प?

केम छो ट्रम्प?

मंगळवार दि. 18 फेब्रुवारी 2020 च्या अंकासाठी अग्रलेख- 
----------------------------------------------
केम छो ट्रम्प?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ड्रम हे येत्या आठवड्यात भारत भेटीवर येत आहेत. त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी मोदी सरकारने सुरु केली आहे. एका बलाढ्य देशाचा राष्ट्रप्रमुखाचे स्वागत करताना कोणतीही कुचराई होऊ नये याची खबरदारी घेतलीच गेली पाहिजे. परंतु ट्रम्प भारताला या भेटीत नेमके काय देणार की केवळ हवेतल्याच गप्पा होणार हे पहावे लागेल. आजपासून बरोबर 20 वर्षापूर्वी तत्कालीन अमेरिकन राष्ट्रपती बिल क्लिंटन भारतात आले होते. त्यांच्या भेटीला विशेष महत्व होते कारण त्यांची भेट ही शीतयुध्दानंतरची होती. शीतयुध्दाचे जगावरचे ढग संपुष्टात आल्यावर अमेरिकन राष्ट्रप्रमुखाने भारताला भेट देण्याची ही पहिलीच वेळ होती. या भेटीनंतर उभय देशातील संबंध सुरळीत होण्यस सुरुवात झाली. त्याचवेळी क्लिंटन यांनी भारतीयांना जादा व्हिसा देण्याची घोषणा केली व तरुण भारतीयांचा अमेरिकेकडे ओघ सुरु झाला. आज ट्रम्प यांचे धोरण नेमके उलटे असले तरीही भारताला व्यापार, संशोधन, संरक्षण यासाठी अमेरिककडे धाव घ्यावीच लागते. ट्रम्प यांची अध्यक्षपदाची निवडणूक तोंडावर आली असताना त्यांना तेथील भारतीयांच्या पाठिंब्याची गरज आहे. गेल्या वेळी नरेंद्र मोदी अमेरिकेत गेले त्यावेळी हाऊ डी मोदी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याला भारतातील लोकसभा निवडणुकीची पार्श्‍वभूमी होती. आता त्याचीच उतराई करण्यासाठी ट्रम्प यांना अहमदाबादमध्ये नेऊन केम छो ट्रम्प हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ट्रम्प यांची उतराई यातून केली जाणार आहे असे म्हटल्यास हास्यास्पद ठरु नये. ट्रम्प यांच्या भारत भेटीत ते प्रथम अहमदाबादला उतरुन नंतर दिल्लीकडे प्रयाण करतील. या दोन शहरांना भेटी देणार आहेत. अर्थात मोदी यांनी जपान, चीन या देशांच्या प्रमुखांनाही आपल्या गुजरातची सफर केली होती. आपण आता गुजरातचे मुख्यमंत्री नाही तर आता पंतप्रधान आहेत, हे बहुदा मोदी विसरले असावेत म्हणूनच ते जगातील प्रमुख व्यक्तीनाच गुजरातची सफर करवतात. खरे तर ट्रम्प यांना मुंबई या देशाच्या आर्थिक राजधानीत आणावयास पाहिजे होते. आजवर अनेक अमेरिकन राष्ट्रप्रमुखांच्या दिल्लीपाठोपाठ मुंबईच्या भेटी झाल्या आहेत. परंतु मोदी अजूनही देशाचा विचार न करता केवळ आपल्या गृह राज्याचा विचार करतात पाहून वाईट वाटते. सर्वात दुर्दैवाची बाब म्हणजे गुजरातमधील झोपडपट्ट्या ट्रम्प महाशयांना दिसू नयेत म्हणून त्यांच्याभोवती भिंती उभारल्या जात आहेत. मोदींनी 15 वर्षाच्या आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात विकास काय केला हेच यावरुन दिसते. आपल्याकडे सर्वच मोठ्या, लहान शहरात झोपड्या आहेत व हे वास्तव जगाला माहित आहे. ते लपवायचे कशाला? अशा प्रकारे देशाची गरीबी लपवून मोदींना ट्रम्प यांना काय सांगावयाचे आहे? इंदिरा गांधींच्या गरीबी हटाव घोषणेची टिंगल टवाळी करणारे हेच सत्ताधारी सध्या गरीबी छुपावचे नाटक कशासाठी करीत आहेत? ट्रम्प यांचे धोरण हे अमेरिकेचे हित प्राधान्याने असे असल्याने भारताच्या पदरात या भेटीने फारसे काही पडेल असे दिसत नाही. एखादा लहानसातरी सहकार्य करार करावा असे मोदी सरकारला वाटत आहे, परंतु त्याची तशा प्रकारची कोणतीच तयारी अमेरिकेकडून केली जात नाही. सध्या अमेरिकाच मोठ्या आर्थिक मंदीतून वाटचाल करीत आहे. त्यांना भारतान आपल्याच वस्तू जास्त प्रमाणात खरेदी कराव्यात असे वाटते. अमेरिकन चीज पासून फायटर विमाने भारताने खरेदी करावीत यासाठी अमेरिका प्रयत्नशील आहे. यापूर्वीचे अमेरिकन अध्यक्ष क्लिंटन, बुश, ओबामा यांनी भारताविषयी जी भूमिका घेतली होती, प्रामुख्याने काश्मिरविषयी तिसर्‍या कोणत्याही देशाच्या हस्तक्षेप नको या भूमिकेपासून ट्रम्प दूर गेले आहेत. एक तर ट्रम्प यांच्या भूमिकेत सातत्य नसते. अनेकदा त्यांची जगात त्याबद्दल टिंगलटवाळी केली जाते. भारतात अमेरिकेतील कंपन्यांची गुंतवणूक यावी, अनेक भारतीय जे कायम स्वरुपी व्हिसा मिळावा याच्या प्रतिक्षेत आहेत त्याविषयी काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. अमेरिकेला जर भारताला खूष करावयचे असेल तर त्यांची संरक्षण सामुग्री खरेदी करावी लागेल तसेच त्यांच्या मालाचा अजून जास्त प्रमाणात मुक्तव्दार करावे लागेल. आजवर भारत व पाकिस्तान या दोघांनाही शस्त्रास्त्रे विकून अमेरिका आपला माल खपवित आहे. त्यांना भारत पाकिस्तान चा प्रश्‍न सुटावा असे कधीच वाटत नाही, हे वास्तव आपण पाहिले पाहिजे. ट्रम्प याहून काही वेगळे करणार आहेत का, हा सवाल आहे. आज अमेरिकेत मोठ्या संख्येने भारतीय आहेत, अगदी चांगल्या पदावर ते पोहोचलेले आहेत. त्यात त्यांचे कर्तुत्वच आहे. भारताची ही बुध्दीमत्ता अमेरिकेच्या दावणीला बांधली गेली आहे. भारतातून अमेरिकेत असो किंवा अन्य कुठल्याही विकसीत देशात तरुणाई जाण्याचा ओघ काही थांबत नाही. एक प्रकारे ही राष्ट्रीय हानीच आहे. याविषयी बोलण्यास कुणीच तयार होत नाही. ट्रम्पना भारतात आणून मोदी आणखी एक इव्हेन्ट करतील, एवढाच मर्यादीत लाभ या दौर्‍याचा होईल यात काही शंका नाही.
---------------------------------------------------------

Related Posts

0 Response to "केम छो ट्रम्प?"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel