-->
रेल्वेची घसरण / महाराजा विक्रीला

रेल्वेची घसरण / महाराजा विक्रीला

बुधवार दि. 29 जानेवारी 2020 च्या अंकासाठी अग्रलेख- 
----------------------------------------------
रेल्वेची घसरण
देशातील सर्वसामान्यांच्या वाहतुकीचे एक महत्वाचे साधन असलेली भारतीय रेल्वे आता घसरणीला लागली आहे. भारतीय रेल्वेचे प्रवासी मोठ्या प्रमाणात घटले असून, प्रवासी वाहतुकीमुळे मिळणार्‍या उत्पन्नामध्ये रेल्वेला 400 कोटी रुपयांचा फटका बसला आहे. मालवाहतुकीतील रेल्वेचे उत्पन्न मात्र वाढले आहे. रेल्वेला प्रवासी तिकिट विक्रीतून मिळणारे उत्पन्न सुमारे 400 कोटी रुपयांनी घटले आहे. तर दुसरीकडे मालवाहतुकीतून मिळणार्‍या उत्पन्नात वाढ झाली असून, यामुळे रेल्वेला 2,800 कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. यापूर्वी रेल्वेला मालवाहतुकीतून मिळणार्‍या उत्पन्नात 3,901 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला होता. या तुलनेने रेल्वेला मालवाहतुकीत झालेला नफा उत्साहवर्धक म्हणावा लागेल. मालवाहतूक वाढावी, यासाठी रेल्वेने बरेच प्रयत्न केले होते. त्याचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते चंद्रशेखर गौर यांनी माहिती अधिकाराअंतर्गत रेल्वेकडे अर्ज सादर केला होता, या अर्जाला उत्तर देताना रेल्वेने माहिती दिली आहे. यानुसार आर्थिक वर्ष 2019-20 च्या पहिल्या तिमाहीत प्रवासी वाहतुकीमुळे रेल्वेला 13,398.92 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. दुसर्‍या तिमाहीत या उत्पन्नात घसरण होऊन ते 13,243.81 कोटी रुपयांवर आले. तर तिसर्‍या तिमाहीत ही घसरण कायम राहून हे उत्पन्न 12,844.37 कोटी रुपयांवर पोहोचले. मालवाहतुकीमध्ये पहिल्या तिमाहीत रेल्वेला 29,066.92 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. दुसर्‍या तिमाहीत या उत्पन्नात घसरण होत ते 25,163.13 कोटी रुपयांवर आले. तिसर्‍या तिमाहीत या उत्पन्नात वाढ होऊन ते 28,032.80 कोटी रुपयांवर पोहोचले. रेल्वेचा पूर्वी स्वतंत्र अर्थसंकल्प मांडला जात असे परंतु मोदी सरकारने ही प्रथा मोडीस काढली. मात्र ज्यावेळी रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प मांडला जात असे त्यावेळी यातील प्रत्येक तरतुदींची चर्चा होत असे. जनतेच्या रेल्वेकडून अपेक्षा मांडल्या जात असत. आता मात्र हे सर्व बंद झाले आहे. यावेळी सरकारने नववर्षाच्या पहिल्याच दिवशी रेल्वेची भाडेवाढ केली. याचा फटका दिर्घपल्ल्याच्या प्रवासांना बसला. रेल्वे हा देशातील सर्वात मोठा रोजगार देणारे सरकारी खाते असले तरी जनतेच्या हितासाठी याला केवळ नफ्याचे कोंदण देऊन चालणार नाही. जगात सर्वत्र सार्वजनिक वाहतूक सेवा या तोट्यात असतात, कारण ही सेवाच मुळात जनतेसाठी आहे. आपल्याकडे रेल्वेचे जाळे अवाढव्य आहे. त्याचे आधुनिकीकरण करण्याची आवश्यकता आहे. त्याऐवजी आपण मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा घाट घातला जात आहे. त्यामुळे रेल्वेने नेमके आपल्याला कोणत्या वर्गासाठी व कशासाठी काम करायवयाचे आहे ते ठरविण्याची आवश्यकता आहे.   
महाराजा विक्रीला
कर्जाच्या गर्त्यात सापडलेली सरकारी विमान वाहतूक कंपनी एअर इंडियाची शंभर टक्के विक्री करण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयावर भाजपाचे खासदार सुब्रम्हण्यम स्वामी यांनी कठोर टिका करुन सरकारला घरचा आहेर दिला आहे. दोन वर्षापूर्वी सरकारने एअर इंडियाचे 75 टक्के भांडवल विकण्याचे जाहीर केले होते. मात्र त्याला कुणीच खरेदीदार न मिळाल्याने आता शंभर टक्के समभाग विकून ही कंपनी खासगी उद्योगसमूहाच्या ताब्यात देण्याची तयारी दाखविली आहे. एअर इंडियावर सुमारे 60 हजार कोटी रुपयांचे कर्ज असून आता कंपनीने या कर्जातील काही वाटा उचलण्याची तयारी दाखविल्याचे समजते. त्यासोबत एअर इंडियाची उपकंपनी असलेल्या एअर इंडिया एक्स्प्रेेस या लो कॉस्ट एअरलाईनमधील भांडवलही या नवीन खरेदीदाराला मिळेल. त्याचबरोबर एअर इंडियाच्या मालकीची असलेल्या एका सेवा कंपनीतीलही काही भांडवल विकले जाणार आहे. एअर इंडियाच्या खरेदीसाठी जागतिक पातळीवर निविदा असल्यातरी सध्या अन्य नामवंत कंपन्या या खरेदीत काही रस दाखवितील असे वाटत नाही. कारण सध्या अनेक हवाई कंपन्या मंदीत हेलकावे खात असून असा स्थितीत त्या कंपन्या या भारतीय माहाराजाचा बोजा स्वीकारतील असे वाटत नाही. टाटा या कंपनीच्या खरेदीत इच्छुक असल्याचे सांगितले जात आहे. टाटांची गुंतवणूक असलेल्या व्हिस्टारा या कंपनीच्या मार्फत एअर इंडियाच्या खरेदीचा प्रस्ताव सादर करण्यात येऊल असे दिसते. त्याचबरोबर काही काळ इंडिको ही हवाईसेवा कंपनीही एअर इंडियाच्या खरेदीसाठी इच्छुक असल्याचे बोलले जात होते. मात्र आता त्यांचे नाव मागे पडले आहे. टाटांचे या उद्योगाशी व प्रामुख्याने एअर इंडियाशी भावनीक नाते आहे. कारण एअर इंडियाची स्थापना टाटांच्या एअरलाईन्स सरकारने ताब्यात घेऊन केली होते. त्यामुळे ही बाब टाटांना सतत खुपत होती. त्यामुळे त्यांना आपल्या समूहातील ही कंपनी पुन्हा यावी व तिला पुर्नवैभव प्राप्त करुन द्यावे असे टाटांना वाटते. त्यामुळे बहुदा टाटा हे बहुदा एअर इंडियाच्या खरेदीबाबत गांभिर्याने विचार करीत आहेत. विमान सेवा कंपन्या या नेहमीच तेजी-मंदीच्या लाटेवर स्वार झालेल्या असतात. आज आपल्याकडे ज्या खासगी कंपन्यांनी दिवाळी काढली त्या किंगफिशर असोत किंवा जेट असोत या देखील खासगी होत्या. त्या काही सरकारी कंपन्या नव्हत्या, तरी देखील दिवाळ्यात गेल्याच. एअर इंडिया ही सरकारी कंपनी असल्याने त्यांचे गैरव्यवस्थापनही कोट्यावधींचा तोटा होण्यास कारणीभूत ठरला आहे. आता पाहू या महाराजाच्या खरेदीला कोण पुढे येतो ते...
--------------------------------------------------------------

0 Response to "रेल्वेची घसरण / महाराजा विक्रीला "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel