-->
आपचा करिष्मा कायम

आपचा करिष्मा कायम

बुधवार दि. 12 फेब्रुवारी 2020 च्या अंकासाठी अग्रलेख- 
----------------------------------------------
आपचा करिष्मा कायम
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने आपले तख्त पुन्हा रखण्यात यश मिळविले आहे. आपच्या झाडूने सर्वच पक्षांना साफ धुवून नेले असून त्यांचा हा विजय अपेक्षितच होता. मतदान झाल्यावर जाहीर झालेल्या पाहाणी अहवालानुसार जवळजवळ प्रत्येकाने पुन्हा आप सत्तेवर येईल असा अंदाज व्यक्त केला होता. हा अंदाज खरा ठरला आहे. आपचा दिल्लीतील करिष्मा कायम टिकला आहे. गेल्या वेळच्या तुलनेत आपच्या जागा कमी झाल्या असल्या तरीही त्यांना दोन तृतियांशहून जास्त विक्रमी जागा मिळाल्या आहेत. तर भाजपाच्या सर्व आशा आकांक्षावर पाणी पडले आहे. गेल्या वेळच्या तुलनेत भाजपाच्या जागा वाढल्या असल्या तरीही सत्ता काबीज करण्याचा त्यांचा फाजिल विश्‍वास दिल्लीकरांनी फेटाळून लावला आहे. भाजपाला एकाच गोष्टीचा आनंद वाटू शकेल की, काँग्रेसला या निवडणुकीत भोपळाही फोडता आला नाही. मात्र दिल्लीत यावेळी भाजपापुढे कॉँग्रेस विरोधक म्हणून नव्हतीच, तर त्यांचा शत्रू क्रमांक हा आप होता. त्याचा पराभव करणे हे त्यांचे ध्येय होते, परंतु त्यात ते अपयशी ठरले आहेत. एकेकाळी म्हणजे आप सत्तेत येण्यापूर्वी कॉँग्रेसने शिला दिक्षीतांच्या काळात सलत तीन वेळा सत्ता काबीज केली होती, हे विसरता कामा नये. गेल्या दोन निवडणुकात कॉँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नाही, याचा आता गांभीर्याने कॉँग्रेसने विचार करण्याची वेळ आली आहे. अहंकारी भाजपाचा दिल्लीकरांनी पराभव केला आहे, अशी तिखट प्रतिक्रिया शिवसेनेने दिली आहे. शिवसेनेची ही प्रतिक्रीया अपेक्षीत अशीच आहे. कारण महाराष्ट्रात युती तोडल्यापासून उभय पक्षात जे वितुष्ट आले आहे, त्याला अनुसरुनच ही प्रतिक्रिया आहे. दिल्लीतील जनता ही मोठी सुजाण व सेक्युलर धोरणाचा पुरस्कार करणारी आहे, हेच हा निकाल सांगतो. कारण यावेळी ही लढत केवळ आप विरुध्द भाजपा अशी नव्हती तर ती केजरीवाल विरुध्द मोदी-शहा अशी होती. भाजपाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. साम-दाम-दंड-भेद या मार्गाचा अवलंब करु पण केजरीवाल यंना सत्तेवरुन हिसकावूच अशी मोदी-शहांची व्यूहरचना होती. ही व्यूहरचना भेदून केजरीवाल विजयी झाले आहेत. त्याबद्दल त्यांचे अभिनंदनच केले पाहिजे. तसेच त्यांना पुन्हा निवडून देऊन त्यांनी केलेल्या कामाची पोचपावती दिल्याबद्दल दिल्लीतील जनतेचे आभार मानले पाहिजेत. गेल्या पाच वर्षात केजरीवाल सरकारने अतिशय उत्कृष्ट व नजरेत भरेल असे काम केले आहे. मोफत वीज, शिक्षण, आरोग्य, पाणी, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी तसेच विविध क्षेेत्रात भरभरुन काम केले आहे. एवढी जनहीताची कामे करुनही दिल्ली सरकारचा पाच वर्षे अर्थसंकल्प हा नफ्यातच होता. केंद्राने अनवेळा त्यांच्या भोवती चौकशीच्या फेर्‍या लावल्या, परंतु त्यात कुठेच केजरीवाल सरकार अडकले नाही. अनेक त्यांच्यावर खोटेनाटे आरोप केंद्र सरकारने केले, परंतु त्यातून सहजरित्या केरजीवाल सरकार बाहेर आले. हे सर्व दिल्लीतील जनता उघड्या डोळ्याने पाहत होती. त्यामुळेच त्यांनी केजरीवाल यांच्या स्वच्छ सरकारच्या बाजूने भरभरुन मतदान केले. खरे तर त्यांच्या कामाची दखल सर्वत्र घेतली गेली. भाजपानेही पक्षाच्या सीमा ओलांडून विकासाच्या संदर्भात केजरीवाल यांनी केलेल्या कामाचे कौतुक करावयास काहीच हरकत नव्हती. परंतु असे करणे तर सोडाच, उलट केजरीवाल करीत असलेल्या चांगल्या कामात नेहमीच खोडा घालण्याचे काम केंद्र सरकारने केले आहे. आज केजरीवाल यांच्या कारभारावर दिल्लीकरांनी शिक्कामोर्तब केल्यावर आता पुढील काळात तरी केंद्रातील सरकारने केजरीवाल यांना सुखाने काम करु दिले पाहिजे. यावेळी दिल्ली निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शाईनबागचे आंदोलन व जे.एन.यू.तील तणाव यांची पार्श्‍वभूमी होती. या आंदोलकांना सामोरे जाऊन त्यांची भेट घेऊन त्यांच्या मनातील शंका दूर करण्याचे काम सरकारने करण्याऐवजी त्यांना टुकडे गँग संबोधिणे, देशविघातक शक्ती असा उल्लेख करणे तसेच सरकारमधील मंत्र्यानेच गोळ्या घालण्याची भाषा करणे असे बेजबादारीचे वर्तन केंद्र सरकारने केले. यानिमित्ताने त्यांना हिंदु-मुस्लिम तेढ निर्माण करुन हिंदू मते या निवडणुकीला केंद्रीत करण्याचा डाव होता. परंतु दिल्लीकरांनी हा त्यांचा डाव ओळखला व हाणून पाडला. बहुभाषिक व सेक्युलर असे दिल्ली महानगराचे स्वरुप सर्वांना दिसले, याला कोणी छेद देणार असेल तर ते स्वीकारले जाणार नाही असा भाजपाला या निकालातून खणखणीत इशारा देण्यात आला आहे. केजरीवाल यांनी देखील भाजपाच्या हिंदुत्वालाही त्यांच्याच भाषेत या काळात रोखठोक उत्तर दिले. आम्ही देखील हिंदूच आहोत, आम्हालाही आमच्या धर्माचा अभिमान आहे, मात्र आम्ही दुसर्‍या धर्माला कमी लेखत नाही किंवा त्यांचा मत्सरही करीत नाही असे केजरीवाल यांनी ठणकावून भाजपाला प्रत्यूत्तर दिले होते. याचा मोठा परिणाम मतदारांवर झाला. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत पुन्हा एकदा मोदी सरकार आले असले तरीही गेल्या दोन वर्षात भाजपाने राज्यातील अनेक गड गमावले आहेत. गेल्या दीड वर्षात भाजपाने दिल्लीसह आजवर आठ राज्ये गमावली आहेत. पाच वर्षापूर्वी सर्व देश भाजपामय होत असल्याचे जे चित्र होते ते आता चित्र पुन्हा एकदा विरळ होत असून अनेक राज्यातील भाजापाचा पराभव झाला आहे. गेल्या तेरा महिन्यांत झालेल्या मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, उडिशा, महाराष्ट्र, हरयाणा, झारखंडच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाला पुन्हा सत्ता टिकविता आलेली नाही. लोकसभा निवडणुकीत मतदारांची पसंती पंतप्रधान मोदींना दिली असली तरी ती विधानसभा निवडणुकांमध्ये मात्र त्याच्या विरोधात मतदान झाल्याचे दिसतेे. दिल्ली सरकारच्या अधिकारांबाबत पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृह खाते आणि उपराज्यपालांशी अनेकदा वाद अराजकाच्या उंबरठ्यावर पोहोचलेे होते. त्यातच दिल्लतील कायदा सुव्यवस्था राखणे ही केंद्राची जबाबदारी आहे. वेळोवेळी दिल्लीत केंद्र व राज्यातील निर्माण झालेल्या वादात केजरीवाल यांची दडपशाही करण्यात येत असल्याचे चित्र उभे राहिले. त्याचा फायदा केजरीवाल यांनाच झाला आहे. सात महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने दिल्लीतील सर्व सातही जागांवर एकतर्फी विजय नोंदविला होता. तेव्हा भाजपने दिल्लीतील 70 पैकी 65 विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडी घेतली, तर उरलेल्या पाच जागांवर काँग्रेसने आघाडी मिळविली. आपला भोपळाही फोडता आला नव्हता. मात्र ही आकडेवारी फसवी ठरते, हे यापूर्वी 2015 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीने दाखवून दिले होते. तेव्हाही भाजपने लोकसभेच्या दिल्लीतील सर्व सात जागा जिंकल्या होत्या. पण केजरीवाल यांच्या आपने विधानसभेच्या 70 पैकी 67 जागा जिंकून इतिहास घडविला. आपने 2015 साली सत्तेत येताना आपने सत्तर आश्‍वासने दिली होती आणि ती सर्व पूर्ण केल्याचा आपने केला होता. दिल्लीकरांना मोफत वीज आणि पाणी देण्याच्या केजरीवाल यांच्या गेमचेंजर निर्णयांमुळे भाजपचे कट्टर मतदारही आपच्या बाजूने झुकले आहेत. केजरीवाल यांनी आपल्या पहिल्या पाच वर्षाच्या काळात अनेक चांगली कामे केली आहेत. वीज बिलांपोटी मध्यमवर्गाला महिन्याकाठी दीड ते दोन हजार रुपयांचा दिलासा मिळाला आहे. दिल्लीतील कनिष्ठ मध्यमवर्ग आणि गरिबांना मोहल्ला क्लिनिक, खासगी शाळांच्या तुल्यबळ सरकारी शाळा, सार्वजनिक ठिकाणी मोफत वायफाय, बुजुर्गांना मोफत तीर्थयात्रा, महिलांना मोफत बसप्रवास अशा सुविधा आपच्या सौजन्याने उपलब्ध झाल्या आहेत. केजरीवाल हे त्याच कामाच्या जिवावर पुन्हा येऊन त्यांनी आपला करिष्मा कायम टिकविण्यात यश मिळविले आहे.
----------------------------------------------------

Related Posts

0 Response to "आपचा करिष्मा कायम"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel