-->
शिवसेनेचे काय चुकले?

शिवसेनेचे काय चुकले?

दि. 10 जुलैच्या मोहोरसाठी चिंतन
शिवसेनेचे काय चुकले? शिवसेनेची आता सत्ता गेली आहे. कॉँग्रेस व राष्ट्रवादीही हात चोळीत बसले आहेत. उध्दव ठाकरे यांनी शिंदेंना मुख्यमंत्री करुन सत्ता राखता आली असती, असे नैराश्येपोटी कॉँग्रेसचे अशोक चव्हाण बोलले. परंतु आता या सर्व गप्पा करण्याची वेळ गेली आहे. शिवसेनेतील फूट ही दोन तृतियांश आहे. आजवर संसदीय राजकारणात एवढी फूट पडल्याचे उदाहरण नाही. भाजपाने पैशाच्या जोरावर सत्ता खेचून आणली हे कितीही सत्य असले तरीही शिवसेनेच्या नेतृत्वाने त्यांना तसे करण्याची संधी उपलब्ध करुन दिली हे देखील तितकेच खरे आहे. यात शिवसेनेच्या नेतृत्वाकडून म्हणजे उध्दव ठाकरे यांच्याकडून अनेक मोठ्या चुका झाल्या व त्याचीच परिणती या बंडात झाली हे वास्तव नाकारता येणार नाही. सत्ता आल्यावर कोरोना, त्यानंतर उध्दव ठाकरे यांचे आजारपण अशा अनेक बाबींमुळे शिवसेना नेतृत्व हे कार्यकर्ते, नेते यांच्यापासून अलग पडले. कोरनाचा काळ कठीण होता. या काळात तर राज्य सरकारची कसोटी होती व त्यात उध्दव ठाकरे सरस ठरले ही वस्तुस्थिती कुणी नाकारणार नाही. केंद्र सरकार प्रत्येक वेळी राज्य सरकारची आर्थिक नाकेबंदी करुन त्यांना कोंडीत अडकवण्याचा प्रयत्न करीत होते. अशा कठीण काळात उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्र सावरला. त्यांचे हे काम वाखाण्याजोगेच होते. या काळात त्यांना आमदार, नेते यांना भेटणे शक्य नव्हते. मात्र ही रुंदावलेली दरी सांधण्याची कोरोनानंतर गरज होती. त्यातच कोरोनानंतर उध्दव ठाकरे यांचे आजारण आल्याने आमदारांशी संपर्क ठेवण्याची जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्यावर आली. त्यामुळे आमदार त्यांच्याशी जवळ आले हे खरे असले तरी पक्ष नेतृत्वाने थेट नेत्यांशी जवळीक ठेवण्याची जी आवश्यकता असते त्यात शिवसेना कमी पडली. उध्दव ठाकरे यांच्या आजारपणात त्यांनी कार्यकर्ते, नेते यांच्याशी संपर्क ठेवण्यासाठी जर अदित्य ठाकरेंना नियुक्त केले असते तर चित्र फार वेगळे असते. शिवसेनेच्या स्थापनेपासून ठाकरे घराणे हे त्याच्याशी केंद्रभागी आहेत. ठाकरे घराण्याचा माणूस कोणीच आपल्या संपर्कात नाही ही भावना शिवसैनिकांपासून ते नेत्यांपर्यंत सर्वांसाठी सहन होणारी नव्हती. शिवसैनिक हा कट्टर असला तरीही त्यांची सर्वात पहिली श्रध्दा ही ठाकरे घराण्यावर असते. बाळासाहेबांचे हेच वैशिष्ट होते की, त्यांचा नेहमी तळागाळातल्या शिवसैनिकांची थेट संपर्क होता. कोणीही शिवसैनिक बाळासाहेबांना भेटू शकत होता. नंतर बाळासाहेबांच्या प्रकृती अस्वस्थामुळे त्यावर काही मर्यादा आल्या, परंतु ती स्थिती सर्वच जण जाणून होते. उध्दव ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदाची कारकिर्द चांगली झाली ही त्यांची जमेची बाजू होती. मात्र या कामाच्या धबाडग्यात त्यांचा पक्ष संघटनेचा संपर्क तुटला. तसे पाहता सुरुवातीपासून त्यांचा सर्वसामान्य शिवसैनिक न नेत्यांशीही मर्यादीत संपर्क होता. मुख्यमंत्री झाल्यापासून कामुळे ही दरी वाढतच गेली आणि नेतेमंडळीतील नाराजी विस्तारत गेली. मुंबई-ठाण्यातील शिवसेना व राज्यातील अन्य भागात वाढलेली शिवसेना यात जमीन आसमानचा फरक आहे. मुंबई-ठाण्यातील सेना ही कट्टर शिवसैनिकांची आहे. त्यातील जुन्या पिढीतील सैनिक आता मागे पडला असला तरीही नवीन पिढीतही कट्टरपणा काही कमी झालेला नाही. शिवसेनेची हीच मोठी संघटनात्मक ताकद आहे. राज्यात अन्यत्र वाढलेली शिवसेना ही काही तेवढी कट्टर नाही. अन्य पक्षात तिकीट नाही मिळाले त्यामुळे शिवसेनेचे तिकिट मिळवून जिंकून आलेलेही त्यात आहेत. अशा आमदारांना शिवसेनेचे फक्त कुंकू लावायचे आहे. त्यांची निष्ठा ही पक्षावर नाही तर पदावर किंवा आमदारकीवर आहे. उध्दव ठाकरे यांचा स्वभाव मुळातच जनसंपर्क ठेवणाऱ्यातला नाही. त्यामुळे आमदाराला जर आपल्या नेत्याला भेटायला दोन दोन तास वाट पहावी लागली तर त्यांच्यात नाराजी ही निर्माण होणारच. उध्दव ठाकरेंच्या भोवती चमच्यांचे जे कडे आहे त्यातून सर्वसामान्यांना व नेत्यांना भेटता येत नाही ही तक्रार समजण्यासारखी आहे. जवळजवळ प्रत्येक नेत्यांच्या भोवती असे कडे असते. परंतु त्यातून शिवसेनेतील नाराजी निर्माण होऊन त्याची पावले बंडखोरीच्या दिशेने पडू लागली. भाजपाने ही नाराजी बरोबर ओळखली आणि पैसा व विविध आमीषे दाखवून फूट पाडण्यात मोलाचा हातभार लावला. भाजपाने पैसा जरुर फेकला असला तरी उध्दव ठाकरेंचा स्वभावही त्यासाठी खतपाणी घालून गेला. त्यामुळेच आज ठाकरेंपुढे मोठे आव्हान उभे आहे. सध्या शिल्लक असलेल्यांपैकी १२ आमदार शिंदे गटाला सामिल होतील की काय असे चित्र दिसते. शिवसेना संपते की काय, अशी भीती निर्माण व्हावी अशी परिस्थिती आहे. उत्तरप्रदेशात भाजपाने ज्याप्रकारे मायावतींचा पक्ष संपवला त्याचीच पुनरावृत्ती आपल्याकडे शिवसेनेच्या संदर्भात होणार की काय अशी स्थिती आहे. त्यादृष्टीने पाहता उध्दव ठाकरे यांच्या कसोटीचा काळ आता सुरु झाला आहे. त्यांना पक्ष पुन्हा नव्याने उभारावा लागणार आहे. त्यातच मुंबई महानगरपालिकेची निवडणुक तोंडावर आहे. आता एकट्याने लढल्यास नक्कीच पराभव आहे. त्यामुळे कॉँग्रेस-राष्ट्रवादीला त्यांना मुंबई ठाण्यात सोबत घेऊन महाविकास आघाडीच्या बॅनरसोबत जावे लागणार आहे. त्यातच हिंदुत्वाची मते भाजपा-शिवसेना-शिंदे गट यांच्यात विभागली जाणार आहेत. याचा नेमका फायदा कोणाला होणार हे आत्ताच सांगणे कठीण आहे. उध्दव ठाकरेंनी आता ठाकरी बाणा दाखवून शून्यातून पक्ष उभारणीची तयारी ठेवावी. त्याचबरोबर आजवर झालेल्या चुका सुधारुन पुढे जावे लागेल. शिवसेना किंवा कोणताही पक्ष संपत नसतो, प्रत्येक राजकीय पक्षात चढ-उतार येतच असतात. मात्र त्यातून सावरुन पक्ष नेतृत्वाने सामर्थपणे पुढे वाटचाल करावी लागते. शिवसेना व उध्दव ठाकरे यांनी तसे केलच तर त्यांचे भविष्य उज्वल आहे. अन्यथा शिवसेना हा इतिहास होण्याचा धोका आहे.

0 Response to "शिवसेनेचे काय चुकले?"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel