-->
शिवसेनेचे असे का झाले?

शिवसेनेचे असे का झाले?

दि. ३ जुलैच्या मोहोरसाठी चिंतन
शिवसेनेचे असे का झाले? सत्तेच्या रस्सीखेचीत अखेर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला. आपल्याला बहुमत नाही हे स्पष्टपणे दिसताच बाळासाहेबांचे हे चिरंजीव सन्मानाने सत्तेतून बाहेर पडले आणि त्यांची अडीच वर्षांची कारकिर्द संपली किंवा संपुष्टात आणली गेली. सध्या सत्तेच्या देशव्यापी गेमप्लानमध्ये भाजपा कमालीचा यशस्वी होत आहे. यापूर्वी कॉँग्रेस जे सत्तेसाठी राजकारण करीत असे त्यापेक्षा चार पावले पुढे जात भाजपा खेळी आखीत यात यशस्वी होताना दिसत आहे. मध्यप्रदेशासारखे मोठे राज्य असो ते गोव्यासारखे एखादे छोटे राज्य, येथे सर्वच ठिकाणी भाजपा आपली सत्ता येण्यासाठी साम-दाम-दंड या मार्गांचा अवलंब करीत सत्ता काबीज करीत चालला आहे. यासाठी लोकशाहीचे सर्व नियम, संकेत पायदळी तुडवले जात आहेत, मात्र बहुतांशी जनता यासंबंधी मौन बाळगून आहे, सोशल मिडियावर तर अनेकदा भाजपाच्या या यशाचे कौतुक केले जाते. परंतु याव्दारे लोकशाही पायदळी तुडवली जात आहे, याबाबत सोयिस्कररित्या मौन बाळगले जाते. यापूर्वी ज्यावेळी कॉँग्रेस, अर्थात ८०-९० च्या दशकात अशा नियमांचे उल्लंघन करी त्यावेळी त्यांची सर्वत्र निंदा केली जाई. आता मात्र भाजपाचा उदोउदो होतो. असो. उध्दव ठाकरेंनी भाजपाची साथ सोडून राष्ट्रवादी कॉँग्रेस व कॉँग्रेसच्या सोबतीने सरकार स्थापन केले त्यावेळपासूनच भाजपाने हे सरकार पाडून पुन्हा आपले सरकार आणण्याचा विडा उचलला होता. मात्र ते प्रत्यक्षात आणण्यासाठी अडीज वर्षे जावी लागली. उध्दव ठाकरेंचे याबाबतीत कौतुकच केले पाहिजे. कारण प्रवाहाच्या विरोधात ते गेली तीन वर्षे पोहत आहेत. गेल्या विधानसभेला भाजपाने युती तोडण्याच्या अगोदरच ते भाजपाच्या विरोधात कणखरपणाने बोलत होते. परंतु हे त्यांचे केवळ नाटक असावे, आपल्या जागा किंवा मंत्रिपदे वाढवून घेण्यासाठी हे करीत आहेत, असे अनेकांचे मत होते. मात्र भाजपाला शिवसेना संपवायची आहे, हे त्यांनी वेळीच ओळखले होते व त्यामुळे भाजपाविरोधात शस्त्रे पारजली होती. अशक्य वाटणारी ही महाविकास आघाडी ही तीन पक्षांची जशी गरज होती त्यापेक्षा शिवसेनेची सर्वात जास्त गरज होती. कारण भाजपा त्यांना सपविण्यासाठी जे डावपेच आखीत होता त्याला सुरुंग लावायचा होता. शिवसेनेला त्यावेळी सत्तेची आवश्यकता होती कारण जर हातात सत्ता नाही तर भाजपाला आवर घालणे कठीण गेले असते. भाजपाला जर धडा शिकवायचा असेल तर शिवसेनेला कॉँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी करण्याची गरज होती. उध्दव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील राज्यातील सरकारचे ठीकठाक चालले असताना व सरकार स्थिरावत असताना भाजपा मात्र दिवसेंदिवस बेचैन होत होता. सत्ता हातून गेल्याचे वैष्यम्य तर होतेच शिवाय शिवसेनेला सत्ता मिळाली व त्यांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पूर्ण झाले हे जास्त वेदनादायी होते. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कारकिर्दीपैकी जवळपास दीड वर्ष हे कोरोनात गेले व त्यात राज्य सरकारने चांगल्या प्रकारे परिस्थिती हाताळल्याने आता हे सरकार पाच वर्षे टिकते की काय अशी भीती भाजपाला वाटू लागून त्यांच्या बेचैनित वाढ होणे स्वाभाविक होते. शेवटी सरकार पाडण्यासाठी ईडीच्या नोटीसा पाठवायला सुरुवात झाली. यासाठी प्रामुख्याने शिवसेनेच्या नेत्यांनाच टार्गेट करण्यात आले. शिवसेना संघटना, शिवसैनिक व त्यांचे नेते हे एक अजब रसायन आहे. बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली ती मराठी माणसांच्या हक्कांसाठी. पाच दशकांपूर्वी त्याची गरजही होती. तत्कालीन कॉँग्रेस सरकारने कम्युनिस्टांना ठोकून काढण्यासाठी याच शिवसेनेचा बेमालूमपणे वापर केला होता. वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना शिवसेनेला ‘वसंतसेना’ देखील म्हणत असत ते यासाठीच. ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या सुत्राने बाळासाहेबांनी शिवसेनेचे कार्य सुरु केले. कितीही काही म्हटले तरी शिवसेना ही तेव्हापासूनच राजकीय होती. आता मात्र हे सूत्र नेमके उलटे झाले आहे. आता ८० नाही तर ९० टक्के राजकारण म्हणता येईल अशी स्थिती आहे. मराठी माणसांच्या हक्कांबरोबर शिवसेनेने सर्वसामान्यांची अनेक लहान-मोठी कामे केली. शिवसेनेची शाखा हा एक मराठी माणसांचा अड्डा असे. तेथे विविध प्रश्नांची तड लावाली जाई. त्यावेळी शिवसेनेत निष्ठेला महत्व होते. बाळासाहेबांवर श्रध्दा व समाजकारण हे सुत्र सांभाळत असताना शिवसेनेने राजकारणापासून वंचित राहिलेल्यांना अनेकांना तिकिटे दिली आणि धर्म, जातपात न बघता हे केल्यामुळे शिवसेनेने समाजात एक नवी प्रतिमा निर्माण केली. शिवसेनेने मराठी माणसासाठी किती भल्याची कामे केली हा एक संशोधनांचा विषय ठरेलही. शिवसेनेने मराठी माणसांच्या हक्कासाठी लढत असताना हिंदुत्वाची झूल पांघरली आणि भाजपाच्या कंपूत सामिल झाले. त्यावेळी भाजपाला शिवसेनेची गरज होती. कारण भाजपा हा अतिशय मर्यादीत स्वरुपात राज्यात होता. ९२च्या दंगलीत शिवसेनेची भूमिका ही नेहमीच वादातीत राहिली आहे, मात्र बाळासाहेबांनी होय आम्हीच बाबरी मशिद पाडली असे स्पष्टपणे जाहीर केले. बाळासाहेबांचे हेच वैशिष्ट्य होते. कोणताही गोष्टी ते चोरुन ठेवत नसत किंवा त्याचे काही परिणाम झाल्यास ते सहन करण्याची त्यांची तयारी असे. शिवसेनेचे आजचे जे नेते पन्नाशीत किंवा त्याहून मोठे आहेत ते त्यांच्या तरुणपणात कोणच नव्हते, त्यांना बाळासाहेबांनी मोठे केले. त्यांना स्वप्नातही आपण नगरसेवक, महापौर,मंत्री होऊ असे वाटले नव्हते. शिवसेनेची पहिली सत्ता आली आणि शिवसेनेचा बाज बदलू लागला. सत्तेबरोबर चिकटणाऱ्या अनेक वाईट बाबी या पक्षातल्या नेत्यांना चिकटल्या. शिवसेनेची सत्ता गेल्यावर अनेक नेत्यांना दुसऱ्या पक्षात जाण्याचे वेध लागू लागले. जे तळागाळातून आलेले नेते होते त्यांच्याकडे गडगंज संपत्ती आली होती. पूर्वीप्रमाणे त्यांच्या मनात शिवसेनेची निष्ठा जरुर होती, मात्र सत्ता मिळविण्यासाठी त्यांना पक्षांतर ही गरज वाटू लागली. यातूनच छगन भुजबळ, गणेश नाईक, नारायण राणे यांचे बंड झाले. खरे तर शिवसेना सोडून त्याकाळी दुसऱ्या पक्षात जाणे हे काही सोपे नव्हते. हे पक्षांतर जीवावर बोतणारे ठरु शकत होते. परंतु त्यांनी तो पत्करला आणि अन्य लोकांना पक्ष सोडण्यासाठी धीर दिला. बाळासाहेबांच्या नंतर उध्दव ठाकरेंचे युग सुरु झाले आणि शिवसेनेचा बाज बदलला. उध्दव यांचा मवाळ पण संयमी व सर्वांना अपिल होईल असा चेहरा पुढे आला. उध्दव यांच्या मवाळ स्वभावाने आपण त्यांना गुंडाळू व शिवसेना संघटना काबीज करु असा भाजपाचा डाव होता. उध्दव ठाकरेंमध्ये अनेक नेते, शिवसैनिक बाळासाहेबांना शोधत होते परंतु ते काही सापडत नव्हते. उध्दव यांची कामाची शैलीही वेगळी होती. त्यातच बाळासाहेबांचे निष्ठावान म्हणून समजल्या गेलेल्यांपैकी काहींशी त्यांचे पटणे शक्य नव्हते. दोन पिढीतील तो फरक होता आणि तसे होणे स्वाभाविकही होते. अशा स्थितीत कॉँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार त्यांनी स्थापन केले आणि तेच स्वत: मुख्यमंत्री झाले. अर्थात त्याशिवाय काही पर्यायही नव्हता. उध्दव यांनी आपली कारकिर्दही यशस्वी करुन दाखविली. परंतु भाजपाने ईडीचा धाक दाखवून सेनेच्या अनेक नेत्यांना जेलबंद करण्याची योजना आखली होती. शून्यातून किंवा रस्त्यातून आलेले हे कार्यकर्ते आता मोठे नेते झाले होते आणि त्यांच्याकडे रग्गड पैसा होता. परंतु आता जेलमध्ये जाण्याची त्यांची मानसिकता नव्हती. त्यातून बंडाची बिजे रोवली गेली आणि शिवसेनेत उभी फूट पडली. यात उध्दव ठाकरे यांचा फारसा दोष नाही. संघटनेत झालेले बदल, नेत्यांची बदलेली मानसिकता, सत्तेमुळे बेफाम आलेला पैसा, निष्ठेवरचा उडालेला विश्वास हे सर्व बंडास कारणीभूत ठरले. आता उध्दव ठाकरेंसमोर संघटना टिकविणे व तिला पूर्वीची प्रतिष्ठा प्राप्त करुन देणे हे एक मोठे आव्हान आहे. यात ते कसे यशस्वी होतात ते पुढील काळात समजेलच.

0 Response to "शिवसेनेचे असे का झाले?"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel