-->
कोकण रेल्वे सुस्साट...

कोकण रेल्वे सुस्साट...

26 मेच्या मोहोरसाठी चिंतन
कोकण रेल्वे सुस्साट... राज्यात राजकीय घडामोडी वेगात घडत असताना केवळ कोकणाच्याच नव्हे तर राज्याच्या हिताची एक महत्वपूर्ण घटना घडली व महत्वाचे म्हणजे किरकोळ बातमी देण्यापलिकडे याची नोंद फारशी कोणी घेतलीच नाही. ही घटना म्हणजे कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गाचे झालेले विद्युतीकरण. कोकण रेल्वेच्या या विद्युतीकरणामुळे या मार्गावरील प्रवास आता प्रदूषणमुक्त तर होईलच परंतु प्रवासाला वेगही येणार आहे. त्यामुळे आता कोकण रेल्वे सुस्साट सुटणार आहे. गेली सात वर्षे कोकण रेल्वेच्या विद्युतीकरणाचे काम सुरु होते. त्यामुळे ७४१ किलोमीटर लांबीच्या या रेल्वे मार्गाचे उशीरा का होईना हे विद्युतीकरण आता अखेर मार्गी लागले. या विद्युतीकरणासाठी एकूण 1287 कोटीं रुपये खर्च करण्यात आले. यापूर्वी कोकण रेल्वेवर विद्युतीकरण झाले नसल्याने डिझेल इंजिनाच्या मदतीने या मार्गावर रेल्वे वाहतूक होत असे. साधारणपणे 12 डब्यांच्या रेल्वेगाडीला एक किलोमीटर अंतर कापण्यासाठी 6 ते 10 लिटर डिझेलची आवश्यकता लागते. इंजिनाच्या अश्वशक्ती क्षमतेनुसार यात बदल होतो. आता, विद्युतीकरण झाल्यामुळे इंधनाची बचत होणार असून यात रेल्वेची मोठी आर्थिक बचतही होणार आहे. कोकण रेल्वेचा मार्ग हा मोठा आव्हानात्मक आहे. त्यातच कोविड -19 महासाथीच्या काळात हा प्रकल्प पूर्ण करणे अधिक आव्हानात्मक झाले होते. कोकणात कोसळणाऱ्या मुसळधार पावसात व विद्युतीकरणाच्या कामात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी अनेक ठिकाणी विशेष व्यवस्था करावी लागली होती. मुंबई व मंगळूर ह्या दोन महत्वाच्या शहरांदरम्यान थेट मार्ग नसल्यामुळे रेल्वे वाहतूक लांबच्या मार्गाने म्हणजे पुणे-सोलापूर-बंगळूर या मार्गावरुन चालू होती. मुळातच कोकण रेल्वेची उभारणी करणे हे एक अवघड काम होते. उंचसखल भूभाग, अनेक नद्या, अतिवृष्टी इत्यादी कारणांमुळे कोकणामध्ये रेल्वे सुरु करण्यात अनेक अडथळे येत होते. मधू दंडवते, जॉर्ज फर्नांडिस या नेत्यांनी कोकण रेल्वे बांधण्याची मागणी प्रदीर्घ काळ चालू ठेवली होती. अखेरीस त्यांच्या प्रयत्नांना यश आले. सर्वात प्रथम १९६६ साली दिवा-पनवेल मार्ग बांधला गेला व १९८६ मध्ये तो रोह्यापर्यंत विस्तारीत केला गेला. १९९० साली तत्कालीन रेल्वेमंत्री असलेल्या जॉर्ज फर्नान्डिसांच्या नेतृत्वाखाली कोकण रेल्वे कॉर्पोरशन या कंपनीची कंपनीची स्थापना करण्यात आली. ई. श्रीधरन हे कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे पहिले अध्यक्ष होते. कोकण रेल्वेच्या उभारणीत त्यांचा वाटाही मोलाचा होता. १५ सप्टेंबर १९९० रोजी रोहा येथे कोकण रेल्वेचा पायाभरणी समारंभ पार पडला. ७४० किमी लांबीचा हा मार्ग प्रत्येकी १०० किमी लांबीच्या ७ भागांमध्ये विभागण्यात आला व प्रत्येक विभागाचे काम स्वतंत्रपणे सुरू करण्यात आले. परदेशांमधून अद्ययावत बांधकाम तंत्रे वापरणारी यंत्रे बांधकामासाठी मागवली गेली. लार्सन अँड टूब्रो, गॅमन इंडिया ह्या भारतामधील मोठ्या बांधकाम कंपन्यांना बांधकामाची कंत्राटे दिली गेली. भूसंपादनामधील अडथळे, अनेक कोर्ट खटले, दुर्गम भूरचना, पावसाळ्यात येणारे पूर व कोसळणाऱ्या दरडी इत्यादी बाबींमुळे कोकण रेल्वेच्या बांधकामाचे वेळापत्रक रखडले. असे असले तरीही कोकण रेल्वेमार्गावरील पहिली रेल्वे २० मार्च १९९३ रोजी मंगळूर ते उडुपी दरम्यान धावली. रोहा-वीर-खेड-सावंतवाडी या मार्गाचे काम डिसेंबर १९९६ मध्ये पूर्ण झाले. उत्तर गोव्यामधील पेडणे येथील एका बोगद्याचे काम पूर्ण होण्यास तब्बल सात वर्षांचा कालावधी लागला. अखेर २६ जानेवारी १९९८ रोजी कोकण रेल्वेचे उद्घघाटन करण्यात आले. कोकण रेल्वेच्या निर्मितीमध्ये अनेक अडचणी आल्या, जवळपास ४७ हजार कुटुंब विस्थापित झाली. अनेक संकटांचा सामना करीत अखेर कोकण रेल्वे उभारली व धाऊही लागली. कोकणी जनतेचे एक मोठे स्वप्न साकार झाले. आज त्या घटनेला पाव शतकाहून जास्त काळ लोटला आहे. कोकण रेल्वेच्या माध्यमातून उत्तरेपासून दक्षिणेपर्यंतचा देश जोडला गेला. दक्षिणेत जाण्यासाठी हा मार्ग म्हणजे वेळेचे अंतर कमी करणारा ठरला आहे. दक्षिणेत कन्याकुमारीपासून ते उत्तरेत दिल्ली पर्यंत हा मार्ग जोडला गेला आहे. कोकण रेल्वे ही खरी कोकणातील जनतेच्या सुविधांसाठी बांधण्यात आली असली तरीही तिचा फायदा अन्य राज्यातील लोक घेताना दिसत होते. अर्थात खादी रेल्वे ही काही ठराविक भागासाठी उभारता येत नाही ती देश हिताचीच असते. तरीही तिचा फायदा हा स्थानिकांना झाला पाहिजे तसा कोकणातील जनतेला होत नाही. अगदी आंब्याच्या दिवसात खास आंबे पोहोचविण्यासाठी मुंबईला रेल्वे सोडली पाहिजे परंतु तसे कधीच झाले नाही. आजही कोकणात जाण्यासाठी असलेल्या रेल्वे कायम फुल्ल असतात, मात्र असे असतानाही नवीन गाड्या या विभागासाठी सुरु होत नाहीत. आपले लोकप्रतिनिधी नेमके काय करतात, असाही सवाल उपस्थित होतो. कोकण रेल्वेच्या आगमनानंतर या पट्यातील औद्योगिकीकरण वाढले पाहिजे होते, पर्यटन व्यवसाय वाढला पाहिजे होता, असे काही झालेले नाही. त्यामुळे कोकण रेल्वेचा फायदा हा कोकणी माणसाला फारसा झालेलाच नाही असे दुर्दैवाने म्हणावसे वाटते. आता विद्युतीकरण झाल्यावर रत्नागिरी ते कोल्हापूर हा नवीन मार्ग सुरु झाल्यास कोकण व घाटमाथा जोडला जाईल. या मार्गासाठी सर्वांनीच आग्रह धरला पाहिजे. त्याचबरोबर कोकण रेल्वेचा असलेला एक मार्ग दुहेरी होण्याचीही गरज आहे. त्यानंतर तरी कोकणासाठी जादा गाड्या सुरु होतात का ते पहावे लागेल. असो, तूर्तास तरी कोकण रेल्वे आता सुस्साट सुटली आहे, यातच समाधान मानावे लागेल.

0 Response to "कोकण रेल्वे सुस्साट..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel