-->
संपादकीय पान शुक्रवार दि. ३१ जानेवारी २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
---------------------------------------
आभासी जगतातील चलन: बिटकॉइन
---------------------------------
चलन मग ते रुपया, डॉलर, पौन्ड, युरो असो, प्रत्येक चलन म्हणजे त्याभोवती त्या देशाची संस्कृती, राजकीय, सांस्कृतीक, राजकीय संबंध हे जोडलेले असतात. डझनाहून जास्त युरोपीयन देशांनी एकत्र येऊन युरोची स्थापना केली परंतु इंग्लंडने मात्र आपले पौंड रद्द काही केले नाही. कारण पौंडाशी असलेली सांस्कृतिक, ऐतिहासिक नाळ तोडणे ब्रिटनला काही शक्य झाले नाही. युरोच्या धर्तीवर आशिया खंडासाठी ही एखादे चलन असावे अशी चर्चा होते, मात्र प्रत्यक्षात तशी काही पावले पडत नाहीत. जग कितीही जवळ आले किंवा आपण ग्लोबल व्हिलेज असे संबोधिले तरी चलनाच्या बाबतीत प्रत्येक देश हा तसा संवेदनाक्षमच असतो. परंतु कोणताही देश नसलेले एखादे आभासी चलन असू शकते का? तसे पाहता या प्रश्‍नाचे उत्तर नकारात्मकच देता येईल. मात्र सध्याच्या इंटरनेटच्या जगात हे शक्य झाले आहे. इंटरनेटवर एक आभासी चलन गेल्या काही महिन्यात झपाट्याने विस्तारले आहे आणि याचे नाव आहे बिटकॉइन. या चलनाला कोणताही एक देश नाही. सर्व देशातील इंटरेनटचे सर्फिंग करणारे या बिटकॉइनचे ग्राहक आहेत. काहींच्या मते हे सध्या आभासी चलन असले तरीही भविष्यात हे एक चलन म्हणून पुढे येणार आहे. एवढेच कशाला या चलनाच्या बाबतीत खूपच आशावादी असलेले लोक म्हणतात डॉलरलाही हे चलन भविष्यात आव्हान देऊ शकते. अर्थात या सर्व हवेतल्या गप्पा झाल्या. हे चलन भविष्यात कसे असेल हे सांगणे आत्ता कठीण असले तरीही सध्या मात्र हे एक हवेतील चलन असल्याने याच्या अस्तित्वाला काहीच अर्थ राहिलेला नाही. त्यामुळे सध्या या चलनात व्यवहार करणे म्हणजे निव्वळ सट्टेबाजी करण्यासारखे आहे. इंटरनेट जगतात जे लोक विविध खेळ कॉम्प्युटरवर खेळत असतात त्यांच्याकडून या चलनाचा जन्म झाला असे म्हणतात. अनेक बिटकॉईन्स ही इंटरनेटच्या मायावी जगात वावरणार्‍यांनी एक गंमत म्हणून हे चलन साठविण्यास सुरुवात केली. काही जणांकडे ही कॉईन्स मित्रांनी किंवा कुणीतरी दिलेल्या भेटीतून जमा झाली आहेत. हळूहळू यात इंटरनेटव्दारे व्यवहार व चलनाचे एक्स्चेंज सुरु झाले. यातून अनेकांकडे ही लाखो बिटकॉइनस जमा झाली. तसे पाहता याचे मूल्य प्रत्यक्ष बाजारात शून्यच आहे. परंतु बविष्यात हे चलन प्रत्यक्षात येईल आणि आपण मालामाल होऊ या इर्षेने अनेकांनी ही बिटकॉइन आपल्या पदरी बाळगली आहेत. मध्यंतरी रिझर्व्ह बँकेने अशा चलनातील व्यवहार हे अधिकृत नसल्याचे तसेच अशा प्रकारच्या चलनाला भारतात शून्य स्थान असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर भारतात बिटकॉइनसच्या व्यवहारांना मोठ्या प्रमाणात खीळ बसली. त्यानंतर भारतातील बिटकॉइनसच्या ट्रेडर्सनी एकत्र येऊन आपली संघटना स्थापन केली. या चलनाच्या बाळगण्याबाबतच्या कायदेशीर वैधानिकता तपासण्याचा निर्णय या ट्रेडर्सनी घेतला. रिझर्व्ह बँकेने अशा प्रकारे स्पष्ट केल्यावर भारतात बिटकॉइनच्या व्यवहारांना आळा बसला आहे. परंतु यामुळे पूर्णपणे व्यवहार थंडावतील असे नाही. बिटकॉइनचा चलन विनिमय ठरविणारी, त्यातील गुंतवणुकीची तरलता कशी असेल हे ठरविणारी कोणतीही यंत्रणा केवळ आपल्याच नाही कोणत्याच देशात नाही. त्यामुळे या चलनाचे सर्व अस्तित्व आभासीच राहाणार आहे. अर्थात हे चलन पूर्णत आभासी असल्याने कोणताही देशाने त्यावर बंदी घालून काहीच अर्थ राहाणार नाही. त्यामुळे हे चलन अस्तित्वात असले तरी याचे नेहमीच मूल्य शून्य असेल.
--------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel