-->
संपादकीय पान शनिवार दि. ९ ऑगस्ट २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------
तुझ्या गळा...माझ्या गळा...
------------------------------------------------
महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणूक कॉँग्रेस व राष्ट्रवादी हे दोन्ही कॉंग्रेस एकत्रित लढतील हे चित्र आता स्पष्ट झाले आहे. कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तसेच दोन्ही पक्षांची जागावाटपाची चर्चा आगामी दहा दिवसांत पूर्ण होईल. यामुळे जागावाटपावरून निर्माण झालेला पेच संपुष्टात आला असून, यापुढील चर्चा आता आघाडीला अनुकूल अशाच प्रकारे होईल. काही जागांवरून वाद झाल्यास पुन्हा सोनिया गांधी-शरद पवार यांची चर्चा होऊ शकते, असेही सुचविण्यात आले आहे. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसला दहा ते बारा जागा वाढवून मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने १४४ जागांवर दावा केला असला, तरी त्यांना १२४ ते १२६ जागा देण्याची तयारी कॉंग्रेसने दाखवली आहे. त्यासाठी २००४ च्या निवडणुकीतील सूत्राचा आधार घेतला जाण्याची शक्यता आहे. २००९ च्या लोकसभा निकालानंतर कॉंग्रेसने विधानसभेच्या दहा जागा अधिक घेतल्या होत्या. या वेळी राष्ट्रवादीला दहा ते बारा जागा अधिक देण्यावर कॉंग्रेस नेत्यांनी सहमती दर्शविली आहे. मात्र, ज्या जागांवर दोन्ही पक्षांचे उमेदवार दोनपेक्षा अधिक वेळा पराभूत झालेले आहेत अशा जागांची अदलाबदल करण्याचा मानस आघाडीत आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील जागावाटपाचा तिढा प्रदेश पातळीवर न सुटल्याने स्वतंत्रपणे लढण्याचे इशारे दोन्ही बाजूंच्या नेत्यांकडून दिले जात होते. अर्थात कॉँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यांत जागांसाठी जी रस्सीखेच सुरु आहे ती चर्चा करण्याअगोदर
त्या पार्श्‍वभूमीवर दोन्ही पक्षांच्या केंद्रीय नेत्यांनी चर्चा केली. लोकसभा निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीमध्ये विधानसभा निवडणूक एकत्रित लढण्याच्या आवश्यकतेवर दोन्ही नेत्यांनी सहमती व्यक्त करून आघाडीवर शिक्कामोर्तब केले. विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसदरम्यान जागावाटप चर्चेच्या दोन फेर्‍या स्थानिक नेत्यांमध्ये झाल्या. मात्र त्यातून फारसे निष्पन्न झाले नाही. २८८ पैकी १४४ जागा मिळाव्यात, अशी राष्ट्रवादी कॉंग्रेसची मागणी आहे. विधानसभेसाठी २००४ च्या जागावाटप सूत्रानुसार कॉंग्रेसने १६४, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने १२४ जागा लढवाव्यात असे ठरले होते. २००९ मध्ये लोकसभा निवडणुकीत १७ जागा जिंकल्यानंतर कॉंग्रेसने आक्रमक होत राष्ट्रवादीला विधानसभेसाठी ११४ जागा घेण्यास भाग पाडले. त्या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसला लोकसभेत केवळ आठ जागा जिंकता आल्या होत्या. या वर्षी लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला अवघ्या दोन जागा मिळाल्या आहेत, तर राष्ट्रवादीने चार जागा जिंकल्या आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर २००९चाच निकष यंदाही लागू केला जावा. कॉंग्रेसच्या जागांवर आपला दावा नसून, ज्या मतदारसंघांमध्ये कॉंग्रेसला आजपर्यंत एकदाही विजय मिळवता आलेला नाही, अशा २८ जागा महाराष्ट्रात आहेत. ज्यात गेल्या तीन निवडणुकांत कॉंग्रेसचा पराभव झाला आहे. अशाच जागांवर राष्ट्रवादीने दावा केला. कॉंग्रेसने मात्र आघाडी तुटली तरीही चालेल; परंतु जागावाटपामध्ये अपमानजनक तडजोड केली जाणार नाही, असे स्पष्ट केले. त्यामुळे यावर अंतिम निर्णय सोनिया-पवार यांच्या चर्चेतच निघेल, असे स्पष्ट झाले होते. गेल्या काही दिवसात प्रामुख्याने लोकसभा निवडणुकांनंतर कॉँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यातील सूर बिघडले होते. कदाचित त्यामुळे शरद पवार कॉँग्रेसशी दोस्ती तोडून राज्यात काही नवीन समिकरणे जुळवतील असेही बोलले जात होते. मात्र पवारांनी हा नाद सध्यातरी सोडला असावा असेच दिसते. कदाचित विधानसभा निवडणुकीनंतर काही नवीन मित्र शोधून आपल्या हाती सत्ता कशी राहिल याची गणिते पवार मांडू शकतात. एकूणच पाहता केंद्रातील सत्ता गेल्याने कॉँग्रेसचे नेतृत्व आता दुबळे झाले आहे आणि त्याच फायदा आपल्या जागा जास्त मिळवून उठवू शकतो हे पवारांनी मांडलेले गणित सद्यातरी बरोबर ठरले आहे. सद्याच्या स्थितीत कॉँग्रेसच्या गळ्यात गळा टाकणे हा एक उत्तम पर्याय शरद पवारांकडे होता. आता गळ्यात गळा घालूनही शरदराव कॉँग्रेसच्या उमेदवारांचा पाडाव कसा होईल हे पाहातीलच. कारण राष्ट्रवादी कॉंग्रेसचा मुख्य शत्र्ाू हा भाजपा वा शिवसेना नसून कॉँग्रेस हाच आहे. त्यामुळे निवडणूक निकालानंतर जर सत्ताधारी आघाडीला पुन्हा सत्ता मिळाली नाही तर शरद पवार शिवसेना किंवा भाजपाच्या कशपात जाऊन सत्तेची समीकरणे मांडू शकतात. याची कल्पना कॉँग्रेसलाही आहे. मात्र सध्या केंद्रात सत्ता नसल्याने कॉँग्रेसचे केंद्रीय नेतृत्व हतबल आहे. शरद पवारांची साथ सोडणे त्यांना जमणारे नाही. कॉँग्रेसच्या बाजूने वातावरणही देशात अनुकूल नाही व त्या जोडीला कॉँग्रेस लोकसभा निवडणुकी पडल्यानंतर त्या धक्क्यातून अजूनही सावरलेली नाही. त्यामुळे सद्या कॉँग्रेस बॅकफुटवरच आहे. तर दुसर्‍या बाजूला भाजपा व शिवसेना यांचा आत्मविश्‍वास अनावश्यकरित्या वाढला आहे. दोन महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीतील विजयाचे श्रेय शिवसेना मोदींना द्यायला तयार नाही. तर भाजपाला आपला मुख्यमंत्री सत्तेत बसवायचा आहे. नरंेंद्र मोदींनी राज्यात भाजपाचा मुख्यमंत्रीच हवा ही इच्छा पक्षाच्या बैठकीत खासगीत बोलूनही दाखविल्याची चर्चा होती. त्यामुळे युतीतही सत्तेची रस्सीखेच आहेच. लोकसभेच्या गणितावर विधानसभेची गणिते मांडणे चुकीचे ठरणार आहे, हे या नेत्यांना आत्ता पटणारे नाही. निवडणुकीचे निकाल लागल्यावर हे स्पष्टपणे दिसेल. नारायण राणे यांना पक्षात राखण्यात कॉँग्रेसला यश आले आहे ही त्यांच्या दृष्टीने सकारात्मकच बाब ठरली आहे. परंतु राणे काही सत्ताधारी आघाडीला विजयश्री खेचून आणतील असेही नव्हे. एकूणच काय विधानसभा निवडणुकीचा मंच सजू लागला आहे. त्यातला पहिला प्रयोग तुझ्या गळा... माझ्या गळा... हा कॉँग्रेसने सुरु केला आहे.
-------------------------------------------------  

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel