-->
संपादकीय पान सोमवार दि. ११ ऑगस्ट २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------
आता प्रियांकापर्वाची आस!
------------------------------------
सार्वत्रिक निवडणुकांमधील अभूतपूर्व पतनानंतर पूर्णपणे गलितगात्र, निस्तेज झालेल्या कॉंग्रेस पक्षामध्ये आता नवी जान ङ्गुंकण्यासाठी हळूहळू प्रयत्न सुरू झाल्याचे पहावयास मिळत आहे. कॉँग्रेसमध्ये जान टाकणे म्हणजे यावेळच्या निवडणुकीत फेल ठरलेल्या राहूलच्या एैवजी प्रियांला पुढे करणे. एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे जबाबदारीचे हस्तांतर या उक्तीला जागून पक्षाचा डोलारा आता सोनिया गांधींच्या खांद्यावरून भविष्यात प्रियांका गांधी-वडेरा यांच्याकडे सोपवला जाऊ शकतो. सध्या सुरू असलेल्या घडामोडी याला जोरदार पुष्टी देणार्‍या आहेत. अर्थात, आजच्या परिस्थितीत नेमके काय करावे हा त्या पक्षाचा अंतर्गत मामला असला तरी त्याचे तरंग राजकारणात उमटणे साहजिक आहे. खास करून येत्या काळात महाराष्ट्र, उत्तर प्रदेशसह काही महत्त्वाच्या राज्यांमध्ये  विधानसभा निवडणुकांचे ङ्गड गाजू लागतील. त्या दृष्टीने पक्षांतर्गत पातळीवर कार्यकर्त्यांना नवा हुरूप देण्यासाठी आतापासून असे काही पाऊल टाकले जाणे अपेक्षित-अभिप्रेत होते. किंबहुना, रसातळाला गेलेल्या पक्षाला पुन्हा वर आणण्यासाठी आता वेळीच काही प्रयत्न करणे संयुक्तिक ठरल्याची गरज नेतृत्वानेही लक्षात घेतल्याचे चित्र वा तसा संदेश कार्यकर्त्यांमध्ये जाणे गरजेचे ठरले आहे. स्वातंत्र्यानंतर कॉंग्रेस पक्षावर मुख्यत्वे नेहरू-गांधी घराण्याचाच वरचष्मा राहत आला आहे. कॉंग्रेसची गरज व या घराण्याचा वरचष्मा याचे समान सूत्र या वाटचालीत सातत्याने पहावयास मिळाले आहे. लोकशाही व्यवस्थेत व्यक्तिकेंद्रीत राजकारणाची याहून अधिक परिणामकारक बाब भारतासह जगातील इतर कोणत्याही देशात क्वचितच पहावयास मिळते. किंबहुना, नेहरू-गांधी घराण्याच्या वर्चस्वाशिवाय कॉंग्रेसचे पानही हलू नये, इतके हे नाते घट्ट रुजले-रुळले आहे. इंदिरा गांधींचे आजोबा मोतीलाल नेहरू यांच्यापासून हा इतिहास सुरू झाल्याचे पहावयास मिळते. इंदिराजींचे वडील पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दीड-दोन दशके देशाचे पंतप्रधानपद भूषवले. इंदिरा गांधींनी गिरवताना त्यांचाच कित्ता दोन दशकांहून अधिक काळ पक्षांतर्गत वर्चस्व राखले. सत्तरच्या दशकात राष्ट्रपती निवडीच्या मुद्यावरून कॉंग्रेसची दोन शकले झाली आणि सिंडीकेट व इंदिरा कॉंग्रेस हे नवे दोन पक्ष उदयाला आले. परंतु इंदिरा गांधींच्या वाढत्या प्रभावामुळे इंदिरा कॉंग्रेस हीच खरी कॉंग्रेस हा प्रभावी, परिणामकारक प्रचार-प्रसार कार्यकर्त्यांच्या पचनी पडत गेला. एकाच वेळी पंतप्रधान आणि पक्षाध्यक्ष अशा जबाबदार्‍या इंदिरा गांधींनी समर्थपणे हाताळल्या. या माध्यमातून त्यांचे प्रशासन व पक्षावर पूर्ण वर्चस्व राहिले. वेगवेगळ्या राज्यांमध्ये जेथे कोठे कॉंग्रेसची सरकारे होती, तेथील राजकीय व्यवस्थेवरही आपलाच ङ्गॉर्म्युला अंतिम राहील आणि आपण सांगू तोच शब्द प्रमाण ठरेल, इतपत वर्चस्व इंदिराजींनी निर्माण केले होते. त्यांच्या हयातीत  द्वितीय पुत्र संजय यांचेही पक्षांतर्गत स्वतंत्र व वेगळे सत्ताकेंद्र तयार होऊ लागले होते. परंतु प्रथम संजय व काही वर्षांनी इंदिरा गांधी या माय-लेकाचा अनपेक्षित मृत्यू झाला. पक्षांतर्गत वर्चस्वाची व देशाच्या सत्तेची सूत्रे पुन्हा इंदिरापूत्र राजीव यांच्याकडे आली. साडेचार-पाच वर्षे पंतप्रधानपद भूषवताना या पदावरून पायउतार होऊन दीड-दोन वर्षांपर्यंत, म्हणजे त्यांचीही हत्या होईपर्यंतच्या काळात सत्तेचा डोलारा राजीव गांधी यांच्याकडेच होता.
राजीव हत्येनंतर सोनिया गांधी यांनी मात्र सहा-सात वर्षे स्वत:ला पक्षीय राजकारणापासून कटाक्षाने दूर ठेवले होते. या दरम्यान १९९१-१९९६ अशी पाच वर्षे पी. व्ही. नरसिंह राव यांनी पंतप्रधान आणि पक्षाध्यक्ष म्हणून धुरा सांभाळली. परंतु १९९६ मधील सार्वत्रिक निवडणुकांतील कॉंग्रेसच्या पराभवानंतर पक्षाची गरज म्हणून कार्यकर्त्यांच्या आग्रहापुढे मान तुकवून सोनियाजींनी पक्षाचे नेतृत्व एकदाचे स्वीकारले व तेव्हापासून त्यांच्याकडेच पक्षाचा पदभार राहिला आहे. २००४ मध्ये देशात कॉंग्रेस आघाडीची सत्ता आली तेव्हा पंतप्रधानपद त्यांच्यासमोर होते. परंतु हे पद त्यांनी नाकारले. परंतु त्यानंतर दहा वर्षे पंतप्रधानपद मनमोहनसिंग यांच्याकडे सोपवताना पक्षासह प्रशासकीय व्यवस्थेवरही अप्रत्यक्षपणे सोनियांचा प्रभाव राहिला. गेल्या दीड-दोन दशकांपासून कॉंग्रेस पक्षाची सूत्रे सोनियांकडे आहेत. यातील दहा वर्षे केंद्रात कॉंग्रेसची सत्ता होती. परंतु अलिकडेच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांच्याच नेतृत्वाखाली कॉंग्रेसची कधी नव्हे इतकी अपरिमित वाताहत झाली. अर्थात, या वेळी त्यांचे पुत्र राहुल गांधी यांना भावी नेतृत्व व संभाव्य पंतप्रधान म्हणून प्रोजेक्ट करण्यात आले होते. परंतु नरेंद्र मोदी यांच्या चलती नाण्यापुढे त्यांचा व कॉंग्रेसचा निभाव लागणे शक्य नव्हते. सोनियांनी स्वत:ला दूर ठेवत राहुलच्या खांद्यावर पक्षाची धुरा सोपवली. मात्र, राहुलच्या मर्यादा पूर्ण स्पष्ट झाल्या आणि ते पक्षाला एकखांबी नेतृत्व देऊ शकत नसल्याचेही स्पष्ट झाले. ही वाटचाल पाहता भविष्यात कॉंग्रेसला भवितव्य नसल्याचे चित्र तयार झाले. पक्षाला या अनिश्‍चिततेतून बाहेर काढण्यासाठी काही ठोस प्रयत्न करणे आवश्यकच होते. ती गरज प्रियांका गांधी-वडेरा यांच्या रुपाने पूर्ण होऊ शकेल, असा तमाम कॉंग्रेसजनांचा विश्‍वास असणे साहजिक आहे. वर्षअखेरीस काही महत्त्वाच्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांचे मैदान गाजू लागेल. या निवडणुका संपताच प्रियांका यांच्याकडे पक्षाचे सरचिटणीसपद वा उत्तर प्रदेशचे अध्यक्षपद सोपवले जाण्याची शक्यता आहे. प्रियांका यांचे नेतृत्वगुण अजून सिद्ध झाले नसले, तरी निवडणुकांच्या प्रचारातील त्यांचे असणे व प्रचारातील सहभाग प्रभाव टाकणारा ठरला आहे. तसेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आजी इंदिरा गांधी यांची छबी प्रकर्षाने जाणवते. या प्रियांका यांच्यासाठी जमेच्या बाजू आहेत. परंतु प्रियांका यांचा उदय झाल्यास राहुल यांच्या राजकारणाचा अस्त होईल, अशी भीती वाटत असल्यानेच कॉंग्रेस नेतृत्वाकडून प्रियांका यांच्याबाबत सावध पावले टाकली जात आहेत. एकूणच काय आता सर्व कॉँग्रेसजनांचे डोळे आता प्रियांका गांधींकडे लागले आहेत.
---------------------------------------------

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel