-->
संपादकीय पान मंगळवार दि. १२ ऑगस्ट २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
-------------------------------------------
इबोलाचे गांभीर्य खरोखरीच की बागुलबुवा?
--------------------------------
इबोला हिमोरेजिक फीव्हर (ईएचएफ) या विषाणुजन्य आजाराच्या साथीमुळे सध्या केवळ आपल्याच देशात नव्हे तर जगात चिंतेचे वातावरण आहे. सध्या जगात चिंता म्हटली म्हणजे अतिरेकी कायरवाया डोळ्यापुढे येतात. परंतु इबोला ही कुठलीही अतिरेकी संघटना नाही तर तो विषाणुजन्य ताप आहे आणि त्याचा प्रादुर्भाव झाल्यास रोगी झपाट्याने मरण पावतो. आजतागायत त्यावर उपचार सापडलेले नाहीत. आफ्रिका खंडातील गिनी या देशामध्ये गेल्या मार्च महिन्यापासून इबोलाची साथ फैलावण्यास सुरुवात झाली. त्यानंतर या आजाराच्या साथीने लायबेरिया, नायजेरिया, सिएरा लिओन या अन्य तीन देशांतही हातपाय पसरले. इबोलाच्या साथींच्या इतिहासातील सर्वात जीवघेणी साथ सध्या पश्चिम आफ्रिकेतील काही देशांत फैलावली आहे. इबोला या आजाराचे विषाणू सर्वप्रथम वटवाघळांमध्ये आढळून आले होते. त्यानंतर हे विषाणू आफ्रिकेतील चिंपांझी व गोरिलांमध्ये संक्रमित झाले. या वन्यप्राण्यांशी संपर्क आलेल्या आफ्रिकेच्या नागरिकांमध्ये काही काळानंतर या विषाणूंची लागण झाली. पूर्वी हा आजार फक्त प्राण्यांपुरताच मर्यादित होता; पण आता इबोला विषाणूंचे संक्रमण माणसाकडून माणसाकडेही होऊ शकते. इबोला आजाराच्या विषाणूंचे पाच प्रकार असून त्यातील तीन आफ्रिकेत व अन्य दोन प्रकारचे विषाणू फिलिपाइन्समध्ये सापडतात. त्यातील फिलिपाइन्समध्ये आढळणारे इबोलाचे दोन विषाणू हे फारसे घातक नाहीत. इबोलाग्रस्त रुग्णांवर उपचार करणार्‍या डॉक्टर तसेच अन्य वैद्यकीय कर्मचार्‍यांना सर्वात पहिल्यांदा त्याची लागण होण्याचा धोका आहे. इबोलाच्या विषाणूंची माणसांत लागण झाल्याचे सर्वप्रथम १९७६ मध्ये उजेडात आले. त्या वर्षी सुदान, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो या देशांमध्ये इबोलाच्या साथीने थैमान घातले होते. इबोला साथीच्या संकटाकडे जागतिक आरोग्य संघटनेबरोबरच भारतानेही अतिशय गांभीर्यपूर्वक पाहिले आहे. इबोला साथीने ग्रस्त असलेल्या पश्चिम आफ्रिकेतील चार देशांमध्ये सुमारे ४५ हजारांहून अधिक भारतीय नोकरी-धंद्यासाठी वास्तव्य करून आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या शांतता फौजेत समावेश असलेले सीआरपीएफचे ३०० जवान लायबेरिया या देशात सध्या तैनात आहेत. इबोलाग्रस्त देशांमधील भारतीयांना प्रभावी वैद्यकीय मदत मिळण्यासाठी काही तातडीची पावले केंद्र सरकारने उचलली आहेत. आता महत्त्वाचा प्रश्न आहे की, इबोलाची लागण झालेल्यांपैकी कोणी भारतीय आफ्रिकेतून भारतात परतले तर त्यांच्या माध्यमातून या विषाणूचा फैलाव इथेही होण्याची शक्यता आहे. त्यातून जर भीषण परिस्थिती उद्भवली तर त्याला तोंड द्यायला आपली वैद्यकीय यंत्रणा पुरेशी सक्षम आहे का असा प्रश्‍न उपस्थित होतो. इबोला आजाराची निदान चाचणी करण्याची सुविधा भारतात दोन-तीन महत्त्वाच्या संस्था वगळता अन्य कुठेही उपलब्ध नाही. त्यामुळे विदेशातून भारतात येणार्‍यांच्या रक्त तपासणीचीच सुविधा तातडीने उभारून चालणार नाही, तर इबोलाच्या साथीचा मुकाबला करण्यासाठी देशभरातील वैद्यकीय यंत्रणा अधिक मजबूत करावी लागेल. हे आव्हान केंद्र सरकारने पेलणे आवश्यक आहे. शास्त्रीय संशोधनातून जग आज इतके आधुनिक होऊनही एड्स,कॅन्सरसारखे काही आजार पूर्ण बरे करण्यासाठी अद्यापही रामबाण उपाय शोधण्यात यश आलेले नाही. इबोला या आजारानेही जगापुढे असेच आव्हान उभे केले आहे व त्यापुढे माणूस सध्या तरी हतबल आहे. मात्र एक मूलभूत प्रश्‍न उपस्थित होतो तो म्हणजे, स्वाईन फ्लूच्या वेळी जसा बहुराष्ट्रीय कंपन्यांनी बागुलबुवा उभा करुन या रोगाविषयी लोकांमध्ये भीती उभी केल्याचे स्पष्ट झाले होते. आता देखील तसाच बागुलबुवा उभा करण्यात आला आहे की खररोकरीच हा रोग गंभीर आहे, हे तपासावे लागणार आहे. इबोलाचे स्वरुप हे जवळपास एड्‌ससारखेच दिसत आहे. किंवा त्याहून गंभीर असे त्याचे रुप आहे. मात्र त्याविषयी लोकांमध्ये घबराट निर्माण करण्याऐवजी वस्तुस्थिती पुढे येणे गरजेचे आहे.
------------------------------------

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel