-->
संपादकीय पान मंगळवार दि. १२ ऑगस्ट २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------
कोकण विद्यापीठ हवेच
--------------------------
कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ असण्याची गरज आता भागविली जाणार आहे. रायगड जिल्ह्यात एका कार्यक्रमात बोलताना खासदार अनंत गिते यांनी अशा प्रकारच्या विद्यापीठाची स्थापना करण्यात येणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा केली. याबद्दल खासदार गिते यांचे आभार मानले पाहिजेत. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे हे विद्यापीठ स्थापन केले जाणार असल्याचे सुतोवाच त्यांनी केले आहे. सध्या कोकणामध्ये मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये आहेत. सातशे महाविद्यालये संलग्न असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या प्रशासनावर कमालीचा ताण पडत आहे. त्यामुळे कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ असण्याची आवश्यकता होती. १८५७ साली स्थापन झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या कार्यक्षमतेसंबंधी नेहमीच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सध्या विद्यापीठात गोंधळाचे वातावरण आहे. पेपरफुटीची लागण, उशिरा लागणारे निकाल, प्रमाणपत्र मिळण्यात होणारा विलंब, अभ्यासमंडळ व प्राध्यापकांच्या नियुक्तीस होणारा विरोध हा मूलतः विद्यापीठाचा वाढलेला अवाढव्य पसारा कारणीभूत आहे. मुंबई विद्यापीठाची स्वतःची अशी परंपरा व प्रतिष्ठा होती. अलिकडे मात्र हे विद्यापीठ म्हणजे गोंधळाचे व अकार्यक्षमतेचे एक उत्तम उदाहरण ठरले आहे. गोव्याच्या सीमेवरील दोडामार्ग महाविद्यालयातील विद्यार्थी-प्राध्यापकांना ५५० किमी अंतरावरील विद्यापीठाच्या कामाकरिता मुंबई जाणे अवघड होऊन बसले आहे. सॅम पित्रोदा यांच्या राष्ट्रीय ज्ञान आयोगाने देशात १५०० विद्यापीठांची गरज व्यक्त केली. आज देशात ३३२ विद्यापीठे, १३० अभिमत, ९४ खाजगी तसेच इतर संस्थांची भर घातल्यास एकूण ६११ विद्यापीठे आहेत. थोडक्यात त्यात ९०० भर घालण्याची गरज आहे. वास्तविक, कोकणसारख्या दुर्गम व सोयी नसलेल्या भागात विद्यापीठ असावे, ही मागणी रास्तच आहेे. अलिकडेच मुंबई विद्यापीठाने कराड यांच्या एम.आय.टी. व डी. वाय. पाटील संस्थांना सेल्फ फंडिंग विद्यापीठ सुरू करण्यास परवानगी दिली आहे. कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग तसेच दक्षिण रायगडमधील चार तालुक्यांतील १३६ महाविद्यालयांकरिता स्वतंत्र कोकण विद्यापीठ स्थापन करणे ही काळाची गरज आहे. डॉ. राम ताकवले समितीने मुंबई, पुणे, नागपूर विद्यापीठाचे विभाजन करून स्वतंत्र विद्यापीठ निर्माण करण्याची सूचना केली आहे. तसेच त्यागराजन समितीने प्रत्येक जिल्ह्यात विद्यापीठ निर्माण करण्यावर भर दिला आहे. प्रत्येक विद्यापीठात किमान १०० महाविद्यालयांचा निकषांमध्ये कोकण विद्यापीठाचा समावेश होऊ शकतो. देशातील शैक्षणिक धोरणाचा विचार करता, लहान विद्यापीठांची वाढ झाल्यास विद्यापीठ अधिक कार्यक्षमतेने काम करून शैक्षणिक विकास गतीने होण्यास मदत होईल. यातून विद्यापीठाचा दर्जा सांभाळण्यास मदत होईलच तसेच यातून विद्यार्थ्यांची उत्तम सोय होऊ शकते. कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ झाल्यास कोकणातील स्थानिक गरजेप्रमाणे सुसंगत असे रोजगारक्षम अभ्यासक्रम तयार करता येतील. यामध्ये समुद्रविज्ञान, नारळ संशोधन विज्ञान, प्रक्रिया उद्योग, पर्यटन तसेच व्यापारी जहाज वाहतुकीसंबंधी अनेक अभ्यासक्रम सुरू करता येतील. कोकणच्या किनारपट्टीवर एखादे मत्स्यविद्यापीठ असण्याचीही आवश्यकता आहे. तसेच, बंदर विकासाला लागणारे मनुष्यबळ पुरविणारे एकही अभ्यासक्रम उपलब्ध नाहीत. आज कोकणात बंदर व जहाज व्यवसायात हजारो कोटींची गुंतवणूक झाली आहे. परंतु त्यांना प्रशिक्षित तरुण मिळत नाहीत. मुंबई विद्यापीठातील अभ्यासक्रमावर शहरी पगडा आहे. कोकण विद्यापीठातील अभ्यासक्रमाची निवड करताना कोकणी संस्कृती व तोंडवळा याचा प्राधान्याने विचार करता येईल. कोकणातील रायगड, रत्नारिगी व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांत भौगोलिक सलगता तसेच शैक्षणिक प्रश्न समान आहेत. दहावी व बारावी परीक्षांचे निकाल पाहता कोकणामध्ये कॉपीचे प्रमाण शून्य असल्यामुळे परीक्षा व्यवस्थेची गुणवत्ता अधिक वाढीस लागेल. प्रवास, वेळ, खर्च वाचल्याने प्रशासनामध्ये कार्यक्षमता निर्माण होईल. देश व विदेशातील विद्यापीठांशी स्वतंत्रपणे करार करून कम्युनिटी कॉलेजसारखे प्रकल्प यशस्वीपणे राबविता येऊ शकतील. कोकणात अनेक प्राध्यापकांचा अनुभव व सखोल ज्ञान व दूरदृष्टी यांचा उपयोग विद्यापीठाला दिशा देण्याचे काम करील. तसेच विद्यापीठाच्या विविध विभागांसाठी प्रोफेसर व रिडर्स नेमताना भारतामधील विविध भागांतून अभ्यासू व्यक्तींची निवड करता येईल. जेणेकरून ज्ञानाचे आदानप्रदान होईल. कोकणामध्ये नव्याने स्थापन झालेल्या कोकण बोर्डातील दहावी व बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी सलगपणे तीन वर्षे महाराष्ट्रात अव्वल स्थान पटकावले आहे. कोकणातील विद्यार्थी बुद्धिमान होतेच, परंतु कोकण बोर्डामुळे महाराष्ट्राच्या शैक्षणिक नकाशावर त्यांचे स्थान अधोरेखित झाले. कोकणातील विद्यार्थी हुशार, प्रामाणिक, कष्टाळू असल्याने कोकण विद्यापीठ देखील स्वतःचे असे स्वतंत्र स्थान निर्माण करून कालांतराने आपल्या स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभे राहून दमदारपणे वाटचाल करेल. कोकणातील दापोलीच्या कृषी विद्यापीठाने तसेच लोणेरे येथील डॉ. आंबेडकर तंत्रविज्ञान विद्यापीठाने शैक्षणिक प्रगतीसाठी मोठा हातभार लावला आहे. अमेरिकेची लोकसंख्या केवळ ३५ कोटी ऐवढी आहे. मात्र त्यांच्याकडे चार हजार विद्यापीठे आहेत. चीनमध्येही आपल्यापेक्षा लोकसंख्या जास्त आहे, मात्र त्यांच्याकडे तीन हजार विद्यापीठे आहेत. आपल्याकडे मात्र विद्यापीठांची संख्या हजारांवर पोहोचलेली नाही. अशा स्थितीत आपल्याकडे शिक्षणाचा प्रचार व प्रवास जर वाढवायचा असेल तर नव्याने विद्यापीठांची स्थापना होणे गरजेचे ठरणार आहे. त्याचबरोबर जी जुनी विद्यापीठे आहेत त्यांचा स्तर आन्तरराष्ट्रीय दर्ज्याचा झाला पाहिजे. मुंबई विद्यापीठ ऐवढे जुने असूनही जगातील आघाडीच्या ५०० विद्यापीठांमध्ये त्याचा समावेश नाही ही खेदजनक बाब आहे. आता सरकारने खासगी विद्यापीठे व विदेशी विद्यापीठांसाठी दरवाजे खुले केले आहेत. परंतु शिक्षणाचा बाजार ही विद्यापीठे मांडणार असतील तर त्याचा काही उपयोग होणार नाही. या सर्व पार्श्वभूमीवर कोकणात स्थापन केल्या जाणारे विद्यापीठ लवकरात लवकर कार्यरत व्हावे. ही केवळ घोषणा ठरु नये अशी अपेक्षा आहे.
-----------------------------------

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel