-->
संपादकीय पान बुधवार दि. १३ ऑगस्ट २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
-------------------------------------------
गोविंदांबाबतचा स्वागतार्ह निर्णय
------------------------------
मुंबईत सरावादरम्यान झालेल्या अपघातांची दखल घेत १८ वर्षाखालील गोविंदाला दहीहंडी उत्सवात सहभाग घेता येणार नाही असा महत्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. दहीहंडी उत्सव आयोजकांना २० फूट उंचीपर्यंत थर लावण्यास मात्र न्यायालयाने परवानगी दिली आहे. गेल्या काही वर्षात गोविंदांमध्ये जी स्पर्धा चालली होती ते पाहता अशा प्रकारच्या निर्बंधांची आवश्यकताच होती. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत व्हावे. नवी मुंबईत दही हंही सरावादरम्यान एका १४ वर्षीय मुलाचा पडून मृत्यू झाल्याने गोविंदाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. यावर सुनावणी करताना १८ खालील मुलांना सहभागी करून घेवू नये, असा महत्वाचा आदेश न्यायालयाने आयोजकांना दिला आहे. दही हंडी उत्सवात अपघात झाल्यास त्यास आयोजक जबाबदार राहतील असे न्यायालयाने म्हटले आहे. मात्र, दहीहंडी उत्सव ही महाराष्ट्राची ओळख असून हा उत्सव जीवंत राहावा यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत, अशी प्रतिक्रीया  संघर्ष प्रतिष्ठान दहीहंडी उत्सव समितीचे अध्यक्ष्य जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. आता सहभागी होणार्‍या गोविंदाना वयाचा दाखला द्यावा लागणार आहे. कॉंक्रीट , डांबरी रस्ता गल्लीबोळात हंडी बांधण्यास परवानगी देवू नये, खुल्या मैदानात दही हंडीचे आयोजन करण्यात यावे, कुशन वापरावे जेनेकरून पडलेल्या गोविंदाना दुखापत होणार नाही, जर हंडीत लहान मुंलाचा वापर केला तर आयोजकांवर कारवाई करावी अशा कडक अटी घालण्यात आल्या आहेत. या निकालाच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई, ठाण्यासह राज्यभरात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेली ठाण्यातील दंहीहंडीतील इव्हेंट संस्कृती बंद होणार आहे. ठाण्यातील संस्कृती प्रतिष्ठानने दहीहंडीतील थरांसाठी लाखोंची बक्षिस देण्याची प्रथा बंद करण्याचा कौतुकास्पद निर्णय घेतला असून याऐवजी अत्यंत साधेपणाने हा उत्सव साजरा करु अशी घोषणा संस्कृती प्रतिष्ठानचे प्रमुख आ. प्रताप सरनाईक यांनी केली. गेल्या काही वर्षांत दहीहंडीत लाखोंच्या बक्षिसाची उधळण होत असल्याने या उत्सवाचे रुपच बदलले आहे. गोविंदा पथकं या पारितोषिकांपायी थरांचा विक्रम करण्यासाठी झटतात. पण या नादात अनेक गोविंदा जखमी होतात. काही वेळेला ही स्पर्धा गोविंदा पथकातील तरुणांच्या जीवावरही बेतते. अशा प्रकारे जखमी झालेल्या गोविंदाकडे नंतर कुणी पहात देखील नाही असे अनेक प्रकरणात आढळले आहे. त्यामुळे हे कुणीतरी थांबविण्याची नितांत आवश्यकता होती. संस्कृतीने आता थरांची स्पर्धा न करता साधेपणाने दहीहंडी उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा आम्ही थरांसाठी लाखो रुपयांचे बक्षिसे देणार नसून याऐवजी संस्कृतीच्या वतीने गोविंदा पथकांसाठी सराव शिबीर आयोजित करण्यात येईल. यात गोविंदा पथकांना एक प्रमाणपत्र आणि सेफ्टी किट भेट म्हणून दिले जाईल. गेल्या काही वर्षात आपल्याकडील विविध संस्कृतीक उत्सवांचे विनाकारण इव्हेंटमध्ये रुपांतर करुन त्याला स्पर्धेची जोड लावण्यात आली. लाखो रुपयांची बक्षिसे यात उधळण्यात येऊ लागली. मात्र त्यासाठी कोणतेही अपघात होऊ नयेत यासाठी उपाययोजना करण्यात टाळाटाळ करण्यात आली. दहीहंडीच्या जागी तर सिनेकलाकार आणून तेथे हिरॉईन्सचे नाच करण्याची जणू स्पर्धाच लागली होती. अशा प्रकारे एक ओंगळवाणे दर्शन घडू लागले होते. आपल्याकडील या दहीहंडीतील क्रीडा प्रकारचे कौतुक करुन स्पेनमधील अनेक उत्साही नागरिक भारतात येऊन थर चढविण्याचे कौशल्य शिकून गेले. मात्र त्यांनी आपल्याकडील या ओंगळवाणी प्रकार स्वीकारले नाहीत ही बाब लक्षात घेतली पाहिजे. सरकराने दहीहंडीचा साहसी क्रीडा प्रकारात समावेश केल्यास या खेळात नियमावली तयारी होईल व गोविंदा पथकांमधील जीवघेण्या स्पर्धेवर अंकूश बसेल. परंतु हे करण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला पाहिजे. अखेरीस न्यायालयाने त्यादृष्टीने एक पहिले पाऊल टाकले आहे.
----------------------------------------------

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel