-->
संपादकीय पान शनिवार दि. १ फेब्रुवारी २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
---------------------------------------
निवडणुकांच्या तोंडावर अपारंपारिक प्रकल्पाची जाहीरातबाजी
----------------------------------
अपारंपारिक उर्जा क्षेत्रातील जगातील सर्वात मोठा प्रकल्प राजस्थानात उभारण्यात येणार आहे. देशातील या एकाच जागी सर्वाधिक मेगावॅट उत्पादन करणार्‍या या सौर उर्जेचा हा प्रकल्प तसा अजूनही कागदावरच आहे. मात्र सरकारने आगामी निवडणुका डोळ्यापुढे ठेवून या प्रकल्पाच्या सहकार्य करारावर सह्या करण्याची घाई केली आहे. त्यासाठी देशभरातील प्रमुख दैनिकांमध्ये मोठ्या जाहीराती दिल्या. अर्थात ही सर्व निवडणुका आल्यामुळे सुरु केलेली स्टंटबाजी आहे. असो. परंतु हा प्रकल्प प्रत्यक्षात कार्यान्वित झाल्यावर देशाला अपारंपारिक उर्जेतील एक आदर्श ठरेल यात काही शंका नाही. त्यामुळे यातील राजकारण बाजूला ठेवून आपण प्रकल्पाचे स्वागत केले पाहिजे. सार्वजनिक क्षेत्रातील सहा कंपन्यांनी यासाठी पुढाकार घेऊन चार हजार मेगावॅटचा प्रकल्प हाती घेतला आहे. भेल या कंपनीचे यात २६ टक्के, सोलर एनर्जी कॉर्पोरेशनचे २३ टक्के, संभार सॉल्ट लि. या कंपनीचे १६ टक्के, पॉवर ग्रीडचे १६ टक्के, सतलज जल विद्युत निगमचे १६ टक्के व तीन टक्के राजस्थान इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्व्हेस्टमेंटचे भागभांडवल असेल. गेल्या पाच महिन्यांपासून या प्रकल्पाची आखणी कागदावर सुरु होती. परंतु प्रत्यक्षात उजाडायला जानेवारी महिन्यांची अखेर आली आहे. जर निवडणुका जवळ आल्या नसत्या तर हा प्रकल्प कागदावर यायला आणखी विलंब झाला असता. कारण या प्रकल्पाला मंत्रिमंडळाची अद्याप मंजुरी मिळालेली नाही, तरी देखील याचा मोठा गाजावाजा करीत सह्या केल्या आहेत. निवडणुका आल्यामुळे निदान हा प्रकल्प मार्गस्थ होण्यास सुरुवात झाली. या प्रकल्पासाठी पहिल्या टप्प्यासाठी सुमारे ७५०० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून त्याची व्यवस्था अवजड उद्योग मंत्रालय करणार आहे. राजस्थानातील सुमारे १९००० एकर पडीक जमिनीवर हा महत्वाकांक्षी प्रकल्प येऊ घातला आहे. यासाठी लागणारी सर्व उपकरणे भेलच्या वतीने पुरविली जातील. तर निर्माण होणार्‍या सर्व वीजेची खरेदी व वितरण पॉवर ग्रीड करील. येत्या आठ वर्षात विविध टप्प्यात आखला गेलेला प्रकल्प पूर्णत्वास जाईल. पहिल्या टप्प्यात एक हजार मेगावॅट वीजेचे उत्पादन तीन वर्षात सुरु होईल. त्यानंतर पुढील टप्प्यात तीन हजार मेगावॅट वीज निर्मिती केली जाणार आहे. यात वापरल्या जाणार्‍या सौर पॅनेल्सचे सरासरी आयुष्य २५ वर्षे असेल. सर्वात महत्वाचे कोणताही कार्बन डाय ऑक्साईड हवेत न सोडला जाता हे विजेचे उत्पादन होईल. अशा प्रकारचे प्रकल्प हे आपल्याकडे यापूर्वीच सुरु झाले पाहिजे होते. परंतु अपारंपारिक उर्जेकडे आपण कमी लक्ष देऊन पारंपारिक उर्जेकडे जास्त लक्ष दिल्याने आपल्याकडे वीज उत्पादन कमी झाले. औष्णीक व जल विद्युतचे मोठे प्रकल्प उभारण्याकडे लक्ष पुरविल्याने आपल्याला यात मोठी गुंतवणूक करावी लागली आणि वेळेत हे प्रकल्प न झाल्याने त्याचा उत्पादन खर्चही वाढला. त्यापेक्षा आपण लहान आकाराचे उर्जा प्रकल्प उभारण्यासाठी आपली शक्ती व पैसा खर्ची केला असता तर आपण जास्त वीज उत्पादीत करु शकलो असतो. त्याच्याजोडीला आपल्याकडे जर अपारंपारिक उर्जा निर्मितीवर भर देण्यात आला असता तर आपण मोठ्या प्रमाणावर वीज निर्मितीचे उदिष्ट गाठू शकलो असतो. आपल्याकडे ऊन व वारा हे दोन्ही मुबलक प्रमाणात आहे आणि त्याचा आपण वीज निर्मितीसाठी वापर करण्याचा प्रयत्न केला नाही. आता निदान त्याची या मोठया प्रकल्पाच्या निमित्ताने सुरुवात झाली असे म्हणता येईल.
------------------------------------  

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel