-->
पनवेल आता महानगर

पनवेल आता महानगर

संपादकीय पान गुरुवार दि. २९ सप्टेंबर २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------
पनवेल आता महानगर
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेले व गेल्या दशकात झपाट्याने विकसित झालेले पनवेल आता महानगर झाले आहे. अखेर उशिरा का होईना पनवेलला आता अधिकृतरित्या महानगराचा दर्जा प्राप्त झाला आहे. सध्याची पनवेल नगरपालिका व शेजारची २९ गावे समाविष्ट करुन ही महानगरपालिका अखेर स्थापन झाली. येत्या १ ऑक्टोबरपासून महानगरपालिका म्हणून या शहराचा कारभार सुरू होईल. पनवेल महानगरपालिका करण्याची अधिसूचना नगरविकास खात्याने तीन महिन्यांपूर्वीच काढली होती. त्यावेळी या परिसरातील ६८ गावांचा समावेश करण्यात येणार होता. मात्र, स्थानिकांनी केलेला विरोध पाहता या प्रस्तावातून ३९ गावे वगळण्याचा निर्णय घेण्यात आला. आता कालांतराने येथे महानगरपालिका म्हणून अधिकृत पहिली निवडणूक होईल. त्याची घोषणा करण्यात येणार आहे. उशीर झाला असला, तरी आता पनवेल ही महानगरपालिका म्हणून अस्तित्वात आली आहे. रायगड जिल्ह्यातील ही पहिली महानगरपालिका आहे. मुंबईपासून जवळ असल्याने पनवेल हे गेल्या वीस वर्षांपासूनच मुंबईचे एक उपनगर म्हणून झपाट्याने विकसित होत होते. या शहराच्या वाढत्या गरजा, पायाभूत सुविधा यांचा ताळमेळ सध्याच्या स्थितीत घातला जात नव्हता. त्यामुळे या शहराला महानगराचा दर्जा देऊन तिचा विकास करण्याची गरज होती. या परिसारातील खारघर, कळंबोली, कामोठे ही गावे म्हणून खूपच मोठी झाली होती. म्हणजे, ही गावे एखादी नगरपालिका व्हावी अशी होती. मुंबईतील जागांच्या किंमती ज्यावेळी वाढू लागल्या त्यावेळी सर्वसामान्य नोकरदाराला उपनगरात घराचा आसरा घ्यावा लागला. यातूनच पश्‍चिम उपनगर विरारपर्यंत व मध्य उपनगर कल्याण, पनवेलपर्यंत वाढत गेले. ही शहरे नियोजनाच्या अभावी वेडी-वाकडी वाढली. येथे अनधिकृत बांधकामे करणे, ही नित्याची बाब झाली. पिण्याचे पाणी, सांडपाणी, रस्ते यांचे नियोजन न करण्यात आल्याने ही शहरे बकाल झाली. विदेशात लोक कामाच्या ठिकाणापासून दूर राहातात, कारण तिकडे ऐसपैस जागा मिळते, शांती मिळते, त्याहून सर्वात महत्त्वाचे म्हणजे रस्ते चांगले असल्याने शहरातही झपाट्याने पोहोचता येते. मात्र, आपल्याकडे शहरात याच्या नेमके उलटे आहे. उपनगरे ही नियोजनाच्या अभावामुळे बकाल झाली व शहराशी जोडताना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा चांगला पर्याय न उभारल्यामुळे प्रवास अतिशय वाईट झाला. याला पनवेलही काही अपवाद नव्हते. हे दिसायला तर शहर दिसते, मात्र सोयीसुविधा ग्रामीण भागाहून वाईट, अशी स्थिती आहे. आता तर महानगरपालिका झाल्यावर सत्तेत येणार्‍या पक्षापुढे या शहराची अनेक आव्हाने आ वासून उभी ठाकली आहेत. महानगरपालिकेला अनेक योजनांद्वारे निधी मिळतो, मात्र त्याचा विनियोग योग्य झाला पाहिजे. त्यापूर्वी या शहराच्या विकासासाठी पुढील २० वर्षांचे नियोजन तयार केले पाहिजे. त्यादृष्टीने भविष्यातील विकासाची दृष्टी असणारा पक्ष सत्तेवर आला पाहिजे. शहराच्या विकासात रस्त्याचे विस्तारीकरण, पाण्याचे नियोजन, सांडपाण्याचे नित्सारण या बाबींना प्राधान्य देऊन नियोजनाचा आराखडा आता करण्याची गरज आहे. मुंबईच्या एका टोकाचे हे गाव आता शहरात रुपांतरित झाले आहे. हे शहर सर्वांगसुंदर होण्यासाठी सर्वांनी झटण्याची गरज आहे. यात नागरिकांच्या सहभागाची सर्वात मोठी आवश्यकता आहे. त्यांच्या सहभागाशिवाय भविष्यातील हे महानगर सुंदर होऊच शकत नाही.

Related Posts

0 Response to "पनवेल आता महानगर"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel