-->
अखेर सुलतान सुटला

अखेर सुलतान सुटला

संपादकीय पान बुधवार दि. २७ जुलै २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
अखेर सुलतान सुटला
बॉलीवूडचा सुलतान सलमान खान याची हिट अँड रन पाठोपाठ हरिण शिकारप्रकरणी निर्दोष मुक्तता झाल्याने त्याला दिलासा मिळाला आहे. मात्र सर्वसामान्य माणसाला मात्र या निकालामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. सलमानच्या जागी जर कुणी दुसरी एखादा असता तर तो अशा प्रकारे या दोन्ही खटल्यातून निर्दोश सुटला असता का असा सवाल आहे. राजस्थानच्या खालच्या न्यायालयांनी त्याला दोषी ठरवून पाच वर्षांची सजा सुनावली होती. मात्र आता राजस्थान उच्च न्यायालयाने मात्र त्याची निर्दोश सुटका  केली आहे. एवढेच नव्हे तर या प्रकरणी काळविट मारलाच गेला नाही. ही संपूर्ण केसच खोटी उभी करण्यात आली असे न्यायालयात ग्राह्य धरण्यात आले. हे सर्व प्रकरण पाहता सर्वसामान्यांना एक न्याय व श्रीमंतांना दुसरा न्याय असेच आपल्याला म्हणावे लागेल. १९९८ मध्ये हम साथ साथ हैं या चित्रपटाचे चित्रीकरण राजस्थानमध्ये जोधपूरनजीक सुरू असताना सलमान सहकलाकारांना घेऊन दोन दिवस शिकारीला गेला आणि तेथे त्याने एकूण तीन हरणांची शिकार केल्याप्रकरणी संबंधितांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. सलमानसारखा सेलिब्रिटी खटल्यात गोवला गेल्याचे पाहून माध्यमांनी हा मुद्दा खूपच उचलून धरणे स्वाभाविकच होते. देशात गदारोळ उडून सलमानला प्रथम तुरुंगवारी घडली आणि नंतर न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावे लागले. कनिष्ठ न्यायालयाने सलमानला दोषी ठरवत एका प्रकरणी एक तर दुसर्‍या प्रकरणी पाच वर्षांची शिक्षा ठोठावली. त्यावर सलमानने उच्च न्यायालयात दाद मागितली असता सुनावणीअंती गेल्या सोमवारी त्याची निर्दोष मुक्तता झाली. सलमान आता कसा सुटला याचा अभ्यास केल्यास त्याला सोडविण्यासाठी पध्तशीररित्या प्रयत्न केले गेले आहेत, असेच दिसते. कारण साक्षीप्रसंगी अनेकांची गैरहजेरी, वन विभाग आणि पोलिसांच्या तपास अहवालात असलेली तफावत, १२ पैकी १० आरोपी अगोदर निर्दोष ठरत असतील तर सलमानच दोषी कसा, अन्य आरोपींविरोधात काही म्हणणे नाही, मग सलमानच्याच बाबतीत शिक्षा वाढवण्याचा खटाटोप का, यासारख्या प्रश्नांना सरकार पक्षाकडे समाधानकारक उत्तरे नसल्याचे दिसते. हे लक्षात घेतल्यास सलमानच्या सुटकेबाबतचा संभ्रम बर्‍याच अंशी दूर होतो. परंतु सलमान दोषी नाही तर मग दोषी कोण, तेदेखील स्पष्ट होत नसल्याने संशयही कायम राहतो. आता तर असा नवीन शोध लावला गेला आहे की, हरणे तर मेलीच नाहीत. कारण सध्या कोर्टापुढे हरणे मेल्याचे पुरावेच नाहीत. म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की, हरणे मारल्याचा पुरावा नष्ट करण्यात आला, आता या घटनेला वीस वर्षे होत आहेत, त्यामुळे पुरावे नष्ट करण्यासाठी पुरेसा काळ मिळाला. असो, मात्र जर हरणे मेलीच नसतील व सलमानच्या विरोधात खोटा खटला दाखल केला असले तर संबंधित वनअधिकार्‍यांवर आता खटला भरला गेला पाहिजे. त्याची तयारी राजस्थान सरकार करणार आहे का हा सवाल आहे.

Related Posts

0 Response to "अखेर सुलतान सुटला"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel