-->
गृह, वाहन कर्जाचा दिलासा / अंगुरी भाभी कॉँग्रेसमध्ये

गृह, वाहन कर्जाचा दिलासा / अंगुरी भाभी कॉँग्रेसमध्ये

शुक्रवार दि. 8 फेब्रुवारी 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
गृह, वाहन कर्जाचा दिलासा
निवडणुका आल्यावर सरकार सर्वच क्षेत्रातील लोकांना दिलासा द्यायला सज्ज होते. याचे उत्तम उदाहरण गुरुवारी रिझर्व्ह बँकेने सादर केलेल्या पतधोरणातून देता येईल. रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांची कपात केली आहे. त्यामुळे आता रेपो रेट 6.50 टक्क्यांवरून 6.25 टक्के घसरला आहे. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळं बँकांचे व्याजदर कमी होऊन, गृह आणि वाहन कर्ज स्वस्त होण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयाचे मध्यमवर्गीयांना प्रामुख्याने फायदा होणार आहे. नुकत्याच सादर केलेल्या केंद्रीय अंतरिम अर्थसंकल्पात कनिष्ठ मध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात सवलत देऊन दिलासा देण्यात आला होता. मात्र यात उच्च उत्पन्न असलेल्या मध्यमवर्गीयांना फारसा फायदा झाला नव्हता. आता रेपो दर पाव टक्क्याने कमी करुन वाहन व गृह कर्जाचा दर कमी होण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे. याचा सर्वात मोठा फायदा शहरी मध्यमवर्गीयांना होईल. महत्वाचे म्हणजे भाजपाचा हा मोठ्या संख्येने मतदार आहे. रिझर्व्ह बँकेने 2017 नंतर प्रथमच रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांची कपात करत असल्याची घोषणा केली आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यीय नाणेनिधी धोरण समितीने रेपो रेट 0.25 टक्क्यांनी कमी केला. सहा पैकी चार सदस्यांनी रेपो रेट कमी करण्याच्या समर्थनात मत दिले असून आता रेपो रेट 6.25 झाला आहे. यापूर्वी हा दर ऑगस्ट 2017 मध्ये कमी करण्यात आला होता. रिझर्वह बँकेने मार्च त्रैमासिकासाठी महागाई दराचा अंदाज कमी करून 2.8% केला आहे. येत्या आर्थिक वर्षात (2019-20) प्रथमच सहामाही महागाई दर 3.2% वरून 3.4% राहण्याचा अंदाज आहे. म्हणजे महागाई वाढेल असा अंदाज व्यक्त झाला आहे. येत्या आर्थिक वर्षाच्या तिसर्‍या त्रैमासिकात महागाई दर 3.9% राहणार असा अंदाज लावण्यात आला आहे. असे असतानाही व्याजाचे दर घसरण्यासाठी रिझर्व्ह बँक प्रोत्साहन देत आहे. याचा अर्थच स्पष्ट आहे की, रिझर्व्ह बँकेचा हा निर्णय अर्थकारणातून घेतलेला नाही तर सरकारच्या दबावाखाली राजकीय स्वर्स्थासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मध्यवर्ती बँकेने त्याचबरोबरीने शेतकर्‍यांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यांना दिल्या जाणार्‍या कर्जमर्यादेत वाढ करण्यात आली आहे. आता हमीविना शेतकर्‍यांना 1.60 लाखांपर्यंत कर्ज मिळू शकते. आधी ही मर्यादा एक लाखापर्यत होती. याचा शेतकर्‍यांना फायदा होऊ शकतो. अर्थातच हा देखील राजकीय निर्णय आहे. रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर रघुराम राजन असताना व त्यांच्यानंतर आलेल्या उर्जीत पटेल यांनी देखील कोणत्याही सरकारी दबावाची तमा न बाळगता निर्णय घेतले होते. उर्जीत पटेल यांना देखील त्यांनी सरकारी दबाव झुगारल्यानेच जावे लागले हे सांगावयास कोणी संशोधकाची गरज नाही. आता मात्र सरकार रिझर्व्ह बँके ही स्वायत्त संस्था देखील आपल्या कर्‍ह्यात कशी येईल व आपल्याला हवे तसे निर्णय कसे घेईल हे पाहत आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पद स्वीकारल्यानंतर घेतलेला हा पहिला पतनिर्णय आहे. यातून ते सरकारला शरण गेल्याचेच दिसतात. त्यांच्याकडून सत्ताधार्‍यांचे राजकीय हित संवर्धन करण्याचे नव्हे तर अर्थकारणास साजेसे निर्णय घेण्याची अपेक्षा आहे. 
अंगुरी भाभी कॉँग्रेसमध्ये  
भाभीजी घर पर है या मालिकेत अंगुरी भाभीचे पात्र साकारणारी अभिनेत्री शिल्पा शिंदेने आता काँग्रेसवासीय झाली आहे. सध्या कलाकारांचे पक्ष प्रवेश गाजत आहेत. नुकताच किमी काटकर या अभिनेत्रीने भाजपात प्रवेश केला होता. 41 वर्षीय शिल्पा ही भाभीजीच्या भूमिकेमुळे खरी सर्वात प्रथम प्रकाश झोतात आली. 1999 पासून दूरदर्शन वाहिनीवरुन शिल्पाने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. अनेक टीव्ही सिरियल्समध्ये दिसली. परंतु एक कलाकार म्हणून तिला भाभीजीच्या सिरियलने विशेष ओळख मिळाली. मानधन वाढवून देण्याच्या प्रश्‍नावरुन तिने ही मालिका नंतर सोडली. नंतर बिग बॉसमुळे ती घराघरात पोहोचली आणि पुन्हा प्रसिद्धीच्या शिखरावर गेली. शिल्पाने हातिम, चिडियाघर, देवो के देव महादेव, लापतागंज अशा मालिकांमध्ये काम केलेे आहे. शिल्पाला अभिनयासोबतच पेंटींग आणि डान्सिंगची आवड आहे. ती तणावातून बाहेर येण्यासाठी आणि मनाच्या समाधानासाठी चित्रकलेची मदत घेते. मराठमोळ्या शिल्पाचे वडिल उच्च न्यायालयात न्यायमूर्ती होते. कॉँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाणार असल्याची चर्चा होती. गेल्या काही वर्षात वर्षभरापासून ती मालिकांपासून दूर होती. यापूर्वी तिच्यावर बंदी घालण्यात आली होती. काही वेब सिरीजमध्ये ती सध्या काम करत आहे. शिल्पा तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहे. नुकतेच तिने इन्स्टाग्राम तसेच ट्विटरील तिचे खाते बंद करून टाकले होते. आता कॉँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविण्याचीही तिची इच्छा आहे. परंतु तिला भविष्यात तिकीट खरोखरीच मिळते का ते पहायचे. ही भाभीजी कॉँग्रेसध्ये येऊन पक्षाला किती फायदा होते ते देखील पहावे लागेल. मात्र भाभीजीच्या प्रवेशानंतर एक बाब स्पष्ट झाली आहे की, आता कॉँग्रेसमध्ये आऊट गोइंग थांबले असून इनकमिंग सुरु झाले आहे हे मात्र नक्की. 
----------------------------------------------------------------

0 Response to "गृह, वाहन कर्जाचा दिलासा / अंगुरी भाभी कॉँग्रेसमध्ये "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel