-->
मोदींचे शेवटचे भाषण

मोदींचे शेवटचे भाषण

शनिवार दि. 9 फेब्रुवारी 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
मोदींचे शेवटचे भाषण
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी लोकसभेत आपले शेवटचे भाषण केले. त्यांचे हे पंतप्रधान म्हणून शेवटचेच भाषण ठरणार आहे. कारण आता पुन्हा भाजपा सत्तेत येण्याची चिन्हे नाहीत व अल्पमतात भाजपाचे सरकार आले तरी मोदी पुन्हा पंतप्रधानांच्या खुर्चीत असण्याची शक्यता तर नाहीच नाही. हे केवळ आमचे भाष्य नाही तर भाजपाची पितृसंघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी देखील त्याच दिवशी भाजपा पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता धुसर असल्याचे म्हटले आहे. एकीकडे मोदींनी उसने आवसान आणून लोकसभेत केलेले शेवटचे भाषण तर दुसरीकडे भागवतांनी केलेली भविष्यवाणी हे पाहता भागवतांचीच भविष्यवाणीच खरी ठरु शकते यावर आमचा विश्‍वास आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत निवडणुकांपूर्वीचे हे अंतिम भाषण केले. यात त्यांनी आपण केलेल्या कामाचा आढावा घेणे हे आपण समजू शकतो. परंतु पंतप्रधानांनी ज्या पक्षाचे पंन्नासही खासदार नाहीत व त्यांचा विरोधी पक्ष नेताही नाही अशा कॉँग्रेस पक्षावर जी आगपाखड केली ते एैकून आश्‍चर्यच वाटते. याच कॉँग्रेस पक्षाला संपविण्याची भाषा त्यांनी पाच वर्षापूर्वी केली होती. अशा पक्षाने गेल्या 55 वर्षात काहीच केले नाही हे ठणकावून सांगण्याची काहीच गरज नव्हती. आता तर ते म्हणत आहेत की, काँग्रेसचे अस्तित्व नसावे ही माझी नव्हे तर महात्मा गांधींचीच इच्छा होती. परंतु गांधींनी कॉँग्रेस पक्ष बरखास्त करण्याची सूचना केली होती व मोदी-शहा ही जोडी कॉँग्रेस पक्ष संपवायला निघाले होते. बरखास्त व संपविणे यातील फरक पंतप्रधाानंना समजू नये, याचे आश्‍चर्य वाटते. असो, कॉँग्रेसने काहीच गेल्या 55 वर्षात केले नाही असे म्हणणे चुकीचेच ठरेल. आज जो देश स्वातंत्र्यानंतर उभा राहिला आहे, तो याच सत्ताधार्‍यांनीच उभा केला आहे. कॉँग्रेसचे जे काम आहे ते नाकारण्यात अर्थ नाही. त्याचबरोबर कॉँग्रेसने सत्तकारण करताना ज्या चुका केल्या त्याचे माप त्यांच्या पदरात घातले पाहिजे, हे देखील तेवढेच खरे आहे. कॉँग्रसने राफेल संबंधी जे आरोप केले त्यावर सडेतोड उत्तर देण्यापेक्षा कॉँग्रेसलाच संरक्षण दल कमकुवत पाहिजे आहे, असा आरोप त्यांनी करणे म्हणजे राफेलमध्ये निश्‍चतच घोटाळे आहेत हे मान्य करण्यासारखे आहे. अन्यथा त्यांनी असा प्रकारचे दिशाहीन आरोप करण्यापेक्षा राफेलच्या आरोपाबाबतील सफाई देणार्‍या फैरी झाडल्या असत्या. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षाच्या नेत्यांवर कडाडून टीका केली. विरोधकांची टीका म्हणजे उल्टा चोर चौकीदार को डांटे? हो क्या गया है आप लोगों को?, अशा शब्दांत पंतप्रधानांनी विरोधकांचा समाचार घेतला. मात्र त्यांनी आपल्यावर झालेल्या आरोपाची सफाई दिली नाही. महाआघाडी म्हणजे महाभेसळ असून हे लोक सत्तेत येऊ शकत नाही, असेही मोदींनी यावेळी सांगितले. अर्थात अशा प्रकारे विरोधकांच्या राजकारणावर टीका पंतप्रधानांच्या खुर्चीत बसून संसदेच्या सभागृहात करणारे मोदी हे पहिलेच असावेत. त्यांनी ही टीका भाजपाच्या अधिवेशनात केली असती तर चालले असते. त्यामुळे त्यांनी आजवरचे यासंबंधीचे सर्व संकेत पायदळी तुडवले आहेत. सरकारने सत्तेत येताना दोन कोटी नोकर्‍या व काळा पैसा देशात आणण्याची तसेच प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करण्याची घोषणा केली होती. यातील काही कामे झालेली नाहीत. नोटाबंदीमुळे नवीन नोकर्‍या सोडून द्या सध्या असलेल्या नोकर्‍याही टिकविणे कठीण झाले आहे. यासंबंधी मोदींनी आपल्या भाषणात पूर्णपणे मौन पाळले आहे. आयकर भरणार्‍यांची संख्या गेल्या काही वर्षात सातत्याने वाढत आहे व त्याचे श्रेय हे सरकार घेत आहे. खरे तर ज्यावेळीपासून पॅन कार्ड खात्याला लिंक करण्यात आले तेव्हापासूनच प्राप्ती कर चुकवणे कठीण झाले आहे. त्यामुळे ही संख्या सातत्याने वाढत आहे. तसेच सरकारने सहा कोटी गॅस कनेक्शन ग्रामीण भागातील महिलांना दिली आहेत. मात्र नुकत्याच आलेल्या एका अहवालानुसार, यातील 85 टक्के ग्राहकांनी दुसर्‍यांचा गॅस घेतला नाही, कारण त्यांची तेवढी आर्थिक कुवतच नाही. त्यामुळे या योजनेचा तसे पाहता फज्जा उडाला आहे. इंटरनेट डाटाचा विस्तार झाला हे सरकार म्हणजे. परंतु यात शासनाची भूमिका शून्य आहे. हे खासगी कंपन्यांचे व्यवसायिक काम आहे. सरकारने दहा कोटी शौचालये बांधली असा दावा केला जातो, मात्र या संबंधी प्रत्यक्षात तर काहीच दिसत नाही. मग ही दहा कोटी शौचालये कुठली असा प्रश्‍न पडतो. पाच वर्षांपूर्वी म्हटले जात होते, की नरेंद्र मोदींची छाती 56 इंची आहे, ते 15 वर्षे राज्य करतील. परंतु आज भाजपाला बहुमत मिळणार नाही असे बोलले जात आहे, त्यावरुन मोदींची लोकप्रियता किती घसरली ते दिसतच आहे. टेलिग्राफ या अमेरिकेतील दैनिकाने नुकतेच लेख लिहून मोदी कसे फ्लॉप आहेत हे दाखवून दिले आहे. देशातील जनताच नव्हे तर विदेशातही लोकांना मोदींचा फ्लॉप शो दिसू लागला आहे. त्यामुळे हे मोदींचे पंतप्रधानपदावरचे अखेरचेच भाषण आहे हे नक्की.
---------------------------------------------------------

0 Response to "मोदींचे शेवटचे भाषण"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel