-->
उडती पायरसी

उडती पायरसी

संपादकीय पान सोमवार दि. २० जून २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
उडती पायरसी
नुकताच प्रदर्शित झालेला बहुचर्चित उडता पंजाब हा चित्रपट इंटरनेटवर लीक झाल्यानंतर तो डाऊनलोड करण्यासाठी इंटरनेटवरील तब्बल ७३२ संकेतस्थळांवर उपलब्ध असल्याची माहिती तेलगु फिल्म चेंबर ऑफ कॉमर्सच्या पायरसी विरोधी शाखेने दिली आहे. या चित्रपटाला प्रदर्शनापुर्वी एवढी प्रसिद्दी मिळाली आहे की, सेन्सॉर बोर्डाने कट् सुचविण्याअगोदर हा नेमका चित्रपट काय होता हे पहाण्याकडे लोकांचा कल जास्त आहे. सेन्सॉर बोर्डाकडे दिलेली प्रत हीच लीक झाली आहे अशी चर्चा होती. उडता पंजाबमधील आक्षेपार्ह असलेली सुमारे शंभर दृश्ये वगळण्याची सूचना सेन्सॉर बोर्डाने केली होती. त्यावर नाराजी व्यक्त करत चित्रपट निर्मात्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने केवळ एक दृश्य वगळण्याचा निर्णय दिला. न्यायालयाच्या निर्णयामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र प्रदर्शनापूर्वीच दोन दिवस आधी या चित्रपटाची प्रत बेकायदेशीरपणे टॉरंट वेबसाईटस्‌वर अपलोड करण्यात आली होती. काही ऑनलाईन प्लॅटफॉर्मसवर या चित्रपटातील काही दृश्यांची चित्रे अपलोड करण्यात आली होती. तसेच अपलोड करण्यात आलेली चित्रपटाची प्रत ही सेन्सॉरला पाठविलेली असल्याच्या प्रतिक्रिया नेटिझन्सनी व्यक्त केल्या होत्या. डिजिटल स्वरुपात मोठ्या आकारात असलेल्या माहितीचे विविध स्वरुपातील फाईल्स इंटरनेटवरून वितरण करण्यासाठीचे माध्यम म्हणजे टॉरंट साईटस्. या साईटस्‌वर गाणी, चित्रपट किंवा दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम मोठ्या प्रमाणात अपलोड केले जातात. माहिती वितरणाच्या काही पद्धतींचा वापर करताना, वितरण करणार्‍या संगणक आणि नेटवर्कवर मोठ्या प्रमाणावर ताण पडतो. अशा प्रकारचा ताण कमी करण्यासाठी टॉरंट साईटस्‌चा वापर करण्यात येतो. दरम्यान चित्रपटाच्या टीमने युद्ध पातळीवर प्रयत्न करून लीक झालेला चित्रपट हटविण्यात यश मिळविले आहे. ही सर्व संकेतस्थळे शोधून तेथून हा चित्रपट हटविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मुंबईमध्ये तर या चित्रपटाच्या पायरेटेड डीव्हीडीही विक्रीसाठी उपलब्ध झालेल्या आहेत. हे सर्व पाहता सेन्सॉर बोर्डाने सुचविलेले हे सर्व कट् म्हणजे किती पोरखेळ होता हे उघड झाले आहे. कागरण आता सेन्सॉरने काही सुचविले तरी मूळ प्रत ही एकदा कुठे लिक झाल्यास ती इंटरनेटच्या माध्यमातून सर्वत्र पसरण्यास सहज मदत होते. अशा सध्याच्या या आधुनिक युगात सेन्सॉर बोर्डाची भूमिका ही अगदीच मूर्खपणाची ठरते. त्यामुळे सध्या सेन्सॉर बोर्डाची गरज आहे का व असल्यास त्यांनी नेमक्या कोणत्या प्रश्‍नी आपली भूमिका बजावावी याची नवी व्याख्या करावी लागणार आहे.

0 Response to "उडती पायरसी"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel