-->
केवळ एकमेकांना इशारे...

केवळ एकमेकांना इशारे...

संपादकीय पान मंगळवार दि. २१ जून २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
केवळ एकमेकांना इशारे...
सध्या शिवसेना व भाजपा हे मांडीला मांडी लावून सत्तेत बसलेले असले तरी ते परस्परांचे शत्रू असल्यासारखे वागत आहेत. शिवसेनेने तर आपल्या टीकेची धार एवढी तीव्र केली आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विरोधी पक्षही एवढी जहरी टीका करीत नसतील. त्यातच मुंबईसह राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका जवळ आल्याने भाजपा व शिवसेना हे दोन्ही पक्ष या निवडणुका स्वतंत्रपणे लढविणार हे आता स्पष्ट झाले आहे. शिवसेना आणि भाजपमधील तणातणी वाढत चालली असताना युती टिकणार की नाही, या चर्चेलाही जोर आला आहे. शिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्यात रविवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युती तोडायची इच्छा नाही, पण युतीसाठी आम्ही लाचार नाही, वेडीवाकडी युती करणार नाही, असे खडे बोल भाजपाला सुनावले. तर भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत शिवसेनेच्या वाढत्या टीकेवर संतप्त सूर उमटला आणि युतीचा निर्णय स्थानिक पातळीवर घ्यावा, असा निर्णय झाला. भाजपाच्या अनेक नेत्यांनी युती तोडून टाका असा आपल्या नेत्यांना सांगितले. शिवसेनेचे हे लोढणे आता भाजपाला नको झाले आहे. खरे तर मागच्याच विधानसभेला हे लोढणे भाजपालएा नकोसे झाले होते परंतु भाजपाला स्वबळावर सत्ता न मिळाल्यामुळे शिवसेनेला सत्तेत सहभागी करुन घ्यावी लागले. मात्र शिवसेनेने सत्ते सहभागी करुन घेण्यासाठी ज्यावेळी दया-याचना केली त्यावेळीच त्यांना भाजपाने सत्तेचे दरवाजे खुले केले. आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा इशारा दोन्ही पक्षांनी एकमेकांना दिला आहे. शिवसेना हा भाजपचा जुना मित्रपक्ष असून, सरकारमधील वाद एकत्र चर्चेने सोडवा, असा सल्ला देणारे केंद्रीयमंत्री वेंकय्या नायडू यांची पाठ फिरताच भाजपने युती तोडण्यावरच रविवारी प्रदेश बैठकीत भर दिला. युतीबाबत पक्ष पदाधिकार्‍यांनी येथील बैठकीमध्ये संतप्त भावना व्यक्त केल्यानंतर युतीसंबंधीचे सर्वाधिकार स्थानिक पातळीवर देण्याची भूमिका पक्षाने घेतली. त्यामुळे महापालिका निवडणुका भाजप स्वबळावर लढणार ही बाब स्पष्ट झाली आहे. शिवसेनेच्या नेत्यांकडून सातत्याने खालच्या स्तरावर टीका होत आहे. त्याबाबत प्रदेश कार्यकारिणीत अनेक पदाधिकार्‍यांनी संतप्त भावना व्यक्त केली. एकीकडे सत्तेचा लाभ घ्यायचा आणि दुसरीकडे भाजपवर घणाघाती टीका करायची या शिवसेनेच्या दुटप्पी भूमिकेवर पदाधिकार्‍यांनी बोट ठेवले. मोठा पक्ष म्हणून भाजपने पुढे येण्यासाठी प्रयत्न करावेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढाव्यात, अशी मागणीही करण्यात आली. राज्यात सरकार आले तेव्हा भाजप हा एकच पक्ष होता. दोन महिन्यांनंतर शिवसेना सत्तेमध्ये सहभागी झाली, हे वास्तव विसरता येणार नाही. आपल्याच सरकारमध्ये राहून शिवसेना नेते पुन्हा सरकारला निजामाच्या बापाचे राज्य म्हणतात, हा काय प्रकार आहे? असा भाजपाने उपस्थित केलेला सवाल काही चुकीचा नाही. मात्र शिवसेना सत्ता सोडण्याचे धारिष्ट्य दाखविणार नाही. कारण सत्ता गेली तर ती पुन्हा मिळायची नाही याची त्यांना कल्पना आहे. त्यामुळे हे दोन्ही पक्ष फक्त एकमेकांना इशारेच करण्याचे काम करीत राहाणार आहेत...

0 Response to "केवळ एकमेकांना इशारे..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel