-->
मोदींची घटती लोकप्रियता

मोदींची घटती लोकप्रियता

संपादकीय पान शुक्रवार दि. ८ एप्रिल २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
मोदींची घटती लोकप्रियता  
पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता हळूहळू घटू लागली आहे. अर्थात हे मोदींचे विरोधक सांगत नाहीत तर भाजपच्या राज्य कार्यकारिणी बैठकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या राज्य समिती सदस्यांसाठी म्हणून भाजप वॉर रूमतर्फे काढण्यात आलेल्या पुस्तिकेत हा धक्कादायक म्हणावा असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. २०१३-२०१४ मध्ये नमो समर्थकांची संख्या ४० टक्के, कार्यकर्ता ४५ टक्के, तर इच्छुक नागरिक १५ टक्के अशी विभागणी होती. तर २०१६ मध्ये ही तुलना नमो समर्थक २५ टक्के, त्याबरोबरीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समर्थक २५ टक्के, कार्यकर्ता १५ टक्के, इच्छुक नागरिक २५ टक्के, तर सत्तेमुळे प्रभावित झालेला गट १० टक्के अशी विभागणी आहे. यातील महत्त्वाचे म्हणजे मोदींची लोकप्रियता तब्बल १५ टक्क्यांनी घटल्याचे पक्षीय पातळीवरच मान्य करण्यात आले आहे. ही कबुली केवळ वरिष्ठ सदस्यांसाठीच असणार्‍या अंतर्गत पुस्तिकेत देण्यात आली असली तरी माध्यमांद्वारे ती चर्चेत आली आहे. आजवरच्या राजकारणाशी संबंधीत कोणतीही लाट असो ती दीड ते दोन वर्षात आटली आहे, असे इतिहास सांगतो. नरेंद्र मोदींची लाट ही तर व्यक्तीनिष्ठच होती व अनेक खोटी आश्‍वासने देऊन ते सत्तेवर आले होते त्यामुळे या लाटेला ओहटी लागणे क्रमप्राप्तच होते. पक्षाच्या यापुस्तिकेतील तुलनेनुसार मोदी आणि फडणवीस यांची लोकप्रियता राज्यात समसमान आहे आणि कार्यकर्त्यांचा पक्षाकडचा कल तर ३० टक्क्यांनी घटला आहे. म्हणजे पक्षात पुन्हा एकदा व्यक्तींना प्राधान्य देण्यात आले आहे. पक्षातील कार्यकर्ता हा नेहमीच पक्षाच्या केंद्रस्थानी असला पाहिजे. त्या कार्यकर्त्यांचा कल कमी झाल्याचा निष्कर्ष फारच धक्कादायक म्हटला पाहिजे. भाजपाचे राज्यातील सरकार सत्तेत आल्यावर पक्षाची लोकप्रियता घटणे ही सर्वात धोकादायक बाब म्हटली पाहिजे. तसेच सत्तेत आल्यावर पहिल्या वर्षात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात भाजपा व शिवसेनेचीही कामगिरी निराशाजनकच झाली आहे. आता पुढील वर्षात अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. मात्र कार्यकर्ता दुरावण्याचे प्रमाण जर ३० टक्के असेल तर पक्ष तळागाळातील निवडणूक म्हणून पाहिल्या जाणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणूक ही भाजपाला फारसे यश देणारी ठरणार नाही हे नक्कीच. त्याचबरोबर सत्तेतील वाटेकरी म्हणून शिवसेनाही याची फटका बसणार हे ओघाने आलेच. मोदींचे अच्छे दिन गेल्या दोन वर्षात काही आले नाहीत. त्यामुळे मध्यमवर्गीय जनता निराश आहे. त्यांनी मोठ्या अपेक्षा ठेवून भाजपाला मतदान केले होते. त्याचबरोबर वाढती महागाई, प्रत्येकाच्या खात्यात जमा होणारे १५ लाख रुपये, संघ परिवाराने गोमांस, मंदिर प्रवेश, भारतमाता की जय अशा बिनकामाच्या केलेल्या घोषणा आणि त्यातून दुखावलेली समाज मने याचा फटका भाजपाला बसणारच आहे.
------------------------------------------------------------

0 Response to "मोदींची घटती लोकप्रियता "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel