-->
शासकीय अनास्थेचा बळी

शासकीय अनास्थेचा बळी

संपादकीय पान शनिवार दि. ९ एप्रिल २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
शासकीय अनास्थेचा बळी
सुधागड तालुक्यातील शिळोशी आदिवासी पाड्यातील आठ वर्षाच्या मुलाला अपघात झाल्यावर त्याला रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका तब्बल अडीज तासाहून जास्तकाळ उशीरा आल्याने त्याचा उपचाराविना मृत्यू झाला. ही घटना म्हणजे आपल्या देशातील आरोग्य व्यवस्था तसेच शासकीय पातळीवरील अनास्था किती खालच्या पातळीवर गेली आहे त्याचे दर्शन घडविते. आरोग्यासारख्या क्षेत्रात किती संवेदनाक्षम अधिकारी काम करीत आहेत त्याची आपल्याला कल्पना येऊ शकते. देशातील दुर्गम भागात एखाद्यास अचानक काही त्रास झाल्यास अथवा अपघात झाल्यास त्याला उपचाराशिवाय मरणे हाच उपाय ठरता, असे म्हणावे लागेल. अर्थात ही बाब केवळ ग्रामीण भागातीलच आहे असे नव्हे तर मध्यंतरी शिर्डीसारख्या एका मोठ्या गजबजलेल्या शहरातही अशीच घटना घडली होती. एका वृध्दास अपघातानंतर शासकीय रुग्णवाहिका न मिळाल्याने त्याला कचर्‍याच्या गाडीतून रुग्णालयात आणण्यात आले होते. त्याला देखील वेळेत उपचार न मिळाल्याने प्राणास मुकावे लागले होते. सुधागड तालुक्यातील मुलाला प्राण गमवावे लागण्याची ही अलिकडच्या काळातील ही दुसरी घटना आहे. दोन वर्षापूर्वी याच भागातील दांडवाडी या आदिवासी वाडीवरील अक्षय पवार या शाळकरी मुलाचाही रुग्णवाहिका न मिळल्याने मृत्यू झाला होता. दोन वर्षापूर्वी घडलेल्या या दुर्घटनेनंतरही शासकीय यंत्रणा ठिम्म हलली नाही व त्यामुळे या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. अशा प्रकारच्या घटना घडतात आणि संवेदना हरवून गेलेल्या प्रशासनाला त्याचे काहीच वाटत नाही. आपल्याकडे राज्यात १०८ ही सेवा मुख्यमंत्रीपदी पृथ्वीराज चव्हाण असताना त्यांनी सुरु केली होती. अतिशय उत्कृष्ट सेवा म्हणून त्याकडे पाहिले जात होते. कारण रुग्णाला एखाद्या रुग्णालयात पोहोचविण्यापर्यंत त्याची पिळवणूक रुग्णवाहिका सेवा पुरविणार्‍या खासगी रुग्णवाहिका करीत होत्या. हे सर्व थांबावे व रुग्णाला कोणताही आर्थिक बोजा सहन न करता रुग्णालयात दाखल करता यावे यासाठी ही सेवा मोठा गाजावाजा करुन सुरु करण्यात आली. सुरुवातीला ही सेवा खरोखरीच चांगली होती. अर्थात या सेवेमुळे अनेक खासगी रुग्णवाहिकांना वाईट दिवस आले, तसेच त्यांनी जी रुग्णांची लूट चालविली होती ती थांबण्यास मदत झाली. परंतु १०८ सेवेत दाखल असलेल्या या गाड्या जशा जुन्या होऊ लागल्या तशा त्यांच्या तक्रारी वाढू लागल्या. यातून सरकारी लाल फितीच्या कारभारात या गाड्या अडकल्या. त्यामुळे एखाद्या चांगल्या सरकारी योजनेचे कसे दिवाळे वाजते हे १०८ सेवेवरुन आपल्याला दिसते. आता तर अनेकदा या गाड्या बंद तरी आहेत, पंक्चंर तरी आहेत, दुरुस्तीला गेल्या आहेत, अशीच कारणे देऊन या गाड्या उपलब्ध होत नाहीत. किंवा त्या एवढ्या उशीरा येतात की त्यात रुग्णाचा प्राण वाचविणे अशक्यच असते. आदिवसी पाड्यातील ही बातमी निदान उघडकीस तरी आली, परंतु अनेकदा अशा घडलेल्या घटना प्रकाशातही येत नाहीत. यातून शासकीय यंत्रणेची अनास्था वाढत जाते. हे सर्व दुष्टचक्र कुठे तरी थांबविण्याची गरज आहे.

0 Response to "शासकीय अनास्थेचा बळी"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel