-->
नवीन वर्षाचे स्वागत

नवीन वर्षाचे स्वागत

संपादकीय पान शुक्रवार दि. ८ एप्रिल २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
नवीन वर्षाचे स्वागत
हिंदू पंचागांनुसार गुढीपाडवा हा नववर्षाचा पहिला दिवस. नव्या वर्षाची नवी सुरूवात. चैत्र प्रतिप्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा... साडेतीन मुहूर्तातला मुहूर्त मानण्याइतकं महत्व या सणाला दिलेलं आहे. गुढीपाडवा या दिवसापासून शालिवाहन शकाची सुरुवात होते. सध्याच्या आधुनिक काळातही आपण हा उत्सव तितक्याच उत्साहात, आनंदात साजरा करतो. सध्याच्या काळात उष्णतेने जीवाची लाही झालेली असते व पावसाची वृष्टी कधी होणार याकडे शेतकरी राजा डोळे लावून बसलेला असतो. त्यातच बहावा वैभवशाली सौंदर्य दाखवत उभा असतो आणि पावसाच्या आगमनाची नांदी देत असतो. लालट-शेंदरी गुलमोहोराचे घोस सर्वांचें लक्ष वेधून घेत असतात. निसर्गाचं हे तोल राखण्याचं, त्याचं त्याला असलेलं भान आपल्यातही रोमारोमात भिनत असत. अशा प्रकारे आपला निसर्गाशी एक प्रकारे संवाद सुरू असतो. त्यातच आपणही चैत्र-प्रतिपदेच्या निमित्तानं नववर्षाच्या आगमनासाठी गुढ्या-तोरणं उभारत असतो. याबाबतची दंतकथा अशी सांगितली जाते की, शालिवाहन नावाचा कुंभाराचा मुलगा होता. त्याने मातीचे सैन्य तयार केले. त्यावर पाणी शिंपडले आणि त्या सैन्याला सजीव केलं. त्या सैन्याच्या मदतीनं शत्रुचा पराभव केला. दगड-मातीसारख्या चेतनाहीन, पौरुषहीन बनलेल्या त्या काळातील लोकांमध्ये शालिवाहनानं चैतन्याचा मंत्र भरला असा या कथेचा लाक्षणिक अर्थ घ्यायला हरकत नाही. उत्साहानं प्रेरित झालेल्या त्या लोकांनी मर्दुमकी गाजवली. शत्रुवर विजय मिळवला. वीरश्री, सद्विचार यासारखे गुण आपल्यातच असले तरी काही वेळा त्यांना प्रेरित करावं लागतं. हे काम शालिवाहनानं केलं. म्हणून त्या दिवसापासून शालिवाहन शक सुरु झालं. दुसरी कथा आहे ती म्हणजे श्रीरामचंद्रानं जनतेला त्रास देणार्‍या वालीचा पराभव करुन त्याच्या राज्यातील जनतेची सुटका केली ती याच दिवशी. या आनंदाप्रित्यर्थ लोकांनी अंगणात गुढ्या उभारल्या. या गुढ्या म्हणजे विजय पताका विजयाचे प्रतीक! अनेक ठिकाणी चैत्र प्रतिपदेच्या दिवशी घरातील सारी धनसंपत्ती देवघरात व्यवस्थित मांडून ठेवतात. पहाटेच्या शुभ वेळी घरातील आबाल-वृध्द डोळे बंद करुन देवघरात जातात आणि डोळे उघडून गृहलक्ष्मीसहित देवघरातील देवांचे दर्शन घेतात. आपल्याकडे चैत्र प्रतिपदेला सुप्रभाती कडुनिंबाच्या रसाचं सेवन करण्याची प्रथा आहे. कडुनिंबाचे औषधी गुणधर्म लक्षात घेऊन ठराविक दिवशी हा रस सेवन करावा, असा प्रघात पाडणार्‍या पूर्वजांची दूरदृष्टी याद्वारे दिसून येते. कडुनिंब रसाचं सेवन करणार्‍याला निरोगी शरीर लाभतं. आणखी एक विशिष्ट अर्थाची डूब या मागे असल्याचं लक्षात येते. प्रत्येक ठिकाणी गुढी उभारुन हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ही उभारली जाणारी गुढी म्हणजे विजयाचे प्रतिक. हा विजय म्हणजे उन्माद नव्हे तर विजयश्री खेचून आणल्याचे प्रतिक आहे. आज नवीन वर्षाचे स्वागत करताना आपण नवीन संकल्प करीत असताना त्याची कशा प्रकारे पूर्तता व्हावी यासाठी प्रमाणिकपणे प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.

0 Response to "नवीन वर्षाचे स्वागत"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel