-->
राहूल गांधींचा लाल सलाम

राहूल गांधींचा लाल सलाम

संपादकीय पान गुरुवार दि. ७ एप्रिल २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
राहूल गांधींचा लाल सलाम
कॉँग्रेसचे कार्याध्यक्ष राहूल गांधी यांनी पश्‍चिम बंगालमध्ये प्रचार सभा संपल्यावर कॉँग्रेस-माकप यांची संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि एका नव्या युगाची नांदी केली. पश्‍चिम बंगालमध्ये एकेकाळी कडवे विरोधक असलेले कॉँग्रेस व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवित आहेत. खरे तर त्यांना काळाने एकाच व्यासपीठावर आणले आहे. बिहारमध्ये नितीश-लालू-कॉँग्रेस हे समिकरण पक्के जुळून भाजपाला सत्तेपासून दूर ठेवल्यामुळे हा प्रयोग देशात करण्यासाठी प्रयत्न सुरु झाले त्याचाच हा भाग पश्‍चिम बंगालमध्ये होत आहे. देशातील जातियवादी पक्षांना दूर ठेवण्यासाटी सेक्युलर पक्षांनी एकत्र येण्याची गरज होती. परंतु सुरुवातीला कॉँग्रेसशी हात मिळवणी करायला माकप मनापासून तयार नव्हता. मात्र माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी या कामी पुढाकार घेतला. सुरुवातील माकपच्या पश्‍चिम बंगाल युनिटमध्ये यासंबंध स्पष्टपणे दोन तट पडले होते. मात्र नंतर यासंबंधी एकमत आणण्यात येचुरी यांना यश आले व उभय पक्षांनी एकत्रितपणे निवडणूक लढविण्याचे ठरविले. अखेर या दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन जीवाची बाजी लावून ही निवडणूक जिंकण्याची तयारी चालविली आहे. तिकडे ममता बॅनर्जी व भाजपा यांना सत्तेपासून दूर ठेवण्याचा त्यांचा निर्धार आहे. त्यात ते बहुदा यशस्वी होतील असेच दिसते. कॉँग्रेस-माकप हे दोन्ही पक्ष एकत्र येतील असे दिसत नव्हते. परंतु त्या दोघांनाही परस्परांची गरज आहे. अन्यथा ते सत्तेपासून अजून पाच वर्षे दूर राहातील असे वातावरण होते. यु.पी.ए. च्या पहिल्या सरकारला माकपसह सर्व डाव्या पक्षांनी पाठिंबा दिला होता. परंतु त्यांनी एकत्रित येऊन काही निवडणूक लढविली नव्हती. हे दोघे पश्‍चिम बंगालमध्ये एकत्र आलेले असले तरीही केरळात ते मात्र एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. राज्यातील गरजेनुसार युती करण्याचा त्यांनी केलेला हा संकल्प स्वागतार्ह ठरावा. गेल्या वर्षी माकपच्या विशाखापट्टणम येथे झालेल्या पक्षाच्या २१ व्या कॉँग्रेसमध्ये कॉँग्रेससोबत निवडणूक एकत्र लढविण्यास विरोध झाला होता. प्रामुख्याने माकपतील जुन्या फळीतीली नेते व्ही.एस. अच्युतानंद यांनी कडवा विरोध केला होता. परंतु राज्य निहाय पक्षाच्या गरजेनुसार धोरणात लवचिकता आणण्याचे ठरले आणि पश्‍चिम बंगालमध्ये ही आघाडी झाली. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉँग्रसेनेही देखील दिल्लीत कॉँग्रेसबरोबर सत्तेत असताना मेघालयात भाजपाबरोबर राज्यात सत्ता उपभोगली होती. याच धर्तीवर माकप कॉँग्रेससोबत पश्‍चिम बंगाल व केरळात आपली खेळी करीत आहे. त्यात काहीच चूक नाही. कारण सत्तेत राहणे आज माकपच्या दृष्टीने महत्वाचे आहे. कारण पश्‍चिम बंगालमध्ये गेल्या काही वर्षात माकपची मते सतत घटत आहेत. माकपसह डाव्या आघाडीची २००६ साली ४८.४ टक्के असलेली मते २०११ मध्ये ३९.१ टक्क्यावर आली व २०१४ साली सार्वत्रिक निवडणुकात ही मतांची टक्केवारी ३० टक्क्यांवर खाली आली. मात्र कॉँग्रसेची राज्यातील ९ टक्के मते गेली कित्येक वर्षे कायम आहेत. माकप व कॉंग्रेसची मते एकत्र केल्यास मात्र त्यांना सत्तेच्या दारात सहज पोहोचता येते. राहूल गांधींनी केलेला हा लाल सलाम फायदेशीर होतो का ते पहायचे.

0 Response to "राहूल गांधींचा लाल सलाम"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel