-->
जिल्ह्यातील वाढते गुन्हे

जिल्ह्यातील वाढते गुन्हे

संपादकीय पान सोमवार दि. ३१ ऑगस्ट २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
जिल्ह्यातील वाढते गुन्हे
रायगड जिल्हा या तुलनात्मकदृष्ट्या विचार करता तसा शांत आहे. गुन्हेगारीचा ग्राफ इकडे फारसा चढता राहात नाही. मात्र गेल्या काही महिन्यात हे सर्व आजवरचे अंदाज खोटे ठरुन रायगड जिल्ह्यातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर डोके वर काढीत आहे. चार दिवसांपूर्वी पोयनाडच्या गजबजलेल्या बाजारपेठेतील सोन्या-चांदीचे दुकान रात्री नऊच्या सुमारास लुटून १० लाख रुपयांची रोख व माल घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. यातील एका चोराला घटनास्थळीच पकडण्यात एका तरुणाला यश आले. तलवार, पिस्तुल दाखवित ही चोरी भर बाजारपेठेत झाल्याने पोयनाडवासियांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. भर बाजारपेठेतील दुकाने जर अशा प्रकारे लुटण्यास सुरुवात झाली तर अत्यंत सुरक्षित समजल्या जाणार्‍या या विभागात दहशतीच्या अशा प्रकारच्या घटना घडतात. यातील चोर हे परप्रांतातून आले आहेत व काही स्थानिक चोरांच्या मदतीने त्यांनी हे कारस्थान रचले. गेले चार दिवस ते या भागात रेकी करीत होते अशी माहिती आता उघड झाली आहे. हा सर्व प्रकार पाहता पोलिस खाते किती दुबळे झाले आहे याचे उत्तम उदाहरण ठरावे. केवळ हीच घटना याचे द्योतक आहे असे नव्हे तर गेल्या महिन्याभरात मुंबई गोवा महामार्गावर प्रवाशांना लुटण्याचे प्रकार घडले आहेत. माणगावपासून केवळ १८ कि.मी. अंतरावर मध्यरात्री कारमधून प्रवास करणार्‍या एका जोडप्यास बाहेर काढून त्यांच्याकडील पैसे लुटण्याचा प्रकार झाला. अशा प्रकारची जिल्ह्यातील ही दुसरी घटना होती. रायगड जिल्ह्यातून मुंबई-गोवा व मुंबई-पुणे हे दोन महामार्ग जातात. यातील एक रस्ता तर एक्स्पेस वे आहे. या रस्त्यांवर जी सुरक्षा व्यवस्था हवी ती कुठे दिसत नाही. तसेच गेल्या काही महिन्यात जिल्ह्यात मोटार सायकली जाळीताची प्रकरणे वाढली आहेत. याबाबत पोलीस फारसे लक्ष घालताना दिसत नाहीत. सध्या देशात गाजत असलेल्या शीना बोरा हत्या प्रकरणातील मृतदेह हा पेण जवळील एका जंगलात टाकण्यात आला होता. गेल्या दोन दिवसांपूर्वी संशीत असलेल्या इंद्राणीला पेण येथे आणून जिथे मृतदेह टाकण्यात आला होता ती जागा तपासण्यात आली होती. अद्याप हे प्रकरण पूर्णपणे उलगडले नसले तरीही पेणमध्ये संशयीतांनी जिकडे मृतदेह टाकला होता त्या जागी २०१२ साली एक मृतदेह सापडला होता. अशा प्रकारचा बेवारस मृतदेह सापडल्यावर त्याची रवानगी फॉरेन्सिक विभागाकडे करण्यात येते व पुढील काळात तपास करण्यास त्याची मदत होते. सापडलेले सांगाडे हे जे.जे. रुग्णालयाला पाठविण्यात आले होते. हे खरे मात्र त्याची डी.एन.ए. तपासणी करण्यास सांगण्यात आले नव्हते. त्यासंबंधीत पत्र नुकतेच देण्यात आले आहे. हे जर खरे असेल तर पोलीस तपासातील निष्काळजीपणा स्पष्टपणे दिसतो. किंवा पोलिसांना हाताशी घेऊन हे प्रकरण मिटविण्याचाही प्रयत्न केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थातच या जर तरच्या गप्पा झाल्या असल्या तरीही पोलिसांची गुन्हे तपासणीतील गंभीर्य कमी झाले आहे, असेच दिसते. शीना हत्या प्रकरणी पेण मधील पोलिसांना अंधारात ठेवून मुंबईतील गुन्हा अन्वेशष खात्यातील पोलिसांनी हा तपास केला यातच काही तरी पेण पोलिसांचे काळेबेरे दिसते. तसेच जिल्ह्याच्या पोलिस अधिक्षकांनी सध्या पत्रकारांना फिर्यादीची व आरोपींची नावे देण्यास नकार दिला जात आहे. कोणत्याही गुन्ह्याची अत्यंत त्रोटक माहिती दिली जाते. स्थानिक पोलिस ठाण्यातून तर पत्रकारांना सध्या माहिती मिळतच नाही. यासंबंधी विचारले असता न्यायालयाच्या एका निकालाचा दाखला सांगितला जातो. मात्र नेमका कोणत्या प्रकरणी हा निकाल न्यायलयाने दिला आहे व त्याची प्रत देण्यासही पोलीस टाळाटाळ करतात. अशा प्रकारे पत्रकारांना माहिती मिळविण्यापासून वंचित केले जाते. न्यायलयाच्या निकालाचा आधार देत जर माहीती दडविली जात असेल तर ते संपूर्ण राज्यात व देशात व्हायला पाहिजे. मात्र हा नियम फक्त रायगड जिल्ह्यातच का असाही प्रश्‍न उपस्थित होतो. पोलीस अधिक्षक सुवेझ हक हे नक्षली भागातून आलेले आहेत व एक कार्यक्षम पोलिस अधिकारी म्हणून ओळखले जातात. अशा प्रकारे पत्रकारांना माहितीपासून वंचित ठेवणे म्हणजे आपल्याकडे होत असलेल्या गुन्ह्यांवर पांघरुण घालता येईल अशी जर त्यांची समजूत असेल तर ते चुकीचे आहे. जिल्ह्यात झालेल्या प्रत्येक गुन्ह्याची माहिती पत्रकारांना मिळाली पाहिजे, खरे तर तो त्यांचा पत्रकार म्हणून माहिती मिळविण्याचा हक्क आहे. कारण ही माहिती जनतेपर्यंत पोहोचवून त्यातून लोकांना सावध करता येते. पोलिस अधिक्षक हक्कसाहेब स्वत: याबाबत लक्ष घालून पत्रकारांना त्यांचा माहिती मिळविण्याचा अधिकार प्रदान करतील असे वाटते.
---------------------------------------------------------------------  

0 Response to "जिल्ह्यातील वाढते गुन्हे"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel