-->
अखेरचा लाल सलाम

अखेरचा लाल सलाम

बुधवार दि. 14 नोव्हेंबर 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
अखेरचा लाल सलाम
विधानसभेतील बुलंद आवाज, खंडकरी शेतकर्‍यांचा आवाज, डाव्या चळवळीचे आधारस्तंभ, विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते, झुंजार आणि लढवय्ये कॉम्रेड माधवराव गायकवाड यांच्या निधनाने एक लढवय्या नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या निधनामुळे डाव्या चळवळीची कधीही भरुन न येणारी हानी झाली आहे. माधवराव हे मूळचे फलटणचे. अतिशय गरीब घरातून ते आले होते. लहानपणीच माधवराव राष्ट्र सेवा दलात सामील झाले, तेव्हा ते बापूसाहेब काळदाते यांच्या संपर्कात होते. मात्र, पुढे समाजवादी चळवळीशी झालेल्या वैचारिक मतभेदांनंतर ते कॉ. डांगे यांचे विचार आणि आंदोलने याकडे आकर्षित झाले आणि पुढे अखेरपर्यंत कम्युनिस्ट चळवळीशी जुळलेली नाळ त्यांनी कधीच तुटू दिली नाही. त्यांच्या 95 वर्षाच्या आयुष्यात त्यांनी स्वातंत्र्यलढ्यापासून ते सध्याची भाजपाची राजवट अशी विविध राजकीय उलथापालथी त्यांनी जवळून पाहिल्या. अनेक ऐतिहासिक घटनांचे ते साक्षीदार होते. 1985 मध्ये ते नांदगाव मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले. आपल्या बुलंद आवाजात, शेतकर्‍यांचे प्रश्‍न धसाला लावत त्यांनी विधानसभा दणाणून सोडली. ते कम्युनिस्ट चळवळीचे राज्य पातळीवरील नेते आणि महाराष्ट्र कम्युनिस्ट पार्टीच्या पॉलिट ब्युरोचेही प्रदीर्घ काळ सदस्य होते. मात्र, त्यांची शेवटची 10-12 वर्षे प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना चळवळीपासून दूर घेऊन गेली. बंडखोरी व चळवळी वृत्ती असलेले माधवराव स्वातंत्र्यचळवळ, संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन, तसेच गोवा मुक्तिसंग्रामातही आघाडीवर होते. माधवराव गायकवाड यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील साखरवाडी. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रेरणेने ते डाव्या पक्षात आले आणि पक्षाच्या कामासाठी ते मनमाडला स्थायिक झाले. त्यांची राजकीय कारकिर्द तेथेच घडली. खंडकरी शेतकर्‍यांच्या ब्रिटिशांनी ताब्यात घेतलेल्या जमिनी परत मिळाव्यात म्हणून राज्यभर जो लढा उभा राहिला त्या लढ्याचे, सामान्य कष्टकरी शेतकर्‍यांचे नेते म्हणून बाबूजीं ओळखले जात. खासदार बाळासाहेब विखे पाटील आणि कॉम्रेड माधवराव गायकवाड यांच्या राजकीय विचारधारा वेगवेगळ्या होत्या. मात्र खंडकरी शेतकर्‍यांसाठी त्यांनी एकत्रितपणे सुरू केलेली चळवळ ऐतिहासिक ठरली. राज्याच्या विधानसभेत 2001 मध्ये याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय झाला. त्यानंतर 2002 साली तत्कालीन राष्ट्रपती के.आर. नारायणन् यांनी त्यावर स्वाक्षरी केली. खंडकरी शेतकर्‍यांची चळवळ केवळ राज्यालाच नव्हे तर संपूर्ण देशालाही मार्गदर्शक ठरली. या लढ्यातील नेत्यांनी राज्य आणि केंद्र सरकारकडे सातत्याने केलेला पाठपुरावा खंडकरी शेतकर्‍यांना न्याय मिळवून देणारा ठरला. या संपूर्ण लढाईत माधवराव गायकवाड यांनी दिलेले योगदान अतिशय मोलाचे आणि अविस्मरणीय असेच होते. 1962च्या कालावधीत विधान परिषदेची निवडणूक संयुक्त महाराष्ट्राच्या झेंड्यासाठी त्यांनी लढवली होती. त्या वेळेस दादासाहेब गायकवाड, आचार्य अत्रे, एस. एम. जोशी, साने गुरुजी, ना. ग. गोरे असे अनेक दिग्गज त्यांच्या बरोबर होते. त्याच बरोबर डॉ. ए.बी. वर्धन, सुधाकर रेड्डी, डी.राजा यांच्या सारखे अनेक कम्युनिष्ट नेते त्यांना सहकारी म्हणून लाभले. नांदगाव तालुक्यातून अनेक निवडणुका लढविल्या; परंतु प्रवाहाच्या विरुद्ध राजकारणात असल्याने त्यांना अनेक निवडणुकीत निसटता पराभव स्वीकारावा लागला. 1974 ते 1981 पर्यंत मनमाड शहराचे थेट नगराध्यक्ष होण्याचा मान त्यांना मिळाला होता. 1984 मध्ये गायकवाड यांनी कोपरगाव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली. प्रतिस्पर्धी उमेदवार बाळासाहेब विखे पाटील असल्याने ती निवडणूक राज्यात प्रतिष्ठेची ठरली होती. त्याकाळी बीबीसी रेडीओने त्यांच्या उमेदवारीची दखल घेऊन वृत्त प्रसिध्द केले होेते. या वृत्तामुळे कॉँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी शेवटच्या दोन दिवसात प्रतिष्ठा पणाला लावली होती. या निवडणुकीत माधवराव गायकवाड यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर काही महिन्यातच विधानसभेची निवडणूक जाहीर झाली. 1985 चा तो काळ होता. लोकसभेच्या निवडणुकीतील पराभव मनमाडसह परिसरातील ग्रामीण भागातील जनतेच्या जिव्हारी लागला होता. सर्व कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करून विजयाची माळ गायकवाड यांच्या गळ्यात घातली होती. आपल्या आक्रमक शैलीने त्यांनी विधानसभेत आवाज उठवून तालुक्यासाठी अनेक योजना मंजूर करून आणल्या होत्या. 1974 ते 1981 पर्यंत ते नगराध्यक्ष होते.1 सप्टेंबर 1978 रोजी त्यांची भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव म्हणून निवड झाली. 1985 साली नांदगाव-मनमाड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकून ते आमदार झाले. त्यांच्या कार्यकाळात नांदगाव तालुका हा भारतीय कम्युनिस्ट पार्टीचा बालेकिल्ला मानला जात होता. जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली होती. कॉम्रेड गायकवाड यांनी आयुष्यभर डाव्या विचारधारेशी एकरूप राहून राजकीय व सामाजिक वाटचाल केली. शेती, शेतकरी आणि पाणी प्रश्‍नावर नेहमी ठाम भूमिका मांडली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी तेव्हाच्या नवनिर्मित महाराष्ट्र राज्याचे प्रश्‍न हिरीरीने मांडले. कष्टकर्‍यांचे हक्काचे लढे दिली. शेतकरी व शेतमजुरांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आयुष्यभर झटले. कॉ. डांगें व कॉ. दत्ता देशमुख यांच्यासारख्या अभ्यासू व विचारवंत तसेच महाराष्ट्राच्या प्रश्‍नांची जाण असलेल्या मोठ्या नेत्यांसोबत त्यांनी काम केले. त्यांच्या डाव्या विचाराची पालखी आयुष्यभर वाहिली. कष्टकरी, शेतकरी, कामगार, वंचितांच्या प्रश्‍नांचा त्यांनी नेहमीच ध्यास घेतला होता. असा हा लढवय्या नेता आता काळाच्या पडद्याआड गेला आहे. कॉ. माधवराव गायकवाड यांना अखेरचा लाल सलाम.
------------------------------------------------------

0 Response to "अखेरचा लाल सलाम"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel