-->
पुन्हा घोषणाचा पूर

पुन्हा घोषणाचा पूर

गुरुवार दि. 20 डिसेंबर 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
पुन्हा घोषणाचा पूर
लोकसभेच्या निवडणुका आता जेमतेम चार महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना सत्ताधारी भाजपाने मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी पुन्हा एकदा घोषणांचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झालेल्या मुंबई-पुण्यातील दौर्‍यात याची प्रचिती आली. परंतु यावेळी मोदींनी कितीही जोश आणून घोषणा केल्या असल्या तरी त्यांच्या भाषणात जान नव्हती. पाचपैकी एकही राज्य ताब्यात न आल्याने व विरोधक दिवसेंदिवस मजबूत होत असल्याचे चिन्ह दिसू लागल्याने मोदींचा यावेळी चेहरा पूर्णपणे निराशेच्या गर्तेत अडकलेला दिसला. त्यांची बॉडी लँग्वेज यावेळी ते नैराश्येच्या गर्तेत साडल्याचे सांंगत होती. पराभव कुणाचा होत नाही? सर्वांचाच होतो. खरेतर पराभव पचविल्याशिवाय तो राजकारणी चांगला घडत नाीह असे म्हणतात. परंतु मोदी व शहा यांनी आपल्याभोवती असे काही एक खोटे वलय निर्माण केले की, आता आपल्याशिवाय देशाला पर्यायच नाही. आपण जी ठरवू तीच पूर्व दिशा. विरोधकांचा दारुण पराभव झालेलाच आहे, त्यामुळे त्यांना विचारात घ्यायची आवश्यकताच नाही. आपल्याला जनतेने पाच वर्षासाठी निवडून दिलेले आहे, त्यामुळे आपणच निर्णय घ्यायचे, विरोधकांना विचारात घ्यायची गरज नाही, अशी एक गुर्मी त्यांना झाली होती. आपण आता पुढील 50 वर्षे सत्ताधीश राहाणार अशी त्यांची ठाम समजूत होती. जे हुकूमशहा असतात त्यांची अशीच मनोवृत्ती असते. परंतु नुकत्याच झालेल्या निवडणुकीत तीन राज्ये कॉँग्रेसकडे गेल्यावर त्यांच्या या गर्वाच्या फुग्याला एकदम टाचणी लागली. आपला पराभव ही जनता करु शकते याचा साक्षात्कार त्यांना झाला. आपल्याला आगामी लोकसभा निवडणुक सोपी नाही हे त्यांना जाणवू लागले. यातून त्यांच्या चेहर्‍यावरील आत्मविश्‍वास संपल्याचे मुंबई-पुण्याच्या दौर्‍यात स्पष्टपमे जाणवले. त्यातच आगामी निवडणुका आल्यामुळे त्यांनी गेल्या वेळ प्रमाणे यावेळी देखील जनतेला आश्‍वासने देण्यासाठी नारळ मुंबापुरीत फोडला. खरे तर हा त्यांचा निवडणुक प्रचार दौराच ठरावा. मुंबई-पुण्यात मराठीत भाषणाने सुरुवात केली, परंतु ही दोन शहरे आता केवळ मराठी राहिलेली नाही. ही महानगरे झाल्याने येथे बहुभाषिक रहातात हे मोदींनी लक्षात घेतले पाहिजे होते. असो. त्याचबरोबर पुण्यातील बाषणात लोकमान्य टिळक व आगरकर यांचा जन्म पुण्यात झाल्याचे चुकीचे पण बेमालूनपणे सांगितले. निदान राज्यातील भाजपावाल्यांनी तरी त्यांना लोकमान्य व आगरकरांच्या जन्मासंबंधी योग्य ठिकाण सांगावयास हवे होते. आजपासून पाच वर्षापूर्वी मोदींचे स्वागत हे ठिकठिकाणी जंगी होत असे. लोकांना आपल्या प्रश्‍नांची सोडवणूक करणारा मसिहा जन्माला आल्याचे वाटत होते. त्यामुळे लोक मोदींचे भाषण एैकायला आवर्जुन जात असत. आता केवळ साडे चार वर्षातच चित्र पालटल्याचे दिसले. कालच्यासभेला अनेक खुर्च्या रिकाम्याच होत्या. अनेक ठिकाणी लोकांनी गाजरांची तोरणे लावली होती. अशा प्रकारे मोदींचे स्वागत व्हावे हे काहीसे आश्‍चर्य वाटणारे होते. पाच वर्षात त्यांची एकेकाळची लोकप्रियता किती घटली हे समजते. लोकांना त्यांच्या थापा होत्या हे पटल्यानेच त्यांच्या सभेला गर्दी नव्हती, गाजरांच्या माळा लावण्यात आल्या होत्या. मोदी आपल्याला प्रधानसेवक किंवा जनतेचा सेवक म्हणतात. अशा प्रकारचा सेवक हा जनतेत मिसळणारा हवा. मग मोदींच्या सुरक्षेसाठी स्मशानभूमीला टाळे का लावावे लागते? त्यामुळे मोदींनी पाच वर्षापूर्वी केलेली भाषणे, दिलेली आश्‍वासने झूठ होती, हे आता लोकांना मनोमनी पटले आहे. त्यातच मोदींच्या सभेला पुण्याचे खासदार संजय काकडे यांनी मारलेली दांडी, शिवसेना नेत्यांची अनुपस्थिती यामुळे अडचणी वाढत जामार आहेत. अनेक खासदार, आमदार जे कुंपणावर आहेत ते आता कधीही आपला पक्ष बदलू शकतात हे काकडेंची अनुपस्थिती सांगते. शिवसेना मात्र आपला भाव वाढवून घेण्यासाठी राजकाकरण करीत आहे. सध्या आपली कमळाबाई संकटात आहे, त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न शिवसेना करणे हे काही नवीन नाही. हीच वेळ आहे, शिवसेना सुरुवातीला नखरे करणार यातून आपली किंमत वाढवून घेणार व सौदा करणार हे नक्की. मोदींनी ज्या मेट्रो मार्गाचे भूमिपूजन केले त्याची आखणी झालेली नाही, टेंडर काढण्यात आलेली नाहीत. मग हे भूमिपूजन करण्याची घाई कशाला? असा प्रश्‍न उपस्थित होतो. याचा अर्थ सरकारला घोषणा करण्याची घाई झालेली आहे. त्याचबरोबर पंतप्रधांनी काल जी.एस.टी. कमी करण्याची घोषणा केली. खरे तर लोकसभेचे अधिवेशन सुरु असताना कोणत्याही महत्वाच्या घोषणा करु नयेत, असा प्रघात आहे. परंतु पंतप्रधानांना याचेही भान राहिले नाही व जी.एस.टी. कमी करण्याची घोषणा केलीच. त्यापाठोपाठ आता पेट्रोल-डिझेलच्या किंमतीही कमी करण्यात येणार असल्याचे जाहीर झाले आहे. थोडक्यात पराभवानंतर आता डॅमेज कंट्रोल भाजपाने सुरु केल असून आगामी निवडणुका जिंकण्यासाठी फिल्डींग लावण्यास सुरुवात केली आहे. आता जनता यावेळी त्यांच्या भूलथापांना फसणार नाही हे नक्की आहे. महत्वाचे म्हमजे, पुण्याच एका कार्यक्रमात बोलताना सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणाले की, संघात आम्ही सांगतो की दिलेले काम समरसून, उत्कटतेने करायचे. आपण करतो म्हणून एखादे काम होते असा अहंकार करायचा नाही. मीच केले असे कोणी म्हणत असेल तर त्याला अर्थ नसतो. त्यामुळे निर्विकार राहून काम करत राहिले पाहिजे. कार्यकर्ता म्हणून हे गुण अंगी असले पाहिजेत. सरसंघचालकांचे हे फटकारे मोदींनाच आहेत, हे त्यांनी लक्षात घ्यावे.
------------------------------------------------------------------

0 Response to "पुन्हा घोषणाचा पूर"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel