-->
राज्य गारठले!

राज्य गारठले!

शुक्रवार दि. 21 डिसेंबर 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
राज्य गारठले!
गेले काही दिवस राज्यातील बहुतांशी भागात थंडीने आपले अस्तित्व दाखविण्यास सुरुवात केली असल्यामुळे सर्व जनता गारठल्यासारखी झाली आहे. गुलाबी थंडीच्या पलिकडे थंडी गेली असून आता बोचरी थंडी सुरु झाली आहे. दरवर्षी डिसेंबरमध्ये थंडीचा कडाका सुरु होतोच. यंदा थोडी अपेक्षेपेक्षा लवकरच थंडीने उच्चांक गाठला. गेल्या वर्षीचे थंडीचे सर्व रेकॉर्ड यंदा मोडले जातील अशी चिन्हे दिसत आहेत. काश्मीरमधील जोरदार सुरु झालेला हिमवर्षाव, दक्षिणेत आलेले चक्रीवादळ व उत्तरेकडून जोरदार वाढलेला वार्‍याचा वेग यामुळे महाराष्ट्रात दोन-तीन दिवसांपासून पारा घसरत चालला असल्याचे हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले. उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट अधिकच तीव्र झालेली आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर व धुळे येथे 6.0 अंश सेल्सियस असे नीचांकी तापमान नोंदले गेले. निफाड येथे 6.6, तर नाशकात 7.9 सेल्सियसची नोंद झाली. मराठवाडा, प. महाराष्ट्र, विदर्भातही पारा 8 अंशांवर घसरला होता. उत्तर महाराष्ट्रात बुधवारी किमान व कमाल तापमानात कमालीची घट झाल्याने थंडीचा कडाका वाढला होता. संपूर्ण नाशिक जिल्हा थंडीने गारठला आहे. या वाढलेल्या थंडीमुळे नगदी पीक असलेल्या द्राक्ष उत्पादकांची चिंता वाढली आहे, तर दुसरीकडे गहू आणि हरभर्‍याला पोषक वातावरण असल्याने या उत्पादक शेतकरी खूष आहेत. तसेच थंडीचा कडाका हा केवळ नाशिक जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये आहे. बुधवारी धुळे जिल्ह्यात नीचांकी 6.0 अंश सेल्सियसची नोंद करण्यात आली तसेच जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नगरच्या तापमानात झपाट्याने घट झाली होती. सध्या उत्तर भारतात तुफान थंडी आहे. सध्या पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि मध्य प्रदेशात थंडीची लाट आलेली आहे. तेथून वाहणार्‍या थंड वार्‍यांमुळेच उत्तर महाराष्ट्रात आल्याने धुळे, नाशिक जिल्ह्यातील थंडी वाढली. पूर्व राजस्थानातील सीकर येथे देशातील सर्वात नीचांकी 0.5 अंश सेल्सि. तापमान नोंदले गेले. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात विशेषत: उत्तर महाराष्ट्रात येते दोन दिवस म्हणजे 22 डिसेंबरपर्यंत थंडीची लाट राहील. उत्तर भारतात याणार्‍या व येणार्‍या गाड्या विलंबाने धावत आहेत. कारण संपूर्ण उत्तर भारतात धुक्याची चादर पसरल्यामुळे गाड्यांना विलंब होत आहे. येते काही दिवस पठारी भागातील एखाद्या ठिकाणचे किमान तापमान 10 अंश सेल्सियसपेक्षा कमी असेल तसेच पर्वतीय भागातील ठिकाणचे तापमान शून्य अंशांच्या खाली असेल आणि त्या ठिकाणचे किमान तापमान सरासरीपेक्षा 4.5 ते 6.5 अंशांनी घसरले असेल तर तेथे थंडीची लाट आली, असे मानले जाते. एखाद्या ठिकाणचे प्रत्यक्ष किमान तापमान 4 अंश सेल्सियसपेक्षा कमी असेल तर थंडीची लाट मानली जाते.थंडीचा पिकांसाठी फायदा जसा आहे तसा तोटा देखील आहे. नाशिक जिल्ह्यात दिंडोरी, निफाड, नाशिक, चांदवड आणि सिन्नर तालुक्यात द्राक्षांचा हंगाम जोरात आहे. काही ठिकाणी द्राक्ष काढणीला आले आहेत. थंडीच्या कडाक्यामुळे जमिनीवर ऊब कमी होत असल्याने झाडांची मुळे अन्नघटक शोषण करण्यासाठी कमकुवत ठरतात. किमान तापमान हे 8 अंशच्या आत असल्यास झाडाच्या मुळांद्वारे द्राक्षाला अन्नपुरवठा खंडित होतो. परिणामी फुगवण कमी होणे, भुरीचा प्रादुर्भाव, द्राक्षांच्या देठाजवळ तडे जाण्याची शक्यता असते. 10 अंश सेल्सियसपर्यंत तापमान सलग 30 दिवस राहिल्यास त्याचा गहू आणि हरभरा पिकाला लाभ होतो. थंडीमुळे पडणार्‍या दवाचा या दोन्ही पिकांना लाभ होत असतो, याचा परिणाम म्हणून 10 ते 15 टक्के अधिक उत्पादन मिळते. बंगालच्या उपसागरात आलेल्या वादळामुळे नागपूरसह विदर्भात थंडी कमी झाली होती. बुधवारी नगापुरचे तापमान 9.6 अंशांवर खाली आले होते. गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणाने हुडहुडी वाढल्याने विदर्भ गारठला आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली, तर विदर्भातील गोंदिया, गडचिरोली, भंडारा तसेच चंद्रपूर येथे वादळी पाऊस झाला.
हिमालयात हिमवृष्टी झाल्यानंतर मैदानी प्रदेशातील पार्‍यात झपाट्याने घसरण होते. विदर्भात डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून थंडी वाढली होती. मात्र, बंगालच्या उपसागरात आलेल्या वादळानंतर तापमानात बदल झाले. त्यामुळे वाढलेल्या थंडीचा जोर कमी झाला होता. गेल्या दोन दिवसांत ढगाळ वातावरण असले तरीही गारठा कमी झाला नाही. दुष्काळाने ग्रासलेल्या मराठवाड्यातही गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. परभणीचे किमान तापमान 9.6 अंश सेल्सियसपर्यंत खाली घसरले. परभणी शहरावर सकाळी 9 वाजेपर्यंत धुक्याची चादर पसरली होती. उत्तर भारतातील हिमवृष्टीमुळे महाराष्ट्रात थंड वारे वाहत आहेत. डिसेंबरअखेरीस व 15 जानेवारीपर्यंत थंडीचीही लाट कायम राहण्याची शक्यता आहे. मध्यंतरी थोड्याफार प्रमाणात तापमान स्थिर राहील. मात्र, थंडीची तीव्रता कायम राहील, असा अंदाज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. नांदेड जिल्ह्यात बुधवारी सकाळी या मोसमातील सर्वात नीचांकी 8.5 से. तापमानाची नोंद करण्यात आली. मंगळवारी रात्री तर जिल्ह्यावर सायंकाळपासूनच धुके दाटले होते. दहा वर्षांपूर्वीच्या हिवाळ्यात जिल्ह्यात सर्वात नीचांकी तापमानाची नोंद झाली होती. तेव्हा तापमानाचा पारा 5.5 से. पर्यंत खाली घसरला होता. यावर्षी आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी तापमानाची नोंद बुधवारी करण्यात आली आहे. थंडीचा हा मोसम चांगला वाटत असला तरीही यात रोगराई देखील वाढणार आहे. अनेक भागात तापाच्या साथी आल्या आहेत. एकूण पाहता संपूर्ण राज्य गारठले आहे.
-------------------------------------------------------------

0 Response to "राज्य गारठले!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel