-->
लाक्षणिक संप यशस्वी करा

लाक्षणिक संप यशस्वी करा

संपादकीय पान बुधवार दि. २ सप्टेंबर २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
लाक्षणिक संप यशस्वी करा
केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार तसेच राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार शेतकरी आणि कामगारविरोधी धोरणे राबवून कष्टकरी, शेतकरी, कामगारांच्या हक्कांवर गदा आणत आहे. त्यांच्या या धोरणांच्या निषेधार्थ देशातील सर्व डावे पक्ष व कामगार संघटनांनी बुधवार, दि. २ सप्टेंबरला पुकारलेला लाक्षणिक संप यशस्वी करुन कष्कर्‍यांनी आपली ताकद या सरकारला दाखवून द्यावी. तसेच सरकार कोणतेही कष्कर्‍यांच्या विरोधात पाऊल टाकेल तर ते खपवून घेतले जाणार नाही असा इशारा या संपाच्या निमित्ताने सरकारला देण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने कामगार कायद्यात सुचविलेले बदल प्रत्यक्षात अंमलात आले तर कामगारांनी लढून मिळविलेले आजवरचे लोकशाहीचे सर्व अधिकार नष्ट होऊन कामगार मालकांच्या दावणीला बांधला जाणार आहे. कामगाराची अवस्था गुलामासारखी होणार आहे. या कामगारांना कायद्यापासून वंचित राहावे लागणार असून, एखादा उद्योग बंद करावयाचा असेल, तर मालकांच्या हिताचे बदल कायद्यात करण्यात येणार आहेत. कंत्राटी पद्धतीमुळे कामगारांना वापरा आणि फेकून द्या, अशी अवस्था झाली आहे. कामगाराला कोणतेही भविष्य राहिलेले नाही. कामगारांना न्याय्य हक्कासाठी न्यायालयात जाण्याचा अधिकार काढून घेण्यात येणार आहे. ही सर्व धोरणे कामगारांच्या विरोधात असून, कामगाराला गुलामगिरीत ढकलणारी आहेत. भूसंपादन कायद्यात होऊ घातलेले बदल शेतकर्‍याला देशोधडीला लावणारे होते. याला सर्व पक्षांनी एकत्र येऊन जोरदार विरोध केला व कॉँग्रेसनेही राज्यसभेत हे विधेयक संमंत करणार नाही अशी भूमिका घेतल्याने सरकारला अखेर हे विधेयक मागे घ्यावे लागले आहे. सरकारची याबाबत नाष्मुष्की झाली खरी, परंतु ती त्यांनी ओढावून घेतली आहे. कारण मोदींचे सरकार पहिल्यापासूनच भांडवलदारांच्या समर्थनार्थ भूमिका घेतली होती. अर्थातच निवडणुकांमध्ये मोदींसाठी ज्या भांडवलदारांनी करोडो रुपये खर्च केले आहेत त्यांच्या भल्यासाठी त्यांना काम करणे भाग आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी हे अडानी-अंबांनी यांच्या भल्याचा विचार करीत आहेत. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे आघाडीचे पाच-दहा उद्योगपतींचाच विचार सध्या मोदी करतात. त्यांना उद्योग क्षेत्राचे भले व्हावे व त्यातून देशात रोजगार निर्माण व्हावेत असे वाटत नाही. सरकार एवढ्या उघडपणे बांडवलदारांची बाजू घेऊन सत्तेत काम करु लागले की त्यांचा हा चेहरा एका वर्षातच सर्वांना स्पष्टपणे दिसला. त्यामुळे याचा आपल्याला बिहार निवडणुकीत बसणार असे दिसू लागल्यावर मोदींना शहाणपण सुचले व त्यांनी भूमीअधिग्रहण विधेयक मागे घेतले. अर्थात हा सर्व विरोधकांचा विजय आहे. आपल्याकडे स्पष्ट बहुमत गेल्या तीन दशकात आले आहे म्हणजे आपण मनमानी पध्दतीने कारभार करु शकतो ही मोदींची समजूत होती. मात्र त्याला सुरुंग लावला आहे. आता देखील आजच्या संपाच्या निमित्ताने सरकारला कामगार व कष्टकर्‍यांच्या विरोधातील धोरण थांबविण्याचा इशारा देण्यात येत आहे. मोदी सरकारने सत्तेवर येताच अच्छे दिन दाखविण्याची घोषणा केली होती. आता तर आम्ही असे बोललोच नव्हतो असे म्हणून सरकार आपली जबाबदारी झटकून टाकीत आहे. भाजपाच्या जाहीरातींमध्ये व प्रचार सभेतील भाषणांमध्ये अच्छे दिनचे आश्‍वासन देणारे हे सरकार आता त्यांच्या आश्‍वासनांपासून दूर जात आहे यावरुन पंतप्रदान मोदी हे किती थापाडे आहेत हे दिसते. शेतकर्‍यांसाठी हे सरकार काही करेल व त्यांच्या आत्महत्या थांबतील असे वाटले होते. मात्र तसे झालेले नाही. सरकारकडून कोणताही दिलासा न मिळाल्याने उलट शेतकरी आता नैराश्येपोटी आत्महत्या करीत आहेत. त्यामुळे मोदींचे सरकार आल्यापासून आत्महत्या झपाट्याने वाढल्या आहेत. हे सरकार आपल्यासाठी काही तरी करणार या त्यांचा अपेक्षांना सुरुंग लागाला आहे. अशा प्रकारे प्रत्येक क्षेत्रात नाराजी आहे. फक्त अडानी व अंबांनी खुषीत आहेत. त्यांना मात्र अच्छे दिन जरुर आले आहेत. समाजातील प्रत्येक घटक मग तो कामगार, शेतकरी या कष्टकरी वर्गातील असो तसेत मध्यमवर्गीय नोकरदार, शिक्षक, प्राध्यापक, बँकेतील कर्मचारी अशा प्रत्येक घटकांना मोदी सरकार आपल्यासाठी काही तरी करेल असे वाटले होते. मात्र या सर्वांचाच अपेक्षाभंग झाला आहे. दुसरीकडे सरकार मात्र कामगार, कष्टकरी विरोधी धोरण अधिकच आक्रमकरित्या राबविण्याचा विचार करीत आहे. आर्थिक सुधारणांना मानवी चेहरा नाही, उलट प्रत्येकाला असेथिर करणारे हे धोरण आहे, हे जनतेला पटू लागले आहे. या सरकारला हे धोरण पुढे राबविण्यासाठी आत्ताच रोखण्याची गरज आहे. म्हणूनच आजचा देशव्यापी संप यशस्वी करण्याची गरज आहे, याची कामगार, कष्टकर्‍यांनी नोंद घ्यावी.
---------------------------------------------------------------------------------

0 Response to "लाक्षणिक संप यशस्वी करा"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel