-->
संपादकीय पान शनिवार दि. १८ एप्रिल २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
जनता परिवाराचे मनोमिलन
जनता परिवारातील जे पक्ष फुटून त्यांचे विभाजन झाले होते त्यातील सहा पक्ष पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. निदान ते एकत्र येण्याची प्रक्रिया तरी सुरु झाली आहे. नुकतेच दिल्लीमध्ये मुलायमसिंग यांच्या नेतृत्वाखाली सहा पक्षांनी आपले मनोमिलन करुन एक झेंड्याखाली येण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. सध्याच्या स्थितीत ही राजकारणातील एक महत्वाची घटना म्हटली पाहिजे. भाजपाच्या नेतृत्वाखालील नरेंद्र मोदी यांच्या सरकारने हा देश फक्त हिंदुंचाच असल्याचे जाहीर करुन त्यादृष्टीने पावले टाकण्यास सुरुवात केली. घरवापसी, मुस्लिमांचा मताधिकार काढून घ्यावा, हिंदुंनी लोकसंख्या वाढविण्यासाठी चार-पाच मुलांना जन्म द्यावा अशा केलेल्या काही अतिरेकी घोषणा. खरे तर मोदी सरकारने या अतिरेकी हिंदुत्ववादी संघटनांना आळा घातला पाहिजे किंवा त्यांना प्रोत्साहन मिळेल यापासून परावृत्त राहिले पाहिजे. मात्र तसे सरकार करीत नसल्याने भाजपाचा खरा चेहरा उघड झाला आहे. अशा स्थितीत पुरोगामी, सर्वधर्मसमभाव मानणार्‍या शक्तींनी एकत्र येण्याची आवश्यकता होती. जनता परिवाराच्या एकत्रिकरणामुळे निधर्मी शक्ती येण्याचे एक मोठे पाऊल पडले आहे. भाजपाचे सध्याचे रुप व हिंदुत्ववादी संघटनांचा आक्रमकपणा यामुळे हे निमित्त झाले आहे. १९७७ सालची या निमित्ताने आठवण होते. इंदिरा गांधींनी १९७५ साली देशावर आणीबाणी लादली व त्याविरोधात जनतेने दंड थोपटले. इंदिरा गांधींनी देशातील विरोधकांना गजाआड केले होते. अर्थातच अशी मुस्कटदाबी आपल्यासारख्या लोकशाही देशाला सहन होणारी नव्हती. यातून अखेरीस आणीबाणी उठल्यावर सर्व विरोधी पक्ष एकत्र आले व यातूनच जनता पार्टीचा जन्म झाला. जनता पार्टीचा केवळ जन्म झाला नाही तर सत्तेवर देखील हा पक्ष आला. अशा प्रकारे देशातील केंद्रात स्थापन झालेले हे बिगर कॉँग्रेसचे पहिले सरकार ठरले. परंतु जनता पार्टीचा हा प्रयोग केवळ १७ महिनेच टिकला आणि पुन्हा १९८० साली इंदिरा गांधी सत्तेत आल्या. त्यानंतर १० वर्षे जनता पार्टी राष्ट्रीय राजकारणात केवळ अस्तित्वापुरती होती. पण राष्ट्रीय राजकारणात कॉंग्रेस व भाजप हे दोन पक्ष कमकुवत होताच निर्माण झालेल्या राजकीय पोकळीत स्वत:च विस्कळीत असलेल्या जनता पार्टीने १९९६ व १९९८मध्ये तिसर्‍या आघाडीच्या माध्यमातून केंद्रात आपले सरकार आणण्याची किमया केली. पण हाही प्रयोग दोन वर्षांपेक्षा अधिक चालला नाही. जनतेने या पक्षाला केंद्रीय राजकारणातून झिडकारले व त्यांचे उरलेसुरले अवशेष दोनचार राज्यांत शिल्लक राहिले. २०१४ लोकसभा निवडणुकीच्या अगोदर एक वर्ष कॉंग्रेस जशी अशक्त होत गेली व भाजपला बहुमत मिळणार नसल्याची शक्यता पाहता पुन्हा जनता पार्टीचा म्हणजे तिसर्‍या आघाडीचा प्रयोग उभा करण्याचा प्रयत्न झाला. पण तो कागदावरच राहिला. त्यानंतर केंद्रात भाजपला एकट्याला बहुमत मिळाल्याने राजकारणाचा पोतच बदलून गेला आणि ज्या कॉंग्रेसविरोधी राजकारणातून जनता पार्टीचा जन्म झाला, त्याच्यापुढे आता कॉंग्रेस नव्हे, तर हिंदुत्ववादाचा पुरस्कार करणार्‍या व मुक्त भांडवलशाहीला प्रोत्साहन देणार्‍या भाजपचे आव्हान निर्माण झाले. या वर्षअखेर बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होत असून तिथे भाजपला रोखण्यासाठी हे सर्व जनता नेते एकत्र आले. त्यांचे हे मनोमिलन ही त्यांच्या अस्तित्वासाठीची गरज तर आहेच शिवाय भाजपाला रोखण्याची एक नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे.  सध्या या सर्व जनता नेत्यांची लोकसभेतील सदस्यसंख्या १५ व राज्यसभेत ३० आहे आणि देशातील बिहार व उत्तर प्रदेश ही दोनच राज्ये त्यांच्याकडे आहेत. मध्यंतरी बिहारमध्ये जितनराम मांझी यांनी नितीश कुमार यांच्या विरोधात बंड केल्यामुळे बिहारचे राजकारण ढवळून गेले होते. मांझी यांनी बंडातून जनता दल(सेक्यु.)चा महादलित मतदार आपल्याकडे वळवल्यामुळे भाजपसाठी ते पथ्याचे झाले होते. त्यात भाजपने लोकसभा निवडणुकीत बिहारमधील सर्वच वर्गांना आपल्याकडे खेचून घेण्याची कामगिरी केल्याने नितीश कुमार व लालूप्रसाद यादव या दोघा नेत्यांच्या राजकारणाला धक्का बसला होता. दुसरीकडे उत्तर प्रदेशात लोकसभा निवडणुकीत भाजपने ८० पैकी ७२ जागा जिंकल्यामुळे व तेथील समाजवादी पार्टीचा कारभार यथातथाच असल्याने समाजवादी पक्षाला मोठा हादरा बसला  होता. भाजपने उत्तर प्रदेशात मिळवलेले हे ऐतिहासिक यश निश्चितच मुलायम सिंह व अखिलेश यादव यांच्या दृष्टीने धोक्याचा इशारा होता. निधर्मी पक्षांना आता भाजपाला रोखण्याची आवश्यकता वाटत आहे. अन्यथा भाजपा देशातील राजकारणाचा बाज बदलून देशातील सर्वच निधर्मी राजकारण गढूळ करण्याचा धोका आहे. हे मनोमिलन चांगले जुळून आल्यास देशातील सर्व निधर्मी पक्षांची बिगर कॉँग्रेस व भाजपा वगळता एक मोठी आघाडी उभी करता येऊ शकते. सध्या डाव्या पक्षांनी जनता परिवारातल्या या पक्षांच्या एकत्रिकरणाचे स्वागत केले आहेच. त्यएामुळे बिहार व उत्तरप्रदेशच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर एक तिसरा पर्याय जनतेल मिळू शकतो. जनता कॉँग्रेसच्या कारभराला कंटाळल्यामुळेच त्यांनी भाजपाच्या विकास पत्रिकेवर शिक्कामोर्तब केले. कॉँग्रेसच्या दहा वर्षाच्या राजवटीत भ्रष्टाचार व घोटाळ्यांचाच कारभार झाला. याला कंटाळलेल्या जनतेने भाजपाच्या विकास अजेंड्याला पाठिंबा दिला व यातून भाजपा सत्तेत आली. आता भाजपा जनतेचा अपेक्षाभंग करीत आहे. कारण मोदींनी अनेक मोठी स्वप्ने दाखविली आता मात्र प्रत्यक्षात ते मोठ्या भांडवलदारांसाठी काम करीत आहेत. नव्याने आणलेले जमीन सुधारणा विधेयक हे देखील भांडवलदारांच्या लाभासाठीच आहे. अशा प्रकारे कॉँग्रेसकडून निराशा व्यक्त झाल्यावर भाजपाही त्याच मार्गावर आहे. अशा वेळी तिसर्‍या शक्तीला आपली ताकद दाखविण्याची चांगली संधी या निमित्ताने आली आहे.
------------------------------------------------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel