-->
रविवार दि. १९ एप्रिल २०१५ च्या मोहोरसाठी लेख --
-------------------------------------------
लिव्ह इन... एक पाऊल पुढे... 
---------------------------------------------
एन्ट्रो- आर्थिक उदारीकरणाची प्रक्रिया सुरु झाल्यापासून जग हे आता अतिशय जवळ आले आहे. मध्यमवर्गींची संख्या झपाट्याने वाढली आहे. या मध्यमवर्गीयांचा आशा-आकांक्षा मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. याच वर्गाने विकासाच्या झेड्याखाली एकत्र येऊन एकगठ्ठा मते नरेंद्र मोदींच्या पदरात टाकली आहेत. अमेरिकेचे जीवन हा वर्ग इकडे जगू पाहात आहे, यात वाईट असे काहीच नाही. एकीकडे ग्रामीण भागात आपल्याकडे जातीपातीच्या मर्यादा ओलांडून लग्न करणेही कठीण जात असताना दुसरीकडे शहरातील हा वर्ग लिव्ह इन रिलेशिपपर्यंत पोहोचला आहे. आपल्याकडे शहर व ग्रामीण भागातली ही दरी नजिकच्या काळात तरी मिटण्याची चिन्हे नाहीत. अशा वेळी आपण लिव्ह इनचा जास्त बाऊ न करता तो एक स्वागतार्ह बदल म्हणून स्वीकारला पाहिजे. यातूनच काही काळाने आपली पारंपारिक लग्न संस्था व कुटुंब संस्था बळकट होऊ शकते. विदेशी आहे म्हणून ते चुकीचे आहे आणि आपले ते योग्यच असे म्हणून आपल्याला चालणार नाही. अशा प्रकारच्या बदलातूनच समाज व समाज व्यवस्था प्रवाही होते आणि आपल्या समाज व्यवस्थेचे डबके होऊन त्यात गाळ साचत नाही. लिव्ह इन हे आपले पुढचे पाऊल ठरावे...
------------------------------------------------
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहाणार्‍या जोडप्यातील पतीचा मृत्यू झाल्यास पत्नीला संपत्तीतील वाटा देण्याचा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. हा निकाल खर्‍या अर्थाने क्रांतीकारकच म्हटला पाहिजे. कारण या निकालामुळे लिव्ह इनमध्ये राहाणार्‍या जोडफ्यांना आता लग्न झाल्याचा दर्जा एका अर्थाने न्यायालयाने दिला आहे. लिव्ह इनमध्ये राहाणार्‍यांचा लग्न संस्थेवर विश्‍वास असो किंवा नसो त्यांना लग्नाचा दर्जा दिला गेल्यामुळे पत्नीला यातून सुरक्षितता बहाल झाली आहे. असो. लिव्ह इन ही पाश्‍चिमात्य संस्कृतीचे खूळ असून आपली महान संस्कृती कुटुंब व्यवस्था आहे असे नेहमीच हिंदु संस्कृतीचे रक्षणकर्ते मांडत आले आहेत. आपली संस्कृती महान आहे, जग त्याकडे मोठ्या कौतुकाने पाहात आहे, हे आपण एकवेळ मान्य करु, मात्र आपल्या कुटुंब व्यवस्थेत काळाच्या ओघात जे दोष निर्माम झाले त्यातूनच तरुण पिढीला ही बंधने नकोशी वाटू लागली आणि यातूनच तरुणांचा ओढा लिव्ह इनच्या दिशेने वळला. खरे तर हा आपल्या लग्न पध्दतीचा किंवा कुटुंब व्यवस्थेचा दोष आहे, असे म्हटले पाहिजे. समाज, मग तो कोणताही असो, चांगल्या बदलांचा नेहमीच स्वीकार करीत आला आहे. अर्थात हे बदल कालानुरुप आवश्यक वाटत गेले, यातूनच जे जुनाट वाटले ते टाकून नव्याने बदल स्वीकारण्याची आपली आजवरची संस्कृती आहे. त्यादृष्टीने लिव्ह इनवर केवळ टीका न करता याकडे सकारात्मकदृष्ट्या पाहाण्याची वेळ आली आहे.
आपल्याकडे पत्नीला कितीही समान मानले गेले असले तरीही तिची अवहेलनाच झाली आहे. अगदी सीतेलाही अग्नीपरिक्षा द्यावी लागली होती. एवढेच काय सती, केशवपन या वाईट प्रथा आपल्याकडे अस्तित्वात होत्या. समाज सुधारकांनी याबाबत जनतेचे प्रबोधन करुन या प्रथा बंद पाडल्या व देशातील महिलांना या जोखडातून मुक्त केले. स्त्रिया शिकू लागल्या तसे त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव झाली. स्वातंत्र्यानंतर आपण स्त्रीला समान अधिकार दिला असला तरीही तिचा अनेक बाबतीत कोंडमारा होत होता. स्त्रिया नोकर्‍या करु लागल्या व पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करु लागल्या तरी स्त्रियांची अवहेलना काही संपली नव्हती. आपण आपल्या कुटुंंब पध्दतीचा जरुर गोडवे गात होतो परंतु त्यात स्त्रिया या दबलेल्या होत्या हे वास्तव नाकारता येत नाही. नव्वदीनंतर मात्र आलेल्या तरुण पिढीला अनेक तृटी जाणवू लागल्या होत्या. गेल्या दोन दशकात तर एकूण झालेल्या लग्नांपैकी तीस टक्क्याहून जास्त घटस्फोट होऊ लागले. स्त्री जशी स्वत:च्या पायावर उभी राहून कमवू लागली तसे तिच्या जाणीवा वाढल्या. तिला तिच्या हक्क्कांची पक्की जाणीव झाली. यातूनच घटस्फोटाचे प्रमाण झपाट्याने वाढले. यापूर्वी हे प्रमाण कमी होते याचे कारण स्त्रीयांना घटस्फोट घेणे शक्य नव्हते कारण त्या स्वत:च्या पायावर उभ्या नव्हत्या. आता परिस्थीती बदलली. आपल्याकडे घटस्फोट घेणे म्हणजे आपल्या आयुष्यातील फार मोठे नुकसान आहे, असे गृहीत धरले जाते. निदान तशी समजूत तरी करुन घेण्यात आली आहे. या सर्व घटनांचा परिणाम म्हणून लिव्ह इनकडे कल वाढला. लग्न करुन दोघांचे आयुष्य बांधून घेण्यापेक्षा दोघांनीही आपले स्वत:चे अस्तित्व कायम ठेवून एक मित्र म्हणून राहाणे पसंत करण्याकडे तरुणांचा कल आहे. यातून पारंपरेला छेद देण्याबरोबरच, लग्न ठरवूनही ते जर यशस्वी होते याची खात्री नाही तर मग परस्परांना बांधून घ्यायचेच कशाला? नवरा-बायकोने मित्र म्हणून राहून एकदा चांगली नाळ जुळली तरच पुढे चालून लग्न करण्याचा पर्याय तरुणांकडे खुला झाला. जर समजा आपले पटतच नाही तर लग्नाचा विचारच कशाला करायचा? सुरुवातीला मैत्रीमध्ये राहून पटलेच नाही तर काही काळाने तू तुझ्या घरी, मी माझ्या घरी, हे उत्तम आहे. नाही तरी लग्न जर यशस्वी होत नसेल तर घटस्फोट घेण्याची दीर्घ प्रक्रियेच्या जाचातून जाण्यापेक्षा लिव्ह इन बरे, असे म्हणणारे अनेक तरुण आहेत. म्हणजेच आपल्या लग्न संस्थेतील जे दोष होते त्यातून लिव्ह इनकडे ओढा वाढू लागला, असे म्हणावेसे वाटते. अर्थात लिव्ह इन म्हणजे सर्वच काही आलबेल आहे असे नव्हे. त्यातूनही नवीन प्रश्‍न उभे राहू लागले होते. त्यातील एक महत्वाचा प्रश्‍न होता तो पती वारल्यास पत्नीची होणारी आर्थिक कुंचबणा. अशाच एका प्रकरणी न्यायालयाने आता मालमत्तेत अधिकार देण्याचा निकाल देण्यात आला आहे. त्याचबरोबर जर लिव्ह इनमध्ये राहाताना मूल झाल्यास त्याची जबाबदारी कुणी घ्यायची हा प्रश्‍न होता. अर्थातच ही जबाबदारी दोघांचीही संयुक्त आहे.
एकूणच पाहता आपल्या समाजव्यवस्थेत गेल्या दोन दशकात झपाट्याने बदल होत आहेत. आर्थिक उदारीकरणाची प्रक्रिया सुरु झाल्यापासून जग हे आता अतिशय जवळ आले आहे. मध्यमवर्गींची संख्या झपाट्याने वाढली आहे. या मध्यमवर्गीयांचा आशा-आकांक्षा मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. याच वर्गाने विकासाच्या झेड्याखाली एकत्र येऊन एकगठ्ठा मते नरेंद्र मोदींच्या पदरात टाकली आहेत. अमेरिकेचे जीवन हा वर्ग इकडे जगू पाहात आहे, यात वाईट असे काहीच नाही. एकीकडे ग्रामीण भागात आपल्याकडे जातीपातीच्या मर्यादा ओलांडून लग्न करणेही कठीण जात असताना दुसरीकडे शहरातील हा वर्ग लिव्ह इन रिलेशिपपर्यंत पोहोचला आहे. आपल्याकडे शहर व ग्रामीण भागातली ही दरी नजिकच्या काळात तरी मिटण्याची चिन्हे नाहीत. अशा वेळी आपण लिव्ह इनचा जास्त बाऊ न करता तो एक स्वागतार्ह बदल म्हणून स्वीकारला पाहिजे. यातूनच काही काळाने आपली पारंपारिक लग्न संस्था व कुटुंब संस्था बळकट होऊ शकते. विदेशी आहे म्हणून ते चुकीचे आहे आणि आपले ते योग्यच असे म्हणून आपल्याला चालणार नाही. अशा प्रकारच्या बदलातूनच समाज व समाज व्यवस्था प्रवाही होते आणि आपल्या समाज व्यवस्थेचे डबके होऊन त्यात गाळ साचत नाही. लिव्ह इन हे आपले पुढचे पाऊल ठरावे.    
------------------------------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel