-->
संपादकीय पान सोमवार दि. २० एप्रिल २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
हवामान अंदाजाचा दिलासा
देशात यंदा मॉन्सून सर्वसाधारण वेळेच्या आधी जोरदारपणे दाखल होईल आणि देशभर सरासरीएवढा (१०२ टक्के) पाऊस पडेल, असा अंदाज स्कायमेट वेदर सर्विसेस या खासगी संस्थेने व्यक्त केला आहे. महिनानिहाय सरासरीच्या तुलनेत जूनमध्ये १०७ टक्के, जुलैमध्ये १०४ टक्के, ऑगस्टमध्ये ९९ टक्के, तर सप्टेंबरमध्ये ९६ टक्के पाऊस पडणार असल्याचे स्कायमेटच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. गेल्या वर्षी आपल्या डोक्यावर अल् नियोचे ढग होते. त्यामुळे सरासरी पेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त झाला होता. हा अंदाज बहुतांशी खरा ठरला असला तरी यंदा देशात अनेक भागात अवकाळी पावसाने धडक दिली. त्यामुळे बळीराजाचे मोठे नुकसानच झाले. सरकार बदलूनही शेतकर्‍यांच्या हिताचे निर्णय न झाल्याने अवकाळी पावसाने शेतकरी संपूर्णपणे आडवाच झाला. सरकारने केवळ गप्पाच केल्या. त्यामुळे महाराष्ट्राबरोबर देशाच्या अनेक भागात आलेला पाऊस शेतकर्‍यांना नैराश्येच्या गर्तेत घालणारा ठरला. कधी नव्हे तो यावेळी कोकणातही गार्‍या पडल्या. खेडमध्ये दोन दिवसांपूर्वी गारांचा पाऊस पडल्याने कोकणावरही निसर्गाने अवकृपा केली आहे. या पार्श्‍वभूमीवर यंदा पाऊस चांगला पडणार असल्याचा झालेला अंदाज सुखराकर ठरेल, याबाबत काही शंका नाही. देशात जून ते सप्टेंबर या कालावधीत ८८७ मिलिमीटर म्हणजेच सरासरीच्या १०२ टक्के पाऊस पडेल. यात चार टक्क्यांनी वाढ किंवा घट होऊ शकते. हंगामात सरासरीहून अती पाऊस पडण्याची शक्यता ८ टक्के, सरासरीहून अधिक पाऊस पडण्याची शक्यता २५ टक्के, सरासरीएवढा पाऊस पडण्याची शक्यता ४९ टक्के, सरासरीहून कमी पाऊस पडण्याची शक्यता १६ टक्के, तर दुष्काळ पडण्याची शक्यता फक्त दोन टक्के असल्याची माहिती देण्यात आली आहे. मॉन्सून देशात दाखल होतानाच त्यापासून जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. हंगामात कोकणासह पश्‍चिम किनारपट्टीवर बहुतेक ठिकाणी, पंजाब, हरियाना, केरळ, गोवा आणि उत्तर प्रदेशच्या पश्‍चिम भागात चांगला पाऊस होईल. तर तामिळनाडू, रायलसिमा व कर्नाटकच्या दक्षिण भागात सरासरीहून कमी प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सरासरीएवढा पाऊस पडण्याची शक्यता जूनमध्ये ६४ टक्के, जुलैमध्ये ७४ टक्के, ऑगस्टमध्ये ७२ टक्के तर सप्टेंबरमध्ये ५७ टक्के आहे. याउलट सरासरीहून कमी प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता जूनमध्ये ७ टक्के, जुलैमध्ये ९ टक्के, ऑगस्टमध्ये १८ टक्के तर सप्टेंबरमध्ये २५ टक्के आहे. म्हणजेच एकूण हंगामाचा विचार करता सरासरीएवढ्या किंवा त्याहून अधिक पावसाची शक्यता सर्वाधिक आहे. त्यातही मॉन्सून वेळेत दाखल होण्याची व त्याचे देशभर चांगल्या प्रमाणात वितरण होण्याची चिन्हे आहेत. स्कायमेटने २०१२ मध्ये देशात सरासरीहून ९५ टक्के तर २०१३ मध्ये १०३ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला होता. या दोन्ही वर्षी अनुक्रमे ९३ टक्के व १०५ टक्के पाऊस पडल्याने दोन्ही अंदाज बरोबर आले. गेल्या वर्षी (२०१४) ९१ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. प्रत्यक्षात ८८ टक्के पाऊस पडला. अंदाजातील चार टक्के कमी अधिक बदलाची शक्यता विचारात घेता आत्तापर्यंत वर्तविण्यात आलेले मॉन्सूनचे तीनही अंदाज बरोबर आल्याचा दावा संस्थेमार्फत करण्यात आला आहे. यंदा मॉन्सूनपूर्व स्थितीचा अंदाज घेत असताना एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात व मेच्या पहिल्या आठवड्यात पश्‍चिम किनारपट्टीवर पाऊस पडण्यास सुरुवात होईल. मेच्या दुसर्‍या आठवड्यात गुजरात व महाराष्ट्रात पाउस पडण्याचा अंदाज आहे. उत्तर व इशान्य भारतात पूर्वमोसमी पावसात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त झाला आहे. मॉन्सून वेळेच्या आधी व जोरदारपणे दाखल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सध्या पावसाळ्याचे चित्र सकारात्मक दिसत आहे. त्यामुळे गेल्या वर्षीपेक्षा यंदा चांगले दिवस येतील अशी अपेक्षा करावयास हरकत नाही. मराठवाडा, विदर्भ व कोकणातील काही भागात यंदा दुष्काळ आहे. कोकणात दुष्काळाचे प्रमाण कमी असले तरीही सर्वात विदारक अवस्था मराठवाडा व विदर्भात आहे. पाण्यावाचून मोठ्या संख्येने जनतेला स्थलांतर करावे लागले आहे. माणसांना पाण्याची वानवा तर जनावरांची काळजी तर लांबची राहिली. आता तर सरकारने गो हत्या बंदी केल्याने दुष्काळी भागातील अनेक भाकड जनावरांचा मोठा प्रश्‍न आहे. त्यातच अनेक भागात अवकाळी पाऊस पडल्याने उभी राहिलेली पिके करपली आहेत. अशा स्थितीत यंदातरी चांगला पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त होणे हा एक मोठा दिलासा आहे. सरकारने अनेक भागात टँकरने पाणीपुरवठा सुरु केला असला तरीही टॅँकरने पाणीपुरवठा करण्यावर अनेक मर्यादा आहेत. त्यामुळे टँकर बंद करुन प्रत्येक गावात कायम स्वरुपी पाणी कसे मिळेल याकडे लक्ष दिले पाहिजे. नवीन सरकारकडून याबाबत मोठी अपेक्षा होती, परंतु अजूनही हे सरकार या दृष्टीने काहीच पावले उचलत नाही. यंदा पाऊस चांगला पडणार असल्याने अनेक दुष्काळी भागाला जसा दिलासा मिळेल तसा उद्योगधंद्यालाही मोठा आधार मिळणार आहे. पाण्याचा तुटवड्याचा अनेक उद्योगांवर परिणाम झाला आहे. अर्थात पाऊस पडायला अजून दीड महिन्यांहून जास्त काळ आहे. अजूनही संपूर्ण मे महिना जायचा आहे. त्यात दुष्काळाची परिस्थीती आणखीनच विदारक होईल. अशा स्थितीत जेमतेम दीड महिना ढकलला ही चांगला पाऊस अपेक्षित असल्याने पहिलाच पाऊस दिलासा देईल.
------------------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel