-->
रविवार दि. ३० नोव्हेंेबर २०१४ च्या मोहोरसाठी लेख --
-------------------------------------------
आठवणींचे मोहोळ...
गेल्याच आठवड्यात बॅरिस्टर अंतुले आजारी असल्याचे समजले आणि पहिला फोन केला दत्ता खानविलकरांच्या घरी. म्हटलं, भाऊंना अंतुलेंच्या आजारपणाची बातमी सांगावी आणि काही अंतुलेंविषयीच्या त्यांच्या आठवणी जागृत कराव्यात... या निमित्ताने चांगल्या गप्पाही होतील असा इरादा होता. मात्र दरवेळ प्रमाणे फोन भाऊंनी न उचलता त्यांच्या चिरंजीवांनी उचलला. त्यावेळी भाऊ आजारी असल्याचे समजले. मला वाटले किरकोळ आजारपण असेल. मात्र त्यांचे चिरंजीव म्हणाले, आता त्यांनी खाणे सोडले आहे, केवळ पाण्यावर आहेत. हे समजले त्यावेळी मनात काहीसे चर्रर झाले... दोन दिवसात प्रत्यक्ष घरी जाऊन भेटू असा विचार होता आणि शुक्रवारी पहाटे भाऊ गेल्याची बातमी आली. माझा त्यांचा परिचय सव्वा वर्षांचा. त्यात काळात त्यांची तीन वेळा भेट झाली. फोनवरुन बरेच वेळा बोलणे होई. मात्र त्यांची गप्पा करण्याची या वयातही हौस दाणगी होती. कुणीही घरी आले की त्यांना बरे वाटे. घराच्या सुरुवातीला असलेल्या त्यांच्या कार्यालयात बसून गप्पा होत. मी ज्यावेळी कृषीवलला संपादक म्हणून दाखल झालो त्यावेळी पहिल्याच महिन्यात मला त्यांचा फोन आला. मी दत्ता खानविलकर बोलतोय. तुम्ही संपादक झाल्यापासून तुमचे अग्रलेख व चिंतन हे दररोजचे सदर वाचतोय. मला आवडते. म्हणून फोन केला. मला एैकायला कमी येते. त्यामुळे तुम्ही काय बोलता ते मला कदाचित एैकायला येणार नाही. परंतु कधी आलात तर आपली प्रत्यक्षात भेट होईल... त्यांचा हा फोन झाल्यावर माझी भाऊंना भेटण्याची उत्सुकता वाढली. लगेचच दुसर्‍या दिवशी त्यांच्या घरी पोहोचलो. पहिल्या पाच-दहा मिनिटातच त्यांच्या गप्पा एैकाव्यात असे मला वाटू लागले. आमच्या दोघांच्यात तब्बल ४० वर्षांचे अंतर असल्याने मी तियांना मला अहो म्हणू नकात असे सांगितले. परंतु ते त्यांनी कधीच एैकले नाही. नेहमी मला ते आदरातीर्थीच बोलत. मला त्याचे आश्‍चर्य वाटे. त्यांच्या गप्पा करताना तेच फक्त बोलत असत. मला काही बोलायचे झाल्यास मोठ्याने बोलावे लागे. असो. सध्याचे चाललेले राजकारण आणि पूर्वीच्या काळात असलेले राजकारण याची तुलना ते आवर्जुन करीत. जिल्ह्याचे कॉँग्रेसचे नेते म्हणून यशवंतराव चव्हाण यांच्याशी त्यांचा परिचय झाला होता. भाऊंच्या अभ्यासू वृत्तीची पारख यशवंतरावांनी बरोबर केली आणि त्यांना मंत्रिमंडळात पाचारण केले. त्याची आठवण सांगताना ते म्हणाले होते, मी त्यावेळी कोर्टात होतो. तेवढ्यात कुणीतरी माझा फोन आल्याचे सांगत आला. मी फोन घेतला. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून फोन होता. उद्या शपथविधीला सकाळी ११ वाजता या, असा निरोप होता. माझा तर विश्‍वासच बसला नव्हता. परंतु यशवंतरावांनी माझ्या अभ्यासू वृत्तीची पारख करुन मला मंत्री केले होते. असा तो काळ होता. नाहीतर आता मंत्री होण्यासाठी जी फिल्डिंग लावतात ते पाहून बदललेल्या राजकारणाची दिशा समजते. तसेच मी मंत्रीपदाचा ज्यावेळी राजीनामा दिला त्यावेळी मंत्रालयातून बाहेर पडलो आणि सरकारी बंगल्यावर गेलो. पत्नीला सांगितले. आपल्याला अलिबागला परतायचे आहे. तेथून थेट निघालो तो अलिबागला घरी पोहोचलो.
त्यांचे हे अनुभव एैकताना त्यांना मध्येच तोडून मी म्हणालो, तुमचे हे अनुभव लिहून काढा. त्यावर ते म्हणाले, थांब जरा. असे म्हणून ते घरात गेले आणि एक पुस्तक घेऊन आले. मागोवा या त्यांच्या आत्मचरित्रावर सप्रेम भेट म्हणून लिहून सही करुन माझ्या हातात दिले. राजकारणाच्या व्यतिरिक्त तुमची आवड कोणती असे मी विचारले असता ते म्हणाले, माझ्यादृष्टीने राजकारण गौण आहे. मला फिरयला आवडते. त्यानुसार मी केवळ कोकणातच नव्हे तर संपूण४ हिंदुस्थान एक पर्यटक म्हणून फिरलो. तशीच मला संगिताची आवड आहे. संगीताच्या अनेक मैफिली मी रात्ररात्र जागविल्या आहेत. विच्छा माझी पुरी करा हे माझे सर्वात आवडते नाटक ते मी नऊ वेळा पाहिले. मी आश्‍चर्ययाने सर्व एैकत होतो. असा राजकारणी माणूस विरळाच. मला मात्र त्यांचे असलेल्या अंतुलेंच्या संबंधाविषयी फार उत्सुकता होती. शेवटी त्यांना त्याविषयी छेडलेच. त्यावर ते म्हणाले मला माहित आहे पत्रकार म्हणून तुम्हाला त्यात या विषयात सर असणारच. त्यावर मी हसत असताना ते म्हणाले, आमचे दोघांचे संबंध हे मैत्रीचेही होते आणि दुराव्याचेही होते. आम्ही दोघे एकाच वर्षी म्हणजे १९६२ साली आमदार झालो. मात्र माझी मंत्रिमंडळात वर्णी पहिल्यांदा लागली. त्यामुळे ते नाराज झाले. तिथून आमच्यात दुराव्याची बिजे रोवली गेली असे मला वाटते. परंतु त्यानंतर आम्ही अनेकदा एकत्रही आलो. पक्षाच्या हितासाठी अनेक चांगली कामेही केली. सध्याच्या भ्रष्ट राजकारण्यांबाबत बोलताना ते म्हणाले, मी अलिबागचा नगराध्यक्ष असताना श्रीबाग वसविले. त्यावेळी मी माझे कौतुक म्हणून सांगत नाही. त्यातील एकही प्लॉट मी माझ्यानावावर घेतला नाही. अनेकांना बोलावून प्लॉट नकाशावर दाखवून त्यांना विकले गेले. आज तो एरिया म्हणजे मुंबईतील हिंदु कॉलनीसारखा पॉश झाला आहे. मात्र एवढे प्लॉट माझ्या डोळ्यासमोर विकूनही माझ्यावर भ्रष्टाचाराचा साधा आरोपही झाला नाही, याचा मला अभिमान वाटतो.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कृषीवलने भ्रष्टाचारविरोधी मोहीम हाती घेतली होती. त्यानंतर आमच्यावर १०० कोटी रुपयांचा दावा ठोकण्यात आला होता. त्याविषयीची बातमी आल्यावर सकाळीच भाऊंचा फोन आला. मला तुम्हाला आलेली कोर्टाची नोटीस पहायची आहे. मी लगेच येतो म्हटले आणि पुढच्या दहा मिनिटात मी त्यांच्या घरी पोहोचलो. त्यांनी कागदपत्रांवर एक नजर मारली आणि त्यांनी एक स्मीत हास्य केले व मला म्हणाले, काही काळजी करु नकोस. जर ही केस लढवायचीच वेळ आली तर मी तुमच्या बाजूने कोर्यात उभा राहिन. त्यांची ९२व्या वर्षी असलेली उर्मी, जिद्द पाहून मी अचंबितच झालो... आपल्याला जे काही आजवर मिळाले त्यात सुखी आहोत. आता फक्त मरण चांगले यावे अशी त्यांची इच्छा ते जाहीरपणे व्यक्त करीत. नियतीने त्यांची ती इच्छा देखील पूर्ण केली. आता फक्त त्यांच्या शिल्लक राहिल्या आहेत त्या आठवणी...
-------------------------------------------------

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel