
सावधानगिरी हवीच...
16 फेब्रुवारी २०२१ साठी अग्रलेख
रायगड जिल्ह्यातून कोरोना आता हद्दपार होऊ लागला असला तरीही अध्यापी सावधानगीरी बाळगावी लागणार आहे. कारण जिल्ह्यात साठ हजाराच्यावर कोरोनापासून लोक मुक्त झाले आहेत. मात्र दीड हजारांच्यावर कोरोनाने मृत्यू झाले आहेत. तसेच सध्या अजूनही पाचशेच्या वर रुग्ण आहेत. मात्र रुग्णसंख्या वाढीचा वेग नियंत्रणात आला आहे, ही सर्वात समाधानाची बाब आहे. मुरुड, तळा, श्रीवर्धन व म्हसळा या चार तालुक्यात शंभर टक्के नियंत्रण आले असून येथे एकही रुग्ण नाही. अन्य सात तालुक्यात रुग्णांची संख्या दहाच्या आत आली आहे. त्यामुळे येत्या महिन्याभरात येथील रुग्णसंख्या शून्यावर येऊ शकते. मात्र अजूनही पनवेल शहर व पनवेल ग्रामीण भागात रुग्णसंख्या पाचशेच्या घरात आहे. तेथील कोरोना नियंत्रणात येणे गरजेचे आहे. पनवेल हा भाग मुंबईपासून जोडला गेलेला असल्याने मुंबईचे उपनगर असल्यासारखे आहे. त्यामुळे तेथील कोरोनाचा प्रसार अजूनही नियंत्रणात येत नाही. रुग्णसंख्या घटते आहे तरी देखील अन्य तालुक्यांप्रमाणे येथील रुग्णसंख्या शून्यावर यायला काही काळ निश्चितच लागेल. त्याच्याच शेजारी असलेल्या उरण तालुक्यात एकेकाळी कोरोनाने कहर केला होता. परंतु आता तेथील कोरोना नियंत्रणात आला आहे, ही सर्वात समाधानाची बाब म्हटली पाहिजे. रायगड जिल्हा शंभर टक्के कोरोनामुक्त झाला असे म्हणणे धाडसाचे होईल, परंतु त्यादृष्टीने रायगडची वाटचाल सुरु आहे असे म्हणता येईल. रायगड जिल्हा हा प्रामुख्याने एका बाजुला औद्योगिकदृष्ट्या प्रगत जिल्हा आहे तर दुसरीकडे किनारपट्टीच्या भागात पर्यटन व्यवसाय फोफावला आहे. त्यातच अनेक भागात अजूनही शेती मोठ्या प्रमाणात होते. अजूनही भाताचे कोठार ही संकल्पना रायगड जिल्ह्याच्या बाबतीत खोडली गेली नाही. लॉकडाऊनच्या काळात बंद न झालेल्या जिल्ह्यातील कंपन्या व पर्यटन व्यवसाय़ तसेच रायगडच्या बाहेर स्थायिक झालेले रायगडकर सणासुदीच्या निमत्ताने पुन्हा गावी आल्याने कोरोना रायगडात आला. मार्च महिन्यापासून लॉकडाऊन सुरु झाल्यावर पर्यटन व्यवसाय पूर्णपणे थंडावला. मात्र काही कंपन्या आत्पातकालीन प्रकारातील असल्यामुळे त्या सुरु ठेवाव्या लागल्या. त्यामुळे कोरोना पसरण्यास हातभार लागला. खरे तर यातील अनेक कंपन्या सुरु ठेवण्याबाबत वाद होते परंतु जिल्हाधिकाऱ्यांच्या आग्रहामुळे अनेक कंपन्या सुरुच राहिल्या. पनवेल शहर हे मुंबईचे उपनगर असल्याने तसेच तेथील दाट लोकसंख्या पाहता कोरोनाचा प्रसार तेथे झपाट्याने झाला. उरणचेही तसेच झाले. देशात सुरु झालेले लॉकडाऊन व त्यानंतर प्रदीर्घ काळ रायगडात कोरोना फारसा नव्हताच. मात्र गणपतीत चाकरमनी गावी आले आणि कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला. लॉकडाऊन उठल्यावर लोकांचा प्रवास सुरु झाला आणि रायगडात वेगाने कोरोना फैलावू लागला. कोरोना रायगडात येण्यापूर्वी निसर्ग या चक्रीवादळाने रायगडाला गाठले होते. त्यात रायगडकरांचे कंबरडे पार मोडले होते. या चक्रीवादळाने अनेक बागयतदारांचे मोठे नुकसान झाले होते. वर्षानुवर्षाची पोसलेली झाडे उभ्याची आडवी झाली होती. नारळ, फोपळीच्या बागा आडव्य़ा झाल्या होत्या. हे एक मोठे नुकसान उभे ठाकले असतानाच लॉकडाऊनमुळे पर्यटन व्यवसाय बंद झाला होता. त्यामुळे अनेकांच्या व्यवसायावर गदा आली होती. अनेकांसाठी पर्यटन व्यवसाय हा एक उत्तम प्रकारे जोड धंदा होता. तोच ठप्प झाल्याने रायगडकरांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. निसर्ग चक्रीवादळामुळे झालेले नुकसान सरकार भरुन देईल ती आशा देखील मावळली होती. अनेकांना त्यांची नुकसानभरपाई मिळली नाही. कोरोनामुळे सरकारच्या तिजोरीत खडखडाट झालेला असताना सरकारने ते निमित्त करुन चक्रीवादळातील नुकसानभरपाईला चांगलीच बगल दिली. सरकारने यासंदर्भात सर्वंचीच घोर निराशा केली. गेल्या वर्षातील चक्रिवादळ व कोरोना यामुळे झालेल्या नुकसानातून बाहरे येण्यासाठी रायगडवासियांना खरे तर राज्य सरकराच्या पाठबळाची गरज होती. परंतु आवश्यक ते पाठबळ न मिळाल्याने रायगडकर आता किमान तीन ते पाच वर्षे मागे ढकलले गेले आहेत. आता पुन्हा एकदा पर्यटन व्यवसाय बहरु लागल्याने जिल्ह्यात व्यापार उदीम सुरु झाला आहे. पर्यटन व्यवसायिकांच्या हातात चार पैसे खेळू लागले आहेत. मात्र अजूनही कोरोनाच्या काळात गेलेले जिल्ह्यातील रोजगार पूर्वरत झालेले नाहीत. कोरोना अजून पूर्णपणे संपलेला नाही. त्यासाठी खबरदारी घेत सर्व व्यवसाय सुरु करावे लागत आहेत. जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांकडून कोरोना पुन्हा येण्याचा धोका आहे, परंतु खबरदारी घेतल्यास कोरोना होणार नाही. त्यामुळे धोका पत्करत का होईना जिल्हात पर्य़टनास प्रारंभ झाला आहे. खरे तर पूर्णपणे आर्थिक कणा मोडलेल्या रागडकरांना पर्यटन व्यवसाय सुरु करण्याशिवाय काही पर्याय राहिलेला नाही. येत्या काही महिन्यात कोरोनामुक्त जिल्हा झाल्यास पुन्हा एकदा जिल्ह्यातील लोक उभारी घेऊ लागतील. विविध डॉक्टर्स व वैद्यकीय सेवा कर्मचाऱ्याना लसीकरण सुरु झाले आहे. परंतु शहरातील लोकांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना किंवा पन्नाशीच्या वर वय असलेल्यांना आता लसीकरणात सहभागी केले जाणार आहे. तसे झाल्यास लोकांमध्ये नवा उत्साह व आत्मविश्वास मिळू शकेल. लस घेतल्याने संपूर्ण कोरोनामुक्ती मिळणार नसली तरीही कोरोनापासून लढण्याचा एका नवा विश्वास संपादन करता येईल. जगात कोरोना पासून कुठलाच देश मुक्त झालेला नाही. उलट अमेरिका व युरोपातील बहुतांशी देशात कोरोनाची दुसरी लाट अधिक आक्रमकतेने आली असताना आपल्याकडे कोरोना नियंत्रणात आला आहे. हीच मोठी समाधानाची बाब म्हटली पाहिजे.
0 Response to "सावधानगिरी हवीच..."
टिप्पणी पोस्ट करा