-->
संपादकीय पान गुरुवार दि. २७ नोव्हेंेबर २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------
भुईमुगाच्या शेंगा आणि सत्तेचे गाजर
-----------------------------------
सध्या शिवसेना नेते आणि शिवसैनिक दोघेही अस्वस्थ आणि बेचैन आहेत. त्यांची अस्वस्थता ही सत्ता हाती येत नसल्याबद्दलची आहे. सत्ता मिळावी यासाठी भाजपापुढे म्हणजे उध्दव ठाकरे यांच्याच भाषेत बोलायचे झाले तर अफजलखानाच्या दाराचे उंबरठे झिझवत आहेत. मात्र भाजपाने त्यांना सतत झुलवत ठेवण्याचा निर्धार पक्का केलेला दिसतो. कदाचित यातच पाच वर्षे कशी निघून जातील हे कळायचे नाही. शेवटी आपल्याला सत्तेत घेणार नाही असे स्पष्ट दिसू लागताच भाजपावर शेतकर्‍यांच्या प्रश्‍नाचे व दुष्काळाचे निमित्त करीत बार उडविण्याचे धारिट्य उद्धव ठाकरे यांनी केले आहे. मोबाईल फोनचे बिल भरायाला पैसे आहेत. मग वीजबिले का भरत नाहीत, असा बोचरा सवाल महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना केला होता. खडसे साहेब हे काही खोटे बोलले असे नाही. यापूर्वी पाऊस पडला नाही तर धरणात मी काय मुतू असा सवाल तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला होता. खडसेंचे विधान हे अजित पवारांच्या धर्तीवरच होते. हे विधान खरे असले तरी सत्ताधार्‍यांनी काय बोलावे याचे काही संकेत पाळावयाचे असतात. खडसेंच्या या विधानाचा उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला होता. सत्तेत सहभागी करुन घेणार तर नाहीत, मग विरोधात बोलावे असे ठरवून ठाकरे बोलले. त्यावर खडसे म्हणाले, ज्यांना भूईमुग जमिनीखाली उगवतो की वर हे माहीत नसणार्‍यांनी आम्हाला शिकवू नये. अशा प्रकारे भाजपा व शिवसेनेत आता पुन्हा एकदा भुईमुगाच्या राजकारणावरुन दरी वाढत चालली आहे. मध्यंतरी शिवसेनेेने भाजपा आपल्याला दाद देत नाही हे लक्षात आल्यावर भागवतांना मध्ये घालून सत्तेची शिडी चढण्याचा प्रयत्न करुन पाहिला. हिंदुत्वाची नाळ आपल्याला संघाच्या शिडीवरुन जाऊन सर करता येईल असा इरादा उद्धवरावांचा होता. परंतु ही शिडी देखील मोदी व शहा या दिल्लीतील जोडीने तोडली. मुख्यमंत्री फडणवीस मात्र चर्चा सुरु आहे असे, काम चालू रस्ता बंद या रस्त्यावरील पाटीप्रमाणे बोलले. मात्र भाजपाकडून कसलाही प्रस्ताव शिवसेनेकडे आलेला नाही त्यामुळे चर्चा कसली चालू आहे तेच समजत नाही. खरे तर शिवसेनाला सत्तेची दारे भाजपाने केव्हांच बंद केली आहेत. मात्र अजूनही आपल्या जुन्या दोस्तीचे नारे देत शिवसेना सत्तेचा दरवाजा ठोठावण्याचा प्रयत्न करीत आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला मिळालेलं यश अजिबात निराश होण्यासारखं नव्हतं. शिवसेना सत्तेत येणार नव्हतीच पण त्यांना यश चांगल लाभले हे वास्तव आहे.  लोकसभेलाही यश चांगले लाभले होते. मात्र त्याचे श्रेय नरेंद्र मोदींच्या लाटेला होते. अर्थात शिवसेनेच्या नेतृत्वाला आपले कर्तृत्व त्यात दिसले आणि त्यांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली. या निवडणुकीत शिवसेनेने ६३ जागा जिंकल्या. १९९५ मध्ये शिवसेना-भाजप सत्तेत आलेे तेव्हा सेनेला ७१ जागा मिळाल्या होत्या. म्हणजे गेल्या पंचवीस वर्षातलं सेनेचं हे दोन नंबरचं यश आहे. विशेष म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या गैरहजेरीतली ही पहिली विधानसभा निवडणूक होती. नरेंद्र मोदींच्या लाटेत टिकून राहणं ही अवघड गोष्ट होती. शिवसेनेकडे प्रचाराची धुरा सांभाळणारा उद्धव यांच्याशिवाय दुसरा नेता नव्हता. तरीही सेनेने मुंबई, ठाणे आणि कोकणातले आपले बालेकिल्ले राखत मिळवलेला हा विजय लक्षणीय म्हणावा लागेल. शिवसैनिकांची निष्ठा, प्रत्यक्ष मैदानावरची यंत्रणा या जोरावर सेनेने आपला पारंपरिक मतदार टिकवला. एका मर्यादेपर्यंत मराठी अस्मितेला साद घालण्यासाठी ते यशस्वी झाले.परंतु सत्ता येणार म्हणून जमा झालेले कावळे निराश झाले. सर्वसामान्य शिवसैनिक मात्र यशाने खूष होता. त्याला सत्ता येण्यात रस नाही. परंतु नेतृत्वच गोंधळात पडलं तर कार्यकर्ते काय करणार? भाजपचा घोडा बहुमतापर्यंत पोहोचण्यापासून शिवसेनेनेच रोखला होता. भाजपला सेनेची गरज होती. पण इथेच उद्धव ठाकरे फसले. शरद पवारांनी टाकलेला गुगलीही त्यांना कळला नाही. जागावाटपाच्या बोलण्यातही भाजपचा कावा ओळखण्यात उध्दव ठाकरे अयशस्वी  ठरले. राजकारणात नेहमी तलवार उपसून चालत नाही, गनिमी खेळीही खेळावी लागते याचा त्यांना विसर पडला. भाजपने एवढा अपमान केल्यावरही केंद्रातलं मंत्रिपद त्यांनी सोडलं नाही. शिवसेना सत्तेसाठी लाचार आहे, असा अर्थ यातून अमित शहा यांनी काढला आणि मग निवडणूक निकालानंतरही हे अपमानसत्र सुरू राहिलं. अनिल देसाई यांच्या मंत्रिपदाबाबत जे काही घडलं ते तर निव्वळ लाजिरवाणं होत. उद्धव ठाकरे याहीवेळी एनडीएतून बाहेर पडले नाहीत. सेनेला जर सत्ता मिळाली नाही तर त्यात ुभी फूट पडणार हे नक्की. सेना नेत्यांना मंत्रिपदं हवी आहेत. आम्ही किती काळ सत्तेबाहेर राहायचं हा त्यांचा सवाल आहे. शिवसैनिकांना मात्र संघटनेच्या स्वाभिमानाची चिंता आहे. सत्ता नसली म्हणून काय झालं, आपण रस्त्यावर तर राडा करू शकतो ही त्यांची वृत्ती आहे. यातूनच विश्वासदर्शक ठरावानंतरचा गोंधळ निर्माण झाला. काही ठिकाणी शिवसैनिकांनी भाजपच्या निषेधाचे बोर्ड लावले आणि मग सेना नेत्यांनी ते काढायला लावले! शिवसेना नेतृत्वातली शहरी आणि ग्रामीण दरी काही नवी नाही. पण एकनाथ शिंदे यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यावर ती वाढली आहे. शिंदे निष्ठावंत शिवसैनिक आणि उत्कृष्ट संघटक. पण विधिमंडळाच्या कामकाजात त्यांची आजवर छाप पडलेली नाही. उद्धव ठाकरे शहरी नेत्यांनाच प्राधान्य देतात असा संदेश यातून गेला आहे. सत्तेत जायचं की विरोधी पक्ष म्हणून पाच वर्षे काम करायचं याचा ठाम निर्णय घ्यावा लागेल. सध्या शिवसेनेचा डोळा सत्तेच्या गाजरांवर आहे, भाजपाला ही सत्ता त्यांना द्यावयाची नाहीत त्यामुळे खडसे भुईमुगाच्या शेंगा नाचवित आहेत.
-----------------------------------------------------------

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel