-->
अखेर फाशीच!

अखेर फाशीच!

संपादकीय पान गुरुवार दि. २३ जुलै २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
अखेर फाशीच!
मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या भीषण दहशतवादी बॉम्बस्फोटातील गुन्हेगार याकूब अब्दुल रझाक मेमन याची दुरुस्ती याचिका (क्युरेटिव्ह पीटिशन) सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळली. सर्वोच्च न्यायलयाच्या निकालामुळे त्याला फाशी देण्याचा मार्ग मोकळा झाला असून येत्या ३० जुलैस या शिक्षेची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. सध्या याकूब मेमन हा नागपूरच्या तुरुंगात आहे. नागपूर येथे फाशी देण्याची व्यवस्था असल्याने बहुदा त्याला तेथेच फाशी दिली जाण्याचा अंदाज आहे. डिसेंबर ९२ साली बाबरी मशिद पाडल्यावर हिंदु-मुस्लिम या दोन धर्मियांत उभी तेढ निर्माण झाली होती. स्वातंत्र्यानंतर ज्याप्रमाणे फाळणी झाल्यावर पाकिस्तानची निर्मिती झाल्यावर दंगलीची स्थिती होती त्याचीच पुनरावृत्ती होणार असे चित्र होते. बाबरी मशिद पाडल्यावर लगेचच म्हणजे १२ मार्च १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या १३ बॉम्बस्फोटात ३५० लोक ठार तर इतर १२०० जण जखमी झाले होते. देशात अशा प्रकारे बॉम्बस्फोटाची मालिका होण्याची पहिलीच वेळ होती. या बॉम्बस्फोटानंतर देशातील सर्वधर्मसमभावाच्या संकल्पनेला तडा जातो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडविण्यासाठी याकूबने दाऊद इब्राहिमला मदत केली होती. १९९६पासून मला दुभंग व्यक्तिमत्त्वाचा रोग जडला असून २० वर्षे मी तुरुंगात आहे. त्यामुळे जन्मठेप आणि फाशी या दोन शिक्षा एकाच वेळी देता येत नसल्याने माझी फाशी रद्द करावी, असे याकूबच्या वतीने याचिकेत म्हटले होते. सरन्यायाधीश एच. एल. दत्तू यांच्या नेतृत्वाखालील पीठाने म्हटले आहे, की याकूबने उपस्थित केलेले मुद्दे सर्वोच्च न्यायालयाने २००२ मध्ये दुरुस्ती याचिकेच्या निर्णयाबाबत घालून दिलेल्या तत्त्वात येत नाहीत. २१ मार्च २०१३ रोजी मेमनच्या फाशीच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले होते. त्यानंतर या शिक्षेच्या फेरविचाराची मागणी करण्यासाठी त्याने केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने ९ एप्रिल १९१५ला फेटाळली होती. राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनीही मे २०१४मध्ये त्याच्यावतीने केलेला दयेचा अर्ज फेटाळला होता.  सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात २३ जणांना जन्मठेप ठोठावली असून त्यात याकूबचा भाऊ इसा, वहिनी रुबिना यांचा समावेश आहे. याकूब हा फरारी होता आणि काठमांडूहून दिल्ली विमानतळावर ६ ऑगस्ट १९९४ रोजी येताच त्याला अटक करण्यात आली होती. आपण शरण येण्यासाठीच मायदेशी परतल्याचा दावा त्याने केला होता. याकूबचा मोठा भाऊ टायगर मेमन आणि या कटातील अन्य काही गुन्हेगारांनी पाकिस्तानात आश्रय घेतल्याचा संशय आहे. याकूब मेमन याने मुंबई बॉम्बस्फोटात सामील असलेल्यांना आरडीएक्स उपलब्ध करून दिले होते शिवाय विमानाची तिकिटेही दिली होती. मेमन बंधू १० मार्च १९९३ रोजी म्हणजे मुंबई बॉम्बस्फोटाच्या दोन दिवस अगोदर मुंबईतून पळाले होते. या प्रकरणाचा तपास मुंबईचे आताचे सह पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्या नेतृत्वाखाली सुरू होता. दक्षिण मध्य मुंबईत एका स्थानिक बीटवरच्या पोलिसाला वरळीत एक बेवारस मारुती ८०० ही गाडी दिसली. तिची नोंदणी कागदपत्रे रुबिना मेमनच्या नावाने होती. त्यावरून पोलिसांनी मेमन बंधूंच्या माहीम येथील अल हुसैनी इमारतीचा माग काढला. तेथे तपास करताना मारिया यांना फ्रीजवर एका दुचाकीच्या किल्ल्या सापडल्या व नंतर कठा बाजार भागात स्फोटकांनी भरलेले एक वाहन तपासात सापडले. या प्रकरणी निकालानंतर याकूबची पत्नी रहीन हिने दिलेल्या एका मुलाखतीत असे म्हटले होते की, आम्ही कराचीत नजरकैदेत होतो, तेथे आम्हाला राहणे आवडत नव्हते म्हणून आम्ही भारतात आलो. तिच्या मते याकूब मेमन १९ जुलै १९९४ मध्ये स्वत:हून भारतात आला, पण त्याला अटक केल्याचे दाखवण्यात आले. काहींच्या मते याकूब मेमन व गुप्तचर संस्था यांच्यातील समझोत्यानुसार याकूबला १९९४ मध्ये दुबईमार्गे पाकिस्तानातून भारतात आणले. याकूबला टाडा न्यायालयाने २००७ मध्ये फाशीची शिक्षा सुनावली ती नंतर २०१३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने कायम केली. याकूबने बॉम्बस्फोटासाठी टायगर मेमनच्या मालकीच्या आस्थापनेमार्फत पैसा पुरवला. याकूबला कसे पकडण्यात आले याबाबत एकवाक्यता नाही. पण त्याने केलेल्या दाव्यानुसार त्याला नेपाळमध्ये पकडून भारतात आणण्यात आले. काठमांडू विमानतळावर जुलै १९९४ मध्ये त्याला अनेक व्हिसा कागदपत्रांसह पकडण्यात आले. सीबीआयच्या मते त्याला नवी दिल्लीत अटक करण्यात आली. याकूबला जुलै २००७ मध्ये टाडा न्यायालयाचे न्या. प्रमोद कोदे यांनी फाशी सुनावली होती. त्यानंतर त्याने जुलै २००९ मध्ये कुटुंबाबरोबर राहण्याची परवानगी देण्याची याकूबची मुंबई उच्च न्यायालयात केलेली मागणी फेटाळण्यात आली होती. शेवटी २१ मार्च २०१३ रोजी याकूबच्या फाशीवर सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब केले आणि त्यानंतर पुढच्याच वर्षी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी दयेची याचिका फेटाळली. एप्रिल २०१५ ला फाशीवर सर्वोच्च न्याालयाचे शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर याकूबने निकालाच्या फेरविचाराची याचिका दाखल केली. ती देखील आता फेटाळली गेली. आता त्याने राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज दाखल केला आहे. अर्थातच त्याचा गुन्हा पाहता राष्ट्रपती त्याला दया करणे शक्य नाही. त्यामुळे आता त्याचे आपले प्राण वाचविण्याचे सर्व मार्ग थांबले आहेत. या फाशीमुळे देशात झालेल्या एका देशविघातक कृत्यातील एका आरोपीला फासावर लटविले जाईल. त्यामुळे निश्‍चतच अशा प्रकारच्या घटनांना आवर घालणे सोपे जाईल. देशविघातक कृत्य करणार्‍यांना माफ केले जाणार नाही असा संदेश देशात तसेच पाकिस्तानातही पोहचेल.
-------------------------------------------------------------------------

0 Response to "अखेर फाशीच!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel