-->
एक्स्प्रेस(मृत्यू)वे

एक्स्प्रेस(मृत्यू)वे

संपादकीय पान बुधवार दि. २२ जुलै २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
एक्स्प्रेस(मृत्यू)वे
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर रविवारी दुपारी कोसळलेली दरड तब्बल ११ तासाच्या अथक प्रयत्नानंतर हटविण्यात आयआरबीला यश आले व अखेरीस मुंबईकडे जाणारा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. यामध्ये २ प्रवाशी ठार तर ३ प्रवाशी गंभीर जखमी झाले होते. अर्थात एक्सप्रेसवेवरील वाहतुक सुरळीत सुरू झाली असली तरी दरड कोसळण्याचा धोका मात्र कायम आहे. हा धोका लक्षात घेवून महामार्गाचे सर्वेक्षण करून धोकादायक दरडी काढण्याचे काम दोन दिवसात केले जाणार आहे. या मार्गावर एका महिन्याच्या आत दोन वेळा दरड कोसळण्याच्या घटना घडल्या. त्यामध्ये दोन नागरिकांना जीव गमवावा लागला. दरड कोसळू नये म्हणून डोंगराला बसविण्यात आलेल्या लोखंडी जाळ्या सात वर्षे बदललेल्या नसल्याचे वास्तव पुढे आले आहे. याबद्दल महाराष्ट्र राज्य रस्ते निर्माण मंडळाला (एमएसआरडीसी) वेळोवेळी सूचना करूनही त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे. प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासाची हमी मिळण्यासाठी आणखी किती जणांना जीव गमवावा लागणार आहे, हे सरकारच जाणो. सरकार आय.आर.बी. कंपनीच्या माध्यमातून या रस्त्यावरुन जाणार्‍यंाकडून टोल वसुली करते मात्र सुविधा देण्यास मागे असते. पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे हा खंडाळा, लोणावळा, बोरघाट परिसरातून जातो. या मार्गावर पूर्वीदेखील दरड कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या. लोणावळा, खंडाळा परिसरात मोठया प्रमाणात पाऊस पडतो. उन्हाळ्यातदेखील येथील हवामान दमट असते. त्यामुळे या रस्त्यावर कधीही दरड कोसळण्याची शक्यता असते. द्रुतगती मार्ग तयार करताना या ठिकाणाचे डोंगर हे उभे कापण्यात आले आहेत. त्यामुळे रस्ता व कापलेले डोंगर यांच्यात अंतर नाही. त्यामुळे थेट रस्त्यावर मोठया प्रमाणात दरड कोसळतात. काही तज्ज्ञांच्या मते मुळातच या एक्स्प्रेस वे ची उभारणी चुकीची झाली आहे.  हा रस्ता तयार करताना ९० अंशाच्या कोनात दगड कापल्याने भविष्यात यातून अनेक प्रश्‍न उपस्थित राहाणार होतेच. प्रामुख्याने वरची झाडे, खडक तसेच ठेवल्यामुळे ते खाली कोसळण्याचा धोका हा कायमच होता. त्याचबरोबर येथे लाकूडतोड, पाण्याची सतत होणारी धूप यामुळे दरडी कोसळण्याचा धोका नेहमीच कायम होता. कोणताही हंगाम असो इकडे लहान-मोठे दगड पडण्याचे प्रकार येथे वारंवार होतच असतात. डोंगर कापताना मोठी झाडे तोडली गेल्यामुळे त्यांची पाळेमुळे सैल झाली होती. दरडी कोसळू नयेत म्हणून ज्या जाळ्या बसविण्यात आल्या त्यासाठी खडकावरच ड्रिलिंग केल्याने दगड सैल झाले, ढिसूळ झाले. त्यामुळे जाळी बसविण्यात आली म्हणजे येथे सुरक्षितता आली असे अजिबात नव्हे. उलट त्यामुळे दरडी कोसळण्याचा धोका तेवढाच वाढला. यासाठी दरडींच्या शेजारी त्या कोसळू नयेत यासाठी मजबूत पत्रे लावून पत्र्यांची संरक्षक भींत उभारण्याची आवश्यकता होती. निदान ३६ ते ३९ कि.मी. या टप्प्यात तरी पुन्हा दरड कोसळण्याचा धोका टाळण्यासाठी सावधानगिरीची पावले उचलली गेली पाहिजे होती. परंतु तसे काही झालेले नाही. यंदा २० जूनला पहिली दरड कोसळल्यावर खरे तर लगेचच सर्व्हे करुन अजून दरडी पडण्याची केंद्रे कुठे आहेत त्याचा शोध घेतला गेला पाहिजे होता. परंतु तसे काही झालेच नाही. शासकीय पातळीवरील ढीलेपणा या कारणीभूत ठरला आहे. चार दिवसंापर्वी पडलेली दरड ही नैसर्गिक आपत्ती आहे. अशा आपत्ती ही येणारच फक्त त्यासाठी कशी उपाययोजना करणार हाच प्रश्‍न आहे. या रस्त्याच्या बाजूला उभारण्यात आलेली होडिंग्ज हे सर्वात धोकादायक ठरतात. अनेकदा प्रवासी प्रति कि.मी. १०० च्या वेगाने जात असतो आणि त्याची नजर या जाहीरांतीवरुन हटत नाही यामुळेही अपघाताचा धोका संभावितो. त्यासाठी ही होर्डिंग कुठे असावीत व कुठे नसावीत याचे ताळतंत्र बाळगणे गरजेचे झाले आहे. परंतु या रस्त्यावर असणार्‍या हा होर्डिंग माफियांना रोखण्याची हिंमत सरकारमध्ये नाही. या होर्डिंग माफियांनी बेसुमार झाडांची कत्तल केली आहे. पण त्यांना विचारायला वन खाते तयार नाही. कारण या सर्व सरकारी खात्यांना या माफियांनी विकत घेऊन आपल्या खिशात घातले आहे. या रस्त्यावर जर अपघात झाला तर ऍम्बुलन्स करुन थेट दूर असणार्‍या पुण्यातील महागड्या रुग्णालयात पोहोचविले जाते. पनवेलजवळील शासकीय रुग्णालयात नेले जात नाही. येथे अपघात झाला की, लगेचच रुग्णाला आपल्या रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी काही रुग्णालयांनी खास ऍम्बुलन्स ठेवल्या आहेत. ही कोणाला तरी वरकरणी मोठी सोय किंवा समाजसेवा वाटेल. परंतु या रुग्णालायत पेशन्ट गेला की त्याचा खिसा कापला गेलाच म्हणून समजा. आमदार भाई जयंत पाटील यांनी रायगड जिल्ह्यातील खालापूर येथे ट्रॉमा केअर सेंटर उभारण्याची विधानपरिषदेत मागणी केली होती. त्यानुसार ते मंजूरही झाले. तत्कालीन उपमुख्यमंत्री आर.आर. आबा पाटील यांनी यात पुढाकार घेतला होता. येथे हवाई ऍम्बुलन्ससह हे सेंटर अत्याधिुनक करण्यात येणार होते. आज हे ट्रॉमा केअर सेंटर बांधून तयार आहे. परंतु त्यात कसल्याही सुविधा झालेल्या नाहीत. हे सेंटर जर सुरु झाले तर अनेकांचे जीव वाचू शकतात. एक्स्प्रेस वे वर प्रवाशांच्या वेगामुळे जास्त अपघात होतात ही वस्तुस्थिती असली तरीही अपघात झाल्यावर ज्या सुविधा पुरविल्या गेल्या पाहिजेत त्याची गेल्या दोन शतकात सोय करण्यात आलेली नाही. तसेच प्रवाशांची सुरक्षा व्यवस्था रामभरोसेच आहे. चोर्‍या होतात हे कारण दाखवून रात्री ११ नंतर या मार्गावरील सर्व हॉटेल्स बंद करण्यात येतात. सी.सी.टी.व्ही. या मार्गावर बसविण्यात आले परंतु ते चालू नसतात. अवजड वाहांनानी डाव्या बाजूने जावे असा नियम असताना ते नियम मोडतात, मात्र त्यांच्याकडून पोलिस हाप्त्यांची वसुली करतात. एकूणच पाहता एक्स्प्रेस वे हा मृत्यूचा सापळा झाला आहे, हेच खरे.
-------------------------------------------

0 Response to "एक्स्प्रेस(मृत्यू)वे"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel