स्वागत रो-रो चे
स्वागत रो-रो चे
अखेर प्रदीर्घ काळ रखडलेली भाऊचा धक्का ते मांडवा या दरम्यान रो-रो सेवा सुरु झाली. रो-रो सेवा सुरु होण्यास विलंब होत असल्याने मांडवा येथे 150 कोटी रुपये करुन उभारलेली अद्ययावत जेटी हा एक पांढरा हत्ती होतो की काय अशी भीती वाटू लागली होती. कारण येथे गाळ साचत असल्याने येथे रो-रो सेवेची बोट लागत नव्हती, अशी चर्चा होती. परंतु हे सर्व अडथळे सध्या तरी दूर झालेले दिसतात, त्यामुळे अखेर ही सेवा सुरु झाली आहे. सध्या तरी दिवसातून एक किंवा दोनच फेऱ्या या बोटीच्या होतील असे चित्र आहे. कदाचित भविष्यात या फेऱ्या वाढू शकतील. परंतु समुद्रात ओहटी असताना ही बोट मांडवा येथे लागेलच याची खात्री देता येत नाही, असे बोलले जाते. मात्र या सर्व शंकांचे निरसन येत्या काही दिवसात होईल. या सेवेचा सर्वात महत्वाचा फायदा पावसाळ्यात होणार आहे. कारण गेटवे ते मांडवा ही बोट सेवा पावसाळ्याचे चार महिने बंद असते. त्यामुळे या काळात अलिबागला येण्यासाठी वळसा घालून यावे लागते. त्यातच मुंबई-गोवा महामार्गाचे चारपदरी काम गेली कित्येक वर्षे रखडल्याने या रस्त्यावर होणारी वाहतुकीची कोंडी मनस्ताप देणारी असते. आता पावसाळ्यात रो-रो सेवा सुरु राहाणार असल्याने अलिबागला पावसाळ्यातही समुद्रमार्गे जाता येणार आहे. यात वेळ व इंधनाची होणारी बचत ही जमेची बाजू ठरणार आहे. सध्या रो-रो सेवेचे दर महाग दिसत असले तरी काही काळाने हे दर कमी केल्यास मोठ्या संख्येने पर्यटक या सेवेकडे वळू शकतात. मुंबईहून म्हणजे प्रामुख्याने दक्षिण मुंबईतून ज्या मुंबई-गोवा बस गाड्या जातात त्यांच्यासाठी ही सेवा म्हणजे वेळ व इंधन वाचविण्याची एक मोठी संधी असेल. सध्या दररोज मुंबई-गोवा मार्गावर दक्षिण मुंबईतून जाणाऱ्या बसची संख्या शंभराहून जास्त आहे. या बसनी जरी रो-रो सेवेचा लाभ घ्यायचा ठरविले तरी मोठे यश या सेवेला मिळेल. रो-रो सेवेचे स्वागत करीत असताना आता मांढवा ते अलिबाग, तसेच अलिबाग ते वडखळ तसेच मांडवा ते चौल-रोहा या मार्गावरील रस्त्याचे विस्तारीकरण तातडीने हाती घेण्याची गरज आहे. कारण या मार्गावरील वाहानांची संख्या आता झपाट्याने वाढणार आहे. खरे तर गेली चार वर्षे मांडवा येथील जेटी उभारली जात असतानाच याला जोडणाऱ्या या विविध रस्त्यांचा विस्तार व्हायला पाहिजे होता. परंतु तसे न झाल्याने आता अनेक ठिकाणी गैरसोयींचा सामना करावा लागणार आहे. रो-रो सेवेमुळे कोकणातील पर्यटनाचे एक नवे पर्व सुरु होत आहे. अलिबाग व त्याचा परिसर हे मुंबईकरांसाठी पर्यटनाच्या दृष्टीकोनातून एक हॉ डेस्टिनेशन ठरले आहे. आता तुम्ही थेट वाहनच बोटीत घालून नेऊ शकत असल्याने पर्यटकांच्या संख्येत वाढ होईल. आता अलिबागमध्ये पर्यटक खिळून राहावा यासाठी अनेक उपाययोजना कराव्या लागतील. यात प्रामुख्याने अलिबागमध्ये एतिहासिक वस्तूंचा म्युझियम सुरु करणे, वॅक्स म्युझियम स्थापणे, अत्याधुनिक मस्त्यालय तयार करणे, राजे रघुजी आंग्रे यांनी सुचविल्याप्रमाणे अलिबागचा किल्ला खाली करुन तेथे एतिहासिक म्युझियम, कुलाबा किल्याला जायला रोप वे तयार करणे करणे अशा काही गोष्टी तातडीने कराव्या लागतील. गेल्या काही वर्षात अलिबागच्या समुद्र किनाऱ्याचा कायापालट अतिशय सुंदर व कलात्मकरित्या करण्यात आला आहे. तसेच या किनाऱ्यावरील सुरक्षितताही वाखाणण्याजोगी आहे. आता समुद्रकिनारी लवकरच रणगाडा दाखल झाल्यावर येथील सौंदर्यात आणखीनच भर पडेल. अलिबागमध्ये पर्यटकांना खिळवून ठेवण्यासाठी विविध बाबी तयार केल्यास पर्यटकांची संख्या वाढत जाईल. केवळ समुद्र पाहायला येणाऱ्यांची संख्या जशी मोठी असते हे खरे असले तरीही त्या पर्यटकाला पुन्हा आणावयाचे असेल तर त्याच्यासाठी अनेक आकर्षणे निर्माण केली गेली पाहिजेत. अलिबाग हे मुंबई व पुण्यातील एक-दोन दिवसीय पर्यटकांसाठी एक आवडते पर्यटन स्थळ आहे. या पर्यटकाला येथे सतत यावेसे वाटले पाहिजे तरच येथील पर्यटन उद्योग आणखी वाढीस लागेल. यासाठी येथील पायाभूत सुविधा सुधारल्या पाहिजेत. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून उभारल्या जाणाऱ्या सागरमाला प्रकल्पातील रो-रो हा पहिला टप्पा आहे. मांडव्यावरुन सुरु होणारा हा प्रकल्प महाराष्ट्राच्या सीमेवर शिरोड्यापर्यंत असेल. समुद्राला समांतर रस्ता तसेच काही ठिकाणी बोटीतून प्रवास असा हा मार्ग असेल. या मार्गावरील देवगड, रत्नागिरी, मालवण, शिरोडा ही बंदरे विकसीत केली जातील. यातून प्रवासी वाहतूक जशी वाढेल तसेच पर्यटनालाही हातभार लागणार आहे. त्याच्या जोडीने सध्याच्या मुंबई-गोवा महामार्गावरील भार कमी होईल. त्याचबरोबर गोव्याला जाणारा पर्यटक या सागरी मार्गाचा लाभ घेऊ शकेल. गेल्या वर्षात सुरु झालेल्या आंग्रीया या मुंबई-गोवा क्रुझ बोटीने अल्पावधीत चांगली लोकप्रियता मिळविली आहे. आंग्रीयाचे यश हे मुंबई-गोवा मार्गावर बोटीने प्रवासी वाढण्याचे लक्षण आहे. अशा प्रकारच्या सेवेमुळे कोकणाचे भविष्य बदलणार आहे. पर्यटन केंद्रीभूत अनेक बाबी यातून रोजगार देणाऱ्या ठरणार आहेत, यात काही शंका नाही. रो-रो सेवेमुळे आता अनेक दालने कोकणासाठी खुली होत आहेत, त्याचे स्वागत व्हावे.
0 Response to "स्वागत रो-रो चे"
टिप्पणी पोस्ट करा