-->
भाजपाच्या उन्मादाला चाप

भाजपाच्या उन्मादाला चाप

शुक्रवार दि. 25 ऑक्टोबर 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
----------------------------------------------
भाजपाच्या उन्मादाला चाप
राज्यातील विधानसभेचे निकाल पाहता भाजपा-शिवसेना युतीच्या बाजूने पुन्हा एकदा कौल दिला असला तरीही भाजपाच्या उन्मादाला चाप लावून जनतेने त्यांना धडा देखील शिकविला आहे. निवडणूक तोंडावर आली असताना भाजपाचा सत्तेतील उन्माद एवढा विकोपाला गेला होता की, यावेळी युती 220च्या पार जाणार असा फाजिल आत्मविश्‍वास त्यांच्याकडून व्यक्त केला जात होता. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे वयाच्या 79 व्या वर्षी सत्ताधार्‍यांच्या विरोधात एकाकी लढत देत होते, मात्र त्याचीही थट्टा उडवित भाजपाचे नेते पवारांना आता घरी बसविण्याची वेळ आली आहे, अशी अरेरावीची भाषा करीत होते. आपल्याला कोणच विरोधक नको आहे, अशी भाजपाची मानसिकता होती. त्यातूनच त्यांनी राष्ट्रवादी-कॉँग्रेस मधील अनेक आमदार धाकपदटशहा करीत आपल्याकडे खेचून घेतले होते. या मेगा भरतीमुळे राष्ट्रवादी-कॉँग्रेस एवढी दुबळी होईल की त्यांची संख्या अर्ध शतकाएवढी देखील नसेल असे वातावरण भाजपाने तयार केले होते. परंतु अखेर या मेगा भरतीचा त्यांचा फारसा काही उपयोग झालेला नाही, असेच चित्र दिसते आहे. या मेगा भरतीचे विश्‍लेषण यथासांग केले जाईलच. यातील काही मोजके आमदार हे त्यांच्या बालेकिल्यात कोणत्याही पक्षाचे तिकिट असो ते निवडून येतातच, असेच पक्ष सोडलेले नेते फक्त पुन्हा विधानसभेत भाजपाच्या तिकिटावर पोहोचले आहेत. भाजपाला जेमतेम आमदार संख्येचे शतक पार केल्यानेे त्यांच्या सर्व अपेक्षांचा लक्ष्य 220चा चक्काचूर झाला आहे. भाजपाचा स्वबळावर जाण्याचा व शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवण्याचा किंवा त्यांना दुय्यम स्थान देण्याचा त्यांचा अंतस्थ हेतूही काही सफल होऊ शकलेला नाही. भाजपा नेत्यांना जो सत्तेचा माज आलेला होता, त्याला जनता जर्नादनाने चांगलाच चाप लावला आहे. सत्ता येते किंवा जाते, उमेदवारांचा व पक्षांच्या जय-पराजय हा लोकशाही प्रक्रियेतील एक भाग असतो. हे सर्व हसतखेळत स्वीकारायचे असते. जनतेची सेवा करणे महत्वाचे असते. ज्यावेळी सत्तेत असताना तुम्हाला सत्तेचा माज येतो त्यावेळी जनता तुम्हाला घरचा रस्ता दाखविते, हे भाजपाच्या कमी झालेल्या आमदारांच्या संख्येवरुन स्पष्ट दिसते. विरोधकांची ताकद यावेळी खरोखरीच कमी होते की काय, असे वातावरण मिडियाला बरोबर घेऊन भाजपाने तयार केले असले तरी शरद पवारांंनी आपल्या सोबत असलेल्या साथीदारांना बरोबर घेत संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. त्यांच्या सभांना अलोट गर्दी होत होती. त्यावरुन सत्ताधार्‍यांच्या विरोधात जनमत आहेे, हा जनतेचा कल जाणवत होता. शरद पवारांनी विरोधकांचा हा बालेकिल्ला एकांडी लढवला. एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या या महाराष्ट्र राज्यात कॉँग्रेस हतबल झालेली पहायला मिळाली. गेल्या सहा वर्षात होत असलेल्या पराभवातून अजूनही कॉँग्रेस काही उभारी घ्यायला तयार नाही. युध्दात लढाईला उतरायच्या आधीच कॉँग्रेसच्या राज्यातील व केंद्रीय नेत्यांनी हाय खाल्ली होती. कॉँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने राज्यातील निवडणुकीकडे जवळपास दुर्लक्षच केले होते. राहूल गांधींनी घेतलेल्या तीन सभांचाच काय तो अपवाद. मात्र सोनिया गांधी, प्रियांका गांधी यांनी प्रचाराकडे पाठ फिरवली होती. पूर्णपणे राज्यातील नेत्यांकडेच या प्रचार यंत्रणेची सुत्रे होती. परंतु त्यांच्याकडे विरोधकांची तडाखेबंद बाजू मांडणारा नेता नव्हता. एक सणसणीत नेतृत्व कॉँग्रेसकडे नव्हते. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात असोत, अशोक चव्हाण किंवा पृथ्वीराज चव्हाण हे सर्व नेते तडाखेबंद भाषणे करुन सत्ताधार्‍यंना नामोहरण करु शकणार्‍यातील नाहीत. उलट भाजपाने त्यांच्या विरोधात तगडे उमेदवार उभे करुन त्यांना आपल्या मतदारसंघात खिळवून ठेवले. असे असले तरीही कॉँग्रेसने अपेक्षेपेक्षा उत्तम कामगिरी केली. शरद पवारांच्या झंझावती भाषणांचा त्यांना प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरित्या फायदा झाला. याचा अर्थ स्पष्ट आहे की, अजूनही विरोधकांकडून जनतेला मोठ्या अपेक्षा आहेत. एकीकडे सत्ताधार्‍यांना जनतेने चाप लावला असताना विरोधकांना बळ देण्याचा प्रयत्न केला आहे. याचा अर्थ जनता मोठी हुशार आहे. त्यांना सत्ताधार्‍यांच्या हाती अनिर्बंध सत्ता द्यायची नाही. तर दुसरीकडे प्रबळ विरोधी पक्षही पाहिजे आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोधकांची ही पोकळी भरुन काढण्यासाठी जनतेला आवाहन जरुर केले परंतु त्यांच्या आवाहनाकडे त्यांनी लक्ष दिले नाही. सातार्‍यात लोकसभा पोटनिवडणुकीत उदयसिंग राजे भोसले यांचा झालेला पराभव हा जनतेच्या मनातील आवाज म्हटला पाहिजे. राजेंनी जनतेला गृहीत धरुन जेमतेम पाच महिन्यात पक्ष बदलला आणि आपण निवडून येणारच असे गृहीत धरले. शरद पवारांनी हेच नेमके हेरले व त्यांच्या विरोधात श्रीनिवास पाटीलांच्या रुपाने तगडा उमेदवार उभा केला. जनतेने राजेंची साथ सोडून अखेर श्रीनिवास पाटीलांच्या बाजूने कौल दिला. राजेंच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी ही आले होते, परंतु त्याचा फारसा काही प्रभाव पडला नाही. त्याउलट पवारांनी भर पावसात केलेले भाषण जनतेच्या मनाला भावले. एकूणच सत्ताधार्‍यांना पुन्हा एकदा जनतेने संधी दिली आहे. मात्र त्यांच्या आमदारांचा आकडा कमी केला आहे.         तर विरोधकांच्या आमदारांचा आकडा शतकापार नेला आहे. जनता सत्ताधार्‍यांवर नाराज आहे, परंतु विरोधकांनी आता सत्ताधार्‍यांना जनतेच्या प्रश्‍नावर धारेवर धरण्याची चोख कामगिरी केली पाहिजे, असाच या निकालाच अर्थ आहे.
------------------------------------------------------- 

Related Posts

0 Response to "भाजपाच्या उन्मादाला चाप"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel