-->
पाऊस संपेना, आली दिवाळी!

पाऊस संपेना, आली दिवाळी!

गुरुवार दि. 24 ऑक्टोबर 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
----------------------------------------------
पाऊस संपेना, आली दिवाळी!
मान्सून संपल्याचे हवामान खात्याने जाहीर करुन आठ दिवस लोटत नाहीत तर पुन्हा एकदा पावसाने आपला हिसका दाखविण्याचे ठरविलेले दिसते. मतदानाच्या दिवशी नागरिकांना दिलासा दिल्यानंतर मंगळवारी पुन्हा एकदा राज्यात पाऊस सक्रिय झाला असून पुढील तीन दिवस म्हणजे शुक्रवारपर्यंत मुंबइसह कोकणातील रायगड, रत्नागीरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार वृष्टी होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. महत्वाचे म्हणजे अनेकदा हवामान खात्याचे अंदाज खोटे ठरतात, मात्र हा अंदाज खरा ठरत असून गेले दोन दिवस पाऊस सतत आपली हजेरी लावत आहे. दिवाळी तोंडावर आली असताना बिगर मोसमी पाऊस आल्याने यंदाच्या दिवाळीवर पावसाचे सावट निर्माण झाले आहे. सोमवारी मतदान व्यवस्थित पार पडल्यानंतर त्याच रात्री राज्यातील काही भागांत गडगडाट, वादळी वारे आणि जोरदार वार्‍यासह पावसाने हजेरी लावली. त्यानंतर मंगळवारी देखील आकाशात काही प्रमाणात ढगाळ वातावरण होते. अरबी समुद्राच्या आग्नेय दिशेला कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे मान्सूनने निरोप घेऊनही मुंबईत तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी पडल्या. 23 ऑक्टोबरपर्यंत राज्यात पावसाचा मुक्काम असणार असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. मात्र या परतीच्या पावसाने संपुर्ण रायगड जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले असून यामुळे येथील भातशेची संकटात सापडली आहे. रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर भाताचे पीक घेतले जाते सध्या हे पीक काढणीला आले असताना मुसळधार पाऊस कोसळत असल्याने येथील शेतकर्‍यांच्या तोडचे पाणी पळाले आहे. जिल्ह्यातील शेकडो एकर भात शेती धोक्यात आली असून पीक हाताशी आले असताना नेमका पाऊस आल्याने हातचे हे पीक जाणार आहे. त्यामुळे शेतकरी नाराज झाले असून सध्या तरी चिंताग्रस्त वातावरण त्यांच्यात आहे. पुढील काळात नवीन सरकार सत्तेत आल्यावर त्यांच्यापुढे या शेतकर्‍यांना पावसाचे झालेली नुकसानभरपाई देण्याचा प्रस्ताव ठेवावा लागेल. हा अवकाळी पाऊस केवळ कोकण, गोवा नव्हे तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात भागात असणार आहे. पुढील तीन दिवस म्हणजे 24 ऑक्टोबर या तीन दिवसाच्या कालावधीत जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. परिणामी यंदाची दिवाळी पावसात साजरी करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. पूर्वीच्या काळी दिवाळीला सकाळी आंघोळ करताना कुडकूडी भरेल अशी हलकीशी गुलाबी थंडी असायची. मात्र हे दिवसही गेले. गेल्या काही दिवसात हवामानचा साचा पूर्णपणे बदलला आहे. गेला-गेला म्हणताना पाऊस पुन्हा फिरून आल्याने राज्यात दिवाळीचा उत्साह मावळला आहे. एक तर गेले वर्षभर मंदीचे ढग देशात घोंघावत असताना अनेकांना विविध आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. हा पाऊस आणखी काही दिवस राहणार असल्यानं दिवाळीच्या दिवसांत आकाशकंदिल, दिवे कसे लावायचे, याची चिंता देखील सतावते आहे. तर, पावसात पाऊस आणि भुईचक्रासारखे फटाके कसे फोडायचे, याचे प्लानिंग करण्यात बच्चे कंपनी गुंतली आहे. दिवाळीची चाहूल लागताच वातावरण पालटून जाते आणि एक प्रकारचा उत्साह ओसंडून वाहू लागतो. यंदा मात्र या उत्साहावर विरजण पडले आहे. त्याला कारण केवळ बाजारातील आर्थिक मंदी हे कारण जसे आहे तसेच आकाश व्यापून राहिलेला पाऊसही आहे. येत्या 28 पर्यंत पाऊस राहील असा अंदाज आहे. त्यामुळे संपूर्ण दिवाळी पावसाळी वातावरणातच जाणार आहे. दिवाळीच्या आठ दिवस आधीपासूनच बाजार फुललेले दिसतात. दिवाळीच्या प्रत्येक दिवसासाठी लागणारे साहित्य बाजारात दिसते, खरेदीसाठी एकच लगबग सुरु होते. दुकानदारांनी सर्व माल तर मागवला असला तरी पावसामुळे म्हणावी तशी गर्दी बाजारात दिसत नाही. रस्त्यावरील विक्रेत्यांना पावसाचा मोठा फटका बसत आहे. त्यामुळे आधीच मंदी आणि त्यात पाऊस अशा कोंडीत दुकानदार व व्यापारी सापडले आहेत. असे असले तरी हे चित्र बदलेल, अशी आशा विक्रेते व्यक्त करत आहेत. दिवालीच्या अगोदर विविध विक्रेते अगदी ऑनलाईन व ऑफलाईन असे दोन्ही प्रकारचे विक्रेते विविध योजना, सवलती जाहीर करतात. त्यातील ऑनलाईन खरेदी करणार्‍यांसाठी विविध योजना यापूर्वीच झाल्या. त्यांना जोरदार प्रतिसादही मिळाला. परंतु अजून प्रत्यक्ष दुकानात जाऊन खरेदी करणार्‍यांचा मोसम म्हमावा तसा जोर धरीत नाही. मंदीच्या जोडीला पावसानेही जोर धरल्याने सर्व बाजारपेठा ओस पडल्या आहेत. एक तर भर दिवाळीच्या मोसमाच्या अगोदर निवडणुकीचे वारे होते. त्यामुळे लोक राजकीय वातावरणात फारसे खरेदी करायला पुढे आले नाहीत. आता मतदान झाल्यावर तरी खरेदी वाढेल असा अंदाज होता. मात्र पावसाने निराशा केली. त्यातच आता गुरुवारी निकालाचे वातावरण असल्यामुळे तो दिवसही खरेदीसाठी फुकटच जाणार आहे. भर दिवाळीत पाऊस कधी पडल्याचे आजवर एैकिवात नव्हते. ऑक्टोबर हिट लांबच राहिली आहे. अजून पावसाळाच संपत नाही. त्यामुळे बदललेल्या या हवामान चक्रामुळेे भविष्यात काय होणार याची चिंता आहे.
--------------------------------------------------------

Related Posts

0 Response to "पाऊस संपेना, आली दिवाळी!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel