-->
आता निकालाकडे लक्ष...

आता निकालाकडे लक्ष...

मंगळवार दि. 22 ऑक्टोबर 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
----------------------------------------------
आता निकालाकडे लक्ष...
महाराष्ट्रात मतदानाच्या आदल्या दिवशी बर्‍याच भागात पाऊस पडला असली तरीही मतदारांचा उत्साह काही कमी झालेला नाही. महाराष्ट्र व हरयाणा या दोन महत्वाच्या राज्यातील निवडणुकांचे निकाल आता काय लागतात याकडे सार्‍या देशाचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणुका जिंकल्यावर आता भाजपाचा उत्साह ओसांडत आहे व आपण पुन्हा सत्तेवर येणार असा त्यांचा दावा आहे. लोकसभा निवडणुकांनतर जेमतेम सहा महिन्यात या दोन राज्यात निवडणुका होणार असल्याने लोकसभेसारखेच मतदान होऊन आम्ही सत्तेवर येऊ हा भाजपाचे मत आहे. परंतु लोकसभेला जी मते मिळतात तीच मते विधानसभेला मिळत नाही हे अनेकवेळा सिध्द झाले आहे. त्यामुळे चालू वर्षाच्या अखेरीस मोदी-शहा व शरद पवार या नेत्यांची राज्यातील निवडणुकांच्या निमित्ताने मोठी कसोटी होत आहे. या दोन्ही राज्यात प्रचार करताना स्थानिक प्रश्‍नांना महत्व देण्याएवजी मोदी-शहांनी 370 कलम हाच मुद्दा लावून धरला होता. याच जोरावर आपण निवडणुका जिंकू शकतो, राष्ट्रप्रेम यातून लोकांमध्ये ओसंडून जाईल व त्यावर आपण बाजी मारु अशी भाजपाची गणिते आहेत. परंतु ही गणिते त्यांची फिसकटणार आहेत हे नक्की. राष्ट्रीय प्रश्‍नावर राज्यातील निवडणुकांत बाजी मारता येत नाही. आपणच खरे देशभक्त आणि बाकीचे गद्दार अशी भाजपा व मोदी-शहा यांची प्रचाराची मुख्य थीम होती. देवेंद्र फडणवीस अथवा मनोहरलाल खट्टर यांच्या सरकारांनी केलेल्या कामगिरी ऐवजी काश्मीर मुद्यावरील सार्वमतच जणू महाराष्ट्र व हरियाणात घेतले जात आहेे. मात्र विरोधी पक्षात प्रामुख्याने शरद पवार हे आक्रमक होते. मात्र त्यांच्या तुलनेत कॉँग्रेस पक्ष मात्र हतबल झाल्यासारखा दिसला. अजूनही कॉँग्रेस पक्ष पराभवातून काही बाहेर पडायला तयार नाही, हे पुन्हा एकवार दिसले. जी काही पूर्वापार काँग्रेसची पुण्याई असेल त्यानेच पक्ष कसाबसा तरेल असे बोलले जात आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसच्या सार्‍या दिग्गज नेत्यांना त्यांच्या जिह्यातच नव्हे तर त्यांच्या मतदारसंघातच खिळवून ठेवण्याची अजब कामगिरी भाजपने केली होती. भाजपाची ही खेळी यशस्वी झाली का ते आता निकालानंतर दिसेल. हरियाणामध्ये काँग्रेस चांगली धडक देऊल असे बोलले जात आहे. त्यामुळे राज्यातील 90 पैकी 50 मतदारसंघात भाजपाला चांगलाच सामना देण्यात पक्षाला यश आले आहे. हरियाणाचे राजकारण हे जाट आणि गैर-जाट यांच्याभोवती फिरत असल्याने तेथील सामन्यात रंग भरला गेला आहे. त्या राज्यातील अमित शहा यांच्या सभा अक्षरशः फ्लॉप गेल्या अशा बातम्या आहेत. त्यानंतर सीमेवर कारवाई करण्याचे पाऊल उचलले गेले. मात्र निकाल काय लागतो ते पहावे लागेल. महाराष्ट्रात मोदी-शहा यांची जबर हवा असती तर मग शिवसेनेशी युती कशाकरता हा प्रश्‍न उद्भवतो. 370 कलम हटवणे म्हणजे अटकेपार झेंडा लावण्याचे काम असेल तर मग अशावेळी तर एकटे लढून सेनेचे बारा वाजवण्याची नामी संधी मोदी-शहा यांनी का बरे हुकवली? विशेष म्हणजे साक्षात मुख्यमंत्रीदेखील ही युती घडावी यासाठी प्रयत्नशील होते. भाजपाला जर स्वत:वर जर एवढा आत्मविश्‍वास होता तर स्वबळावर जाण्याचे त्यांनी धाडस केले नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे की ऐवढी लोक आयात करुनही भाजपला पुन्हा सत्तेवर येण्याचा विश्‍वास वाटत नाही. भाजप आणि सेनेने आयात केलेल्या उमेदवारांना लोक कसा प्रतिसाद देतात यावर युतीचे भवितव्य अवलंबून आहे. भाजपात मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. त्याचबरोबर शिवसेनेचे काही उमेदवार पाडण्यासाठी भाजपाने प्रयत्न केले आहेत. असा या आंतर्गत लाथाळ्या युतीला सत्तेपर्यंत कितपत पोहोचवतात ते पहावे लागेल. मोदी-शहा यांना या राज्यात यश मिळाले नाही तर त्यांचे भविष्य कठिण असणार आहे. पुढील वषी सुरुवातीलाच दिल्ली विधानसभा निवडणूक आहे. तेथे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चांगलाच जम बसवलेला आहे. तेथे भाजपाला मोठे आव्हान आहे. बिहारमध्ये नितीशकुमारच सत्ताधारी रालोआचे नेतृत्व करतील अशी घोषणा करून अमित शहा यांनी भाजप त्या राज्यात दुय्यम भूमिका स्वीकारणार असे सूचित केले आहे. महाराष्ट्रात 79 वर्षाच्या शरद पवारांनी महाराष्ट्र ज्याप्रकारे पिंजून काढला त्याला तोड नाही. भार पावसात तसेच भर उनात सभा घेऊन आपल्या अस्तित्वाची लढाई त्यांनी जोरदारपणे लढविली आहे. त्यांच्यापुढे 49 वर्षाच्या फडणवीसांची कसोटी लागणार आहे. युतीने 288 पैकी 200 पार करण्याचा संकल्प सोडला आहे, परंतु त्यांच्यासाठी हा आकडा अशक्य आहे. मात्र जो कुणी राज्यात सत्तेवर येईल त्यांच्यापुडे अनेक आव्हाने असणार आहेत. भारतीय अर्थव्यवस्था डगमगू लागली आहे आणि नजीकच्या भविष्यकाळात तीला परत उभारी येईल अशी शक्यता नाही. राज्यावर एकीकडे कर्जाचा डोंगर, दुसरीकडे बेकारी, शेतीचे प्रश्‍न, नवीन गुंतवणुकीचा अभाव असे अनेक प्रश्‍न आ वासून उभे आहेत.
------------------------------------------------

Related Posts

0 Response to "आता निकालाकडे लक्ष..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel