-->
कर्जमुक्ती कशी करणार?

कर्जमुक्ती कशी करणार?

संपादकीय पान शनिवार दि. २५ जुलै २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
कर्जमुक्ती कशी करणार?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकर्‍यांना कर्जमाफी नव्हे तर कर्जमुक्ती करण्याची आवश्यकता असल्याचे नमूद करुन कर्जमाफीच्या प्रश्‍नाला पूर्णपणे बगल दिली आहे. वरकरणी पाहता मुख्यमंत्र्यांची ही घोषणा स्वागतार्ह वाटावी. कारण कर्जमाफी ही एकवेळचीच आहे आणि यापूर्वीही कर्जमाफी करण्यात आली होती परंतु यातून शेतकर्‍यांचे प्रश्‍न काही सुटलेले नाहीत. त्यामुळे कर्जमाफी नव्हे तर कर्जमुक्ती हवी आहे हे मुख्यमंत्र्याचे निवेदन टाळ्या घेणारे असले तरीही व्यवहार्य नाही. शेतकर्‍यांना यापूर्वी तीनवेळा कर्जमाफी झाली असली तरीही त्यानंतर शेतकर्‍याचे प्रश्‍न न सुटल्यामुळे तसेच दुष्काळ, अवकाळी पाऊस हे दरवर्षीचेच राहिल्यामुळे शेतकरी कधीच कर्जमुक्त होऊ शकला नाही. त्यातच तो सावकाराच्या पाशात अडकत गेल्यामुळे त्याची कर्जमुक्ती कदापी शक्य नाही. आता सरकार कर्जमुक्तीची भाषा करीत असले तरीही त्याचे नेमके नियोजन कसे करणार याचा पत्ता कुणालाच नाही. आपल्याकडे बहुसंख्य शेतकरी अल्प भूधारक आहेत. त्यांची शेती पावसाच्या पाण्यावर आधारित आहे. सिंचन असलेली शेती २० टक्क्यांपेक्षा कमी आहे. उरलेल्या ८० टक्के शेतीला दुष्काळाला तोंड द्यावे लागते. देशी बाजारात अनेकदा कृषी मालाच्या किमती ढासळतात. किमान आधारभूत किमतीच्या टेकूमुळे थोड्या तरी त्या टिकून आहेत; पण या कृत्रिम टेकूमुळे मागणी, खप, कमी झाल्यावरसुद्धा उत्पादन वाढतच आहे. दळणवळणाच्या अपुर्‍या सोयी, धान्य वगैरे साठवण्यासाठी गोदामांची अपुरी व्यवस्था, कर्ज मिळण्याची व्यवस्था नसणे, जुनाट आणि शेतकरीविरोधी कायदे, शेतकरी-ग्राहक यांच्या दरम्यान अनेक दलालांची साखळी, शेतमालाचे वायद्याचे मार्केट विकसित न होणे, या व अशा अनेक कारणांनी शेतकर्‍यालाही पिकवलेल्या मालाचा योग्य भाव मिळत नाही आणि ग्राहकालाही पडलेल्या भावाचा फायदा मिळत नाही. जगातिक पातळीवर हवामान हे बदलत चालले आहे. दुष्काळ, गारपीट, वादळ, अतिवृष्टी या घटनांचे प्रमाण जागतिक तापमान वृद्धीमुळे दर वर्षी वाढतच आहे. यात सुधारणा होण्याची शक्यता नाही. शेतीकरु शेतकरी काही बचत करु शकत नाही. त्यामुळे अनेकदा त्यांचा दैनंदिन गरजा भागविणे कठीण जाते. त्याशिवाय आजारपण, अपघात, लग्न आदी खर्चांमुळे शेतकरी सहजच कर्जाच्या सापळ्यात जातो. कर्ज परतफेडीची सोय होऊ न शकल्यामुळे तो सहजासहजी यातून बाहेर पडत नाही. वारंवार होणार्‍या कर्जमाफीचा फायदा गरीब शेतकर्‍याला न मिळता बड्या शेतकर्‍यांना, सावकारांना आणि बँकांना मिळतो. यासाठी प्रत्येक शेतकर्‍यांला शेतीला पुरक असा लहान उद्योग करण्याची सुविधा उपलब्ध केली पाहिजे. यामुळे त्याचे शेतीवरील अवलंबित्व कमी होईल. तसेच शेती करतानाही आता अत्याधुनिक शेती करुन तसेच कमीत कमी मजूर वापरुन केली तर शेतकर्‍याचा नफा वाढणार आहे. निदान त्याचा तोटा तरी होणार नाही. परंतु याचा कर्जमुक्तीसाठी विचार केला गेला पाहिजे. तसेच आपल्याला शेतीवरील अवलंबित्वही कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न पुढील काळात करावे लागणार आहेत. शेती मोठी असेल तर ती फायदेशीर ठरु शकते. त्यामुळे लहान शेतकर्‍यांनी एकत्र समूह करुन शेती करण्यासाठी पावले टाकली पाहिजेत. अत्याधुनिक शेती व अत्याधुनित तंत्रज्ञानाचा वापर यात केला पाहिजे. उत्पादन वाढविणारी जी नवीन बियाणी आली आहेत त्याचा वापर आपण केला पाहिजे. सकल राष्ट्रीय उत्पन्नापैकी शेतीचे उत्पन्न १८ टक्क्यांइतके कमी झाले आहे. गेल्या ५० वर्षांत शेती उत्पादन अनेक पटींनी वाढले आहे; पण अन्य क्षेत्रातील उत्पादन त्याहीपेक्षा वाढले, त्यामुळे शेती उत्पन्नाची टक्केवारी कमी झाली एवढेच. शेतीची एकरी उत्पादन क्षमता वाढली आहे आणि वाढतच असल्याने, एकूण शेतमाल उत्पादनावर अशी जमीन कमी झाल्यामुळे काहीही विपरीत परिणाम झालेला नाही आणि होणार नाही.शेतकर्‍यांना दिली जाणारी अनुदाने, कर्जमाफीऐवजी शेतीसाठी लागणार्‍या सिंचन - साठवण - विक्रीविषयक पायाभूत सोईमध्ये तसेच उद्योग सेवांसाठी लागणार्‍या पायाभूत सेवांमध्ये गुंतवणूक करणे, उद्योग वाढणे, औद्योगिक रोजगार वाढणे या गोष्टी शेतकर्‍यांसाठी आवश्यकच आहेत. सरकार त्यासाठी कीती खर्च करते याचे उत्तर मुखख्यमंत्र्यांनी देण्याची आवश्यकता आहे. रासायनिक खते, कीटनाशके, सुधारित बियाणे, यांत्रिकीकरण यावर आधारितच शेती पुढे करावी लागणार आहे. या बाबी शेतकर्‍यासाठी किमान गरजा ठरणार आहेत. शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर आजवर बर्‍याच चर्चा झाल्य परंतु आता ठोस काही तरी करण्याची वेळ आता जवळ आली आहे. शेतकर्‍यांचा कर्जमुक्ती देणे ही घोषणा करणे सोपे आहे परंतु त्यासाठी नेमके काय करणार याचा प्लान या सरकारकडे नाही. म्हणूनच शेतकर्‍यांच्या या प्रश्‍नावर चर्चा करताना विभागवार गरजा लक्षात घेऊन त्यानुसार कोणते पीक पाणी घ्यावे याचा तौलनिल अभ्यास करण्याची गरज आहे. त्याआधारावर योजना आखल्यास व प्रत्यक्ष लाभ संबंधीत गरंजवंतापर्यंत पोहोचतात किंवा नाहीत हे पाहणे गरजेचे आहे. शेतकरी कर्जाच्या विळख्यात का अडकतो याची कारणे प्रदेशानुसार वेगवेगळी आहेत. शेतकर्‍यांच्या आत्महत्या या दुष्काळ, अवकाळी पाऊस, पिकाची रचना या सर्व बाबी परस्परांशी निगडीत आहेत. कर्जमुक्तीची घोषणा करताना या सर्व बाबींचा विचार सरकारने केला आहे का, असा प्रश्‍न आहे. सध्याचे सरकार शेतकर्‍यांसाठी काही तरी नवीन बाब करेल अशी अपेक्षा होती परंतु ती पोल ठरली. त्यामुळेच आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे, सरकारकडे याचे उत्तर नाही.
---------------------------------------------------------------------------

0 Response to "कर्जमुक्ती कशी करणार?"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel