-->
पुरातन वैभव

पुरातन वैभव

Jun 23, 2013, Rasik

सांची येथील स्तूप म्हणजे दगडात कोरलेली सर्वात पुरातन वास्तू आहे. याची उभारणी सम्राट अशोकाने तिस-या शतकात केली. आकाराने अर्धवर्तुळाकार दिसणारा हा स्तूप मुंबईतील एकमेव असलेल्या डोम थिएटरसारखा भासतो. असे म्हटले जाते की, सम्राट अशोकाने स्तुपामध्ये गौतम बुद्धांच्या अस्थी ठेवल्या आहेत. परंतु याला ऐतिहासिक पुरावा काहीच नाही. या डोमच्या पहिल्या टप्प्यापर्यंत जाण्यासाठी, दगडातच कोरलेली शिडी आहे. या शिडीने तुम्ही वरपर्यंत जाऊ शकता. वर जाऊन येथील शिल्पे आपल्याला पाहता येतात. संपूर्ण डोंगरात त्या काळी हे कशा प्रकारे कोरले असेल, असा प्रश्न आपल्याला पडतो. त्या काळी आपल्याकडे संपूर्ण दगडातील शिल्पे कोरण्याचे तंत्र किती विकसित होते, याचा एक उत्तम पुरावा यातून मिळतो. या स्तुपाला संपूर्ण प्रदक्षिणा घालून आल्यास येथील भव्यदिव्य वास्तूची कल्पना आपल्याला येऊ शकते. या भव्य स्तुपाच्या शेजारी लहान आकाराचे आणखी दोन स्तूप आहेत. या लहान स्तुपांमध्ये आत प्रवेश करता येत नाही. मात्र येथेही कोरलेली विविध शिल्पे पाहण्यासारखी आहेत. याच परिसरात बौद्ध भिक्खूंची राहण्याची व्यवस्था होती. याच्या निवासस्थानांचे अवशेषही येथे आढळतात. त्याचबरोबर या परिसरात श्रीलंका सरकारच्या सहकार्याने उभारलेले एक बौद्ध मंदिरही आहे. येथील गौतम बुद्धांची मूर्ती या परिसरात झालेल्या उत्खननाच्या वेळी सापडली होती.
तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी या स्थळाला भेट देऊन वास्तूचा जीर्णोद्धार केला होता. ही वास्तू नव्याने उभारलेली असली तरीही, त्यातील दगड हे याच परिसरातील असल्याने यातील वस्तूंचे संवर्धन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
सांची येथील परिसरात उत्खनन केल्यास तेथे ऐतिहासिक ठेवा आपल्याला सापडू शकतो, याची कल्पना सर्वात प्रथम 1818मध्ये आली. त्यापाठोपाठ ब्रिटिश इतिहासतज्ज्ञ जनरल टेलर याने सांची परिसरात अनेक ऐतिहासिक वास्तू असून त्याचे उत्खनन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले होेते. त्यानंतर प्रदीर्घ काळ हा ऐतिहासिक ठेवा दुर्लक्षितच होता. मात्र 1912 ते 1919 या काळात सर जॉन मार्शल यांच्या नेतृत्वाखाली येथे उत्खनन करून सांचीच्या स्तुपाला एक आकार देण्यात आला. आज या सांचीच्या डोंगरावर तीन लहान-मोठे स्तूप, बौद्ध देवालये अशा पन्नास वास्तू उत्खननातून सापडल्या आहेत. 1989मध्ये या स्थळाला युनेस्कोने जागतिक वारशाचा दर्जा दिला. त्यामुळे या वास्तूच्या परिसरातील सर्व जागा पुरातत्त्व खात्याच्या ताब्यात आहेत. याच परिसरात पुरातत्त्व खात्याने एक उत्कृष्ट संग्रहालय उभारले आहे. अतिशय नीटनेटके असलेल्या या संग्रहालयात उत्खननात सापडलेल्या अनेक मूर्ती व त्यांचे अवशेष मांडण्यात आले आहेत. त्याचबरोबर उत्खननापूर्वीचे फोटो व नंतरचे येथे असलेले फोटो बघण्यासारखे आहेत. उत्खननाचे अवघड काम कौशल्याने पूर्ण करून ही शिल्पे सफाईदारपणे कशी बाहेर काढण्यात आली, हे त्यावरून दिसते.
सांची परिसरापासूनच जवळ मध्य प्रदेश सरकार व श्रीलंका सरकारच्या सहयोगाने बौद्ध तत्त्वज्ञानाच्या अभ्यासासाठी विद्यापीठ स्थापन करण्यात येत आहे. त्यामुळे हा परिसर पुढील पाच वर्षांत जागतिक नकाशावर येणार. सांची हा विभाग जसा पर्यटन स्थळ म्हणून विकसित झाला आहे, तसा तो आता एक बुद्धिस्ट शैक्षणिक केंद्र म्हणूनही नजीकच्या काळात ओळखला जाणार आहे.

0 Response to "पुरातन वैभव"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel