-->
मुंबई: डे अँड नाईट

मुंबई: डे अँड नाईट

मंगळवार दि. 21 जानेवारी 2020 च्या अंकासाठी अग्रलेख- 
----------------------------------------------
मुंबई: डे अँड नाईट
देशाची आर्थिक राजधानी असलेली व कष्टकर्‍यांची मुंबई तसे पाहता दररोज मध्यरात्री जेमतेम दोन ते चार या वेळेतच म्हणजे जेमतेम दोनच तास झोपते. अन्यथा रोजचे 22 तास मुंबई जागीच असते. आता तर कॉल सेंटर सुरु झाल्यापासून मुंबई 24 तास जागी असते, मात्र ती काही मोजक्या ठिकाणी व्यापारी केंद्र असलेल्या भागात. या व्यापारी संकुलात तुम्हाला रात्रीच्या वेळी सर्व प्रकारचे काद्य पदार्थ बिनबोभाटपणे उपलब्ध होतात. मात्र ती मुंबईची गरज ढाली आहे. पहाटे चार वाजता मुंबईत दूधवाले व पेपरवाल्यांनी मुंबईला जाग येते व कामाची चक्रे सुरु होतात. दिवसभर हे शहर सतत धावते असते. मुंबईचे हे धावतेपण देशातील अन्य कितीही मोठ्या महानगरांना मिळविता आलेले नाही. मुंबपुरीची शेवटची लोकल विरारला व कल्याणला पहाटे दोन वाजता पोहोचल्यावर मुंबई खर्‍या अर्थाने झोपते. आता मात्र मुंबईची ही गडबड, धावपळ चोवीस तास सुरु राहाणार आहे. म्हणजे मुंबईला दोन तासही झोप मिळणार नाही. मुंबईत नाईट लाईफ सुरु करणार अशी काहीशी बोल्ड घोषणा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आणि त्यावर नेहमीप्रमाणे वादविवाद सुरु झाले. यापूर्वीही त्यांनी यापूर्वीच्या युतीच्या सरकारच्या काळात केली होती. मात्र ती प्रत्यक्षात उतरविण्यात त्यांना काही यश मिळाले नव्हते. अथार्र्त या घोषणेचे स्वागतच केले पाहिजे. आज जगभरातील प्रमुख शहरात नाईटलाईफ आहे. म्हणजे मुंबईत सध्या नाईट लाईफ नाही अशी तुमची समजूत होईल, परंतु सध्याचे जे नाईट लाईफ आहे ते अधिकृत नाही. जसे मुंबईत डान्स बार अधिकृत नाहीत, पण अनधिकृत डान्स बार आहेत. त्याच धर्तीवर आजही कुलाब्यातील काही ठिकाणी तसेच जुहूच्या पॉश वस्तींमध्ये नाईट लाईफ रोज नसले तरी किमान शनिवारी रात्री आहे. परंतु त्याला अधिकृत मान्यता नाही. आता मात्र आदित्य ठाकरेंच्या या घोषणेमुळे हे नाईट लाईफ अधिकृत होण्यास मदत होईल. त्याचबरोबर अनेक भागात रेस्टॉरंट, मॉल्स, पब रात्रंदिवस खुले ठेवण्यासाठी अधिकृत परवाना मिळेल. यातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल हे देखील तेवढेच खरे. तसेच एकूणच यामुळे आर्थिक उलाढाल वाढणार आहे. पूर्वी शिवसेना नेते व स्तंभलेखक प्रमोद नवलकर हे रात्री फिरुन रत्रीची मुंबई हे सदर तब्बल 50 वर्षे नवशक्तीत लिहित होते. तयंचे हे सदर प्रचंड लोकप्रिय होते. मध्यरात्रीची मुंबई कशी असते हे त्यांनी त्याकाळी उलगडून दाखविले होते. आता हे सर्व विश्‍व अधिकृत करुन सरकार दरबारी तिजोरी भरण्याचे काम नाईट लाईफमुळे होईल यात काही शंका नाही. मुंबईचे आजचे जे महानगराचे देखणेपण आहे, त्यात फक्त नाईट लाईफचाच अभाव आहे. आता ही कमतरताही दूर होईल. कष्टकर्‍यांची मुंबई म्हणून जो ऐकेकाळी मुंबईचा नावलौकिक होता तो आज टिकला नसला तरी येथे कष्ट करणार्‍या प्रत्येकाला दिवसाला दोन घास मिळतात, हे मुंबईचे वैशिष्ट्य. मुंबईत आता कष्टकर्‍यांची संख्या कमी होऊन सेवा क्षेत्रात काम करणार्‍यांची संख्या वाढली आहे. येथे लोकांना चांगला पगार मिळत असला तरी क्वचितच नाईट लाईफ एन्जॉय करता येईल अशी स्थिती आहे. लंडन, पॅरिस, न्यूर्याक, बँकॉक या प्रसिध्द महानगरांसह अनेक शहराचे सांगावयाचे झाल्यास तेथे अधिकृत नाईट लाईफ आहे. लंडनमध्ये तर दरवर्षी यातून कोट्यावधींची उलाढाल होते. त्यात मुंबई कमी पडावयास नको, विदेशी पर्यटक तसेच येथील नवश्रीमंतांना याचा निश्‍चितच फायदा घेता येईल. मात्र याला परवानगी देताना मुंबईची कायदा व्यवस्था कशी शाबूत राहिल हे पाहणे देखील गरजेचे ठरणार आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यासंबंधी व्यक्त केलेले मत स्वाभाविक आहे. यातील राजकारणाचा भाग बाजूला ठेवला तरी मुंबईची कायदा व सुव्यवस्थेसंबंधीचा विचार करुनच मुंबईचे हे नाईट लाईफ सुरु करावे लागेल, याबाबत काही दुमत नाही. मुंबईत नाईट लाईफ सुरु करताना मुंबईची काही ग्रंथालये, मैदाने देखील 24 तास सुरु ठेवण्याची केलेली सूचना स्वागतार्ह आहे. मुंबईत जर ग्रंथालये अशा प्रकारे 24 तास खुली ठेवल्यास अनेक विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येईल. मुंबईत आज अनेक भागात गोंगाट असतो, अशा प्रकारे मॉल किंवा रेस्टॉरंटला रात्रभर परवानगी देऊन रात्री या गोंगाटात भर पडणार नाही याचीही दखल पोलिसांना घ्यावी लागणार आहे. कदाचित गुन्ह्यांमध्येही यामुळे वाढ होण्याचा धोका आहे. त्यासाठी सर्व अंगांनी विचार करुन त्याचा बंदोबस्त करुन मगच सरकारला हे नाईट लाईफ सुरु करावे लागेल. कारण लंडनमध्ये नाईट लाईफमुळे रात्रीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे आढळले आहे. मुंबई हे शहर महानगर असूनही येथे तुलनेने पाहता गुन्हेगारी, गैरप्रकार कमी आहेत. पर्यटकांसाठी एक सुरक्षित शहर म्हणून याकडे पाहिले जाते. आता नाईट लाईफ मुंबईत सुरु करताना गैरप्रकार वाढणार नाहीत याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. सरकारचे हे एक बोल्ड धोरण म्हणून तसेच पर्यटनवाढीसाठी उचललेले तसेच व्यवसाय वृध्दीसाठीचे एक महत्वाचे पाऊल म्हणून याकडे पहावेे लागेल.
-----------------------------------------------------

Related Posts

0 Response to "मुंबई: डे अँड नाईट"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel