
शव वाहिनी गंगा...
18 मे मंगळवारच्या अंकासाठी अग्रलेख
शव वाहिनी गंगा...
एक मुखाने सर्व शव बोलले,
सब कुछ चंगा-चंगा,
राजा, तुझ्या रामराज्यात,
शव वाहिनी गंगा !!
राजा, तुझ्या राज्यात,
स्मशान खुटले सारे,
नी संपले लाकडी भारे,
राजा, आमचे आसु आटले,
खुंटले सोबत रडणारे !!
घरोघरी जाऊन....
घाणेरड्या राजकारणाचा,
नाच करती कढंगा,
राजा, तुझ्या रामराज्यात
शव वाहिनी गंगा !!
राजा, तुझी धगधग जोती,
थोssssडी उसंत मागे,
राजा, आमची कांकण फुटली,
धडधड छाती भांगे !!
जळतं बघुन फिडल वाजवतो,
येथे निर्लज्ज "रंगा-बिल्ला",
राजा, तुझ्या रामराज्यात
शव वाहिनी गंगा !!
राजा, तुझे दिव्य वस्र,
नी दिव्य तुझी ज्योती,
राजा, तुला नकली रुपात
पूर्ण नगरी बघती !!
मर्द कुणी असेल खरा,
तर म्हण, "राजा मेरा नंगा",
राजा, तुझ्या रामराज्यात
शव वाहिनी गंगा !!!
गुजराती कवयत्री पारुल खक्कर यांची काळीज चिरुन जाणारी ही कविता सोशल मिडियावर सध्या जबरदस्त गाजते आहे. सध्या देशात जे चालू आहे त्या घटनेचा ठाव घेणारी ही कविता म्हणजे सध्याच्या केंद्रातील सत्ताधाऱ्यांची लक्तरे जनतेपुढे मांडणारी आहे. या कवयात्रीने गंगेला शववाहिनी संबोधून पंतप्रधानांना राजा मेरा नंगा असे म्हटले आहे. कदाचित हिला देशद्रोही ठरविले जाईल, अर्थात ही कवयत्री काही जे.एन.यू. विद्यापीठातील कोणी डाव्या विचारांची नाही तर पंतप्रधानांच्या गुजरात राज्यातीलच एक साधी कवयत्री आहे. पण तिचे हृहय हे मातृत्वाने भरलेले आहे आणि त्यामुळेच तिला या जनतेच्या सध्याच्या स्थितीची काळजी वाटते आहे.पण तिचे शब्द हे काळीज चिरणारे आहेत. ही कविता वाचून प्रत्येकाचे रोमांच उभे राहिले पाहिजेत, एवढी जबरदस्त ताकद या शब्दात आहे. सत्ताधारी काहीच करीत नाहीत याची तिला खंत आहे म्हणून ती राजा मेरा नंगा असे बोलते. ती या कवितेतून लोकांना उठावाची भाषा करते, ते जनतेच्या प्रेमापोटी. ही कविता सध्या सोशल मिडियावर गाजते आहे कारण प्रत्येकाच्या हृदयाचा ठाव घेते आहे. आज प्रत्येकाच्या मनात हेच विचार आहेत, ते कवयात्रीने शब्दात मांडल्याने प्रत्येकाला ती आपली भाषा वाटते. गंगा नदी ही हिंदू संस्कृतीत अतिशय पवित्र मानली जाते. एका आख्यायिकेनुसार शंकराच्या जटेतून तिचा उगम होतो. संपूर्ण उत्तरेत तिचा मॉँ गंगा असा उल्लेख केला जातो. या मातेच्या उदरात सध्या दोन हजारांच्यावर शव सापडणे ही शोकांतिकाच म्हटली आहे. कोरोनाने सर्वांचे जीवन उध्दस्थ केले आहे. आम्हाला गंगेचा आशिर्वाद आहे त्यामुळे आमच्याकडे कोरोना नाही, असे म्हणणाऱ्यांच्या थोबाडीत सणसणीत लगावली गेली आहे. कोरोना कोणताही जात, धर्म, पंथ, प्रांत, देश पहात नाही तर तो साऱ्या विश्वात पसरला आहे. परंतु आपल्या राजकीय स्वार्थासाठी निवडणुका व कुंभमेळा घेणाऱ्या या राज्यकर्त्यांनाही याची फिकीर नाही. कारण यानंतरच कोरोना झपाट्याने पसरला. कुंभमेळ्याला हजेरी लावणारे हे कोरोनाचे वाहक ठरले आणि त्यातून कोरोना गावोगावी पसरला. जनतेला याचे गांभीर्य नव्हते, याचा त्यांना दोष देता येत नाही परंतु राज्यकर्त्यांना त्याची जाणीव पाहिजे होती. शेवटी अनर्थ झालाच. गावोगावी घराघरातून कोरोनामुळे माणसे दगावली. एवढ्या लोकांवर अंत्यसंस्कार करायचे तरी कसे? त्यांच्यावर अंत्यसंस्कार करायला लाकडेही नाहीत, लाकडे असली तर ती घ्यायला पैसेही नाहीत. अशा स्थितीत त्यांचे गंगेच्या किनारी दफन करणे किंवा थेट नदीच्या पात्रात शव सोडण्यास सुरुवात झाली. मृतांचे नातेवाईक असे करण्यासाठी अगतीक होते, त्यांचा नाईलाज होता. सरकार हातावर हात ठेऊन बसलेले. शेवटी हे शव वाहात जाऊन दुसऱ्या किनाऱ्यावर लागताच प्रशासनाला जाग आली. जेवढे शक्य झाले त्यांना नदीच्या किनारी पुरण्यात आले. परंतु यातील बहुसंख्य मृतदेह कोरोनाबाधीत असले तर त्यातून कोरोनाचा प्रसार आणखीनच होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. यात जनतेचा दोष नाही तर सत्ताधाऱ्यांचा आहे. कारण त्यांच्याच नियोजनाच्या अभावाने व निष्काळीपणाने देशाची स्मशानभूमी झाली आहे. कवयत्रीच्या ज्वालाग्रही शब्दात सांगावयाचे झाल्यास-
मर्द कुणी असेल खरा,
तर म्हण, "राजा मेरा नंगा",
राजा, तुझ्या रामराज्यात
शव वाहिनी गंगा !!!
0 Response to "शव वाहिनी गंगा..."
टिप्पणी पोस्ट करा